सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती!

कोकणवासियांवर अजून किती अन्याय करणार?
विशेष ट्रेन सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबल्याच पाहिजेत! 
रेल्वे बोर्डाला, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सर्व नेत्यांना विनंती!

कोकणातील जनतेवर अजून किती अन्याय करणार? हा कोकणवासीयांच्या सवाल असून गणेशोत्सवाला कोकणात जाण्यासाठी एसटीची सोय करण्यात आली ती सुद्धा उशिरा! आता विशेष रेल्वेही सुटणार आहेत. तोपर्यंत कर्जबाजारी होऊन चाकरमान्यांनी खाजगी वाहनांनी गावी जाण्याचा एकमेव मार्ग स्वीकारला होता. तरीही एसटीची व विशेष ट्रेनची सोय केल्याबद्दल शासनाचे अभिनंदन!

आज विशेष रेल्वे सोडण्यासाठीचा प्रस्ताव मध्य रेल्वेने केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे; असे समजते. त्यामध्ये खालील प्रमाणे विशेष ट्रेनचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईवरून कोकणात जाण्यासाठी ११ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२० दरम्यान दररोज चार विशेष ट्रेन तर कोकणातून मुंबईत जाण्यासाठी १२ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२० दरम्यान दररोज चार विशेष ट्रेन सुटणार आहेत. ह्या वेळापत्रकामधील ह्या विशेष ट्रेनला कुठे कुठे थांबे दिले आहेत? हे पाहिल्यास अनेक चाकरमानी रेल्वेच्या प्रवासाला मुकणार असे वाटते.

मुंबईतून कोकणात जाणाऱ्या विशेष ट्रेन

०१००३ लोकमान्य टिळक टर्मिनल ते सावंतवाडी ही विशेष ट्रेन २३.५० वाजता सुटणार आहे. ती फक्त रोहा आणि सावंतवाडीलाच थांबणार आहे.
०१०११ छ. शिवाजी महाराज टर्मिनल ते सावंतवाडी ही विशेष ट्रेन २३.०५ वाजता सुटणार आहे. ती फक्त रोहा आणि सावंतवाडीलाच थांबणार आहे.
०२१३३ छ. शिवाजी महाराज टर्मिनल ते सावंतवाडी ही विशेष ट्रेन २२.०० वाजता सुटणार आहे. ती राजापूर, वैभववाडी ह्या महत्वाच्या स्थानकावर थांबणार नाही.
०२२२३ लोकमान्य टिळक टर्मिनल ते सावंतवाडी ही विशेष ट्रेन २०.३० वाजता सुटणार आहे. ती राजापूर, वैभववाडी ह्या महत्वाच्या स्थानकावर थांबणार नाही.

कोकणातून मुंबईत जाणाऱ्या विशेष ट्रेन

०१००४ सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष ट्रेन १३.०० वाजता सुटणार आहे. ती फक्त रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे येथे थांबणार आहे.
०१०१२ सावंतवाडी ते छ. शिवाजी महाराज टर्मिनल ही विशेष ट्रेन १०.०० वाजता सुटणार आहे. ती फक्त रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर येथे थांबणार आहे.
२१३४ सावंतवाडी ते छ. शिवाजी महाराज टर्मिनल ही विशेष ट्रेन ०८.५५ वाजता सुटणार आहे. ती फक्त रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल, ठाणे आणि दादर येथे थांबणार आहे.
०२२२४ सावंतवाडी ते लोकमान्य टिळक टर्मिनल ही विशेष ट्रेन ०७.०० वाजता सुटणार आहे. ती फक्त रत्नागिरी, चिपळूण, रोहा, पनवेल आणि ठाणे येथे थांबणार आहे.

मध्यरेल्वेच्या वरील प्रस्तावानुसार ट्रेन सुरु झाल्या तर अनेकांना ह्या विशेष ट्रेनचा फायदाच होणार नाही. नियमित चालणाऱ्या ट्रेन अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. अशावेळी किमान उशिरा सुरु होणाऱ्या विशेष ट्रेन सिंधुदुर्गातील प्रत्येक स्टेशनवर आणि राजापूर, विलवडे आणि आडवली ह्या स्टेशनवर थांबल्याच पाहिजेत. ह्यासाठी कोकणातील सर्व राजकीय पुढाऱ्यांनी आपआपले सामर्थ्य वापरावे आणि वरील मागणी मंजूर करून घ्यावी! असे आम्ही जाहीर मागणी करीत आहोत!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page