माझा सिंधुदुर्ग- सन्मा. जिल्हाधिकारी; श्रीगणेश मूर्तीच्या उंचीबाबत अट रद्द करा!

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आणि घरगुती गणेशोत्सव कसा साजरा करावा? यासंदर्भात सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रक काढले आहे. त्या सोळा कलमी परिपत्रकांमध्ये अटी, शर्ती नमूद केलेल्या आहेत. शासनाच्या नियमानुसार केंद्र आणि राज्य शासनाच्या सूचनेनुसार कोरोना महामारी रोखण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपायोजना करायलाच हव्यात; मात्र हे करत असताना जिल्हाधिकाऱ्यांनी काही गोष्टींबाबत वास्तवता समजून घेणे गरजेचे आहे; असे आमचे स्पष्ट म्हणणे आहे.

ह्या परिपत्रकातील क्रमांक आठचा मुद्दा असा आहे…
८) श्री गणेशाची मुर्ती सार्वजनिक मंडळांकरिता ४ फूट व घरगुती गणपती करीता २ फुटांच्या मर्यादेत असावी.

गणेश चतुर्थी २२ ऑगस्ट २०२० रोजी आहे आणि गणेशोत्सव कसा साजरा करावा? या संदर्भात परिपत्रक दिनांक ८ ऑगस्ट २०२० रोजी निघाले म्हणजे फक्त चौदा दिवस अगोदर. गणेशोत्सवामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना प्रत्येक घरांमध्ये होत असते. ही कोकणवासियांची हजारो वर्षांची परंपरा!
१) त्या परंपरेनुसार गणेश मुर्ती बनविणाऱ्या मूर्तिकारांना किमान तीन महिने अगोदर गणेश मूर्ती घडविण्यातबाबत सांगावे लागते.
२) कोकणामध्ये अनेक घरांमध्ये गणेश मूर्तीची उंची परंपरेनुसार कमी करीत नाहीत.

ह्या दोन गोष्टी पाहिल्या तर जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकातील आठव्या क्रमांकाचा जो मुद्दा दिला आहे तो अयोग्य ठरतो. शासनाला जर गणेश मूर्तीची उंची किती असावी? याबाबत परिपत्रक काढायचे होते तर त्यांनी किमान तीन-चार महिने अगोदर काढणे गरजेचे होते. फक्त चौदा दिवस (आजपासून दहा दिवस) राहिले असताना गणपतीच्या मूर्तीची उंची किती असावी? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी परिपत्रकात मुद्दा नमूद करणे गैर आहे; असे सिंधुदुर्गवासियांचे म्हणणे आहे.

ह्या सर्व गोष्टींचा विचार करता जिल्ह्याधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे की, त्यांनी गणेश मूर्तीच्या उंचीबाबत कोणतीही अट घालू नये; कारण प्रत्येकाच्या घरी विराजमान होणाऱ्या गणपतीची मूर्ती अगोदरच तयार झालेली आहे. या परिपत्रकानुसार घरगुती गणपतीची उंची दोन फुटांपेक्षा अधिक असेल तर ग्रामपातळीवर असणारी ग्राम कमिटी हरकत घेऊ शकते; (काही ग्रामपंचायतींनी तथाकथित आदेश काढण्याचे प्रकार यापूर्वी केले आहेत.) अशावेळी गणेश भक्तांनी काय करावे? दोन फुटांपेक्षा जास्त उंचीच्या ज्या गणेश मुर्त्या तयार आहेत; त्या गणेश मुर्त्यांचे काय करायचे? गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा सांगणारा नियम एवढ्या उशिरा का जाहीर केला? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्टपणे आदेश काढणे गरजेचे आहे!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page