संपादकीय- प्रजासत्ताकाचे यशापयश!
२६ जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन! १९५० पासून आजपर्यंत आणि भविष्यात येणाऱ्या सगळ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस! १५ ऑगस्ट १९४७ च्या स्वातंत्र्य दिनानंतर २६ जानेवारी १९५० हा दिवस ७५ वर्षांपूर्वी भारतीयांच्या जीवनात आला. जो काही स्वातंत्र्य संग्राम झाला, तत्पूर्वी सामाजिक क्रांती झाली; त्याचा तो परिणाम होता. त्यासाठी अगणित क्रांतीकारांना – समाज सुधारकांना बलिदान द्यावे लागले. देशासाठी समर्पण हा उच्च कोटीचा भाव जपल्यानंतरच भारताला भव्यदिव्य यश प्राप्त झाले; नव्हे मिळविले गेले! त्या प्रजासत्ताकाचे यशापयश प्रत्येक दिवशी तपासावे लागेल! तपासताना राजकीयवाद, सत्तांधता, धर्मांधता, जातीयवाद, प्रांतवाद प्रामाणिकपणे बाजूला ठेवले गेले पाहिजेत. लोकशाहीला घातक असणारे हे घटक जर प्रजासत्ताकाला प्रभावित करीत असतील तर ते प्रजासत्ताकाचे अपयश नाही का? घातक घटकांचा वाढता प्रभाव हा प्रजासत्ताकाला हानिकारक असतो आणि गेल्या ७५ वर्षात ह्याच घातक घटकांनी बाजी मारली आहे का? तर कमीअधिक प्रमाणात त्याचे उत्तर `होय’ असेच आहे!
प्रजासत्ताकाची रचना संविधानावर आधारित आहे. मात्र ती आपल्या स्वार्थी फायद्यासाठी कशी फलद्रुप होईल; हे राजकीय पक्षांनी पाहिले. एका सत्ताधारी पक्षाने केलेल्या चुकीच्या कारभारातून निर्माण झालेला राक्षस संपविण्याऐवजी दुसऱ्या राजकीय पक्षाने तो वाढविला. तो घटनाविरोधी- प्रजासत्ताक विरोधी राक्षस इतका मोठा झाला की त्याने राजकीय पक्षांच्या सत्ता मिळविण्याच्या महत्वाकांक्षाने धर्मांधता, जातीयता आणि प्रांतवादाला खूप मोठे केले. त्यामुळे शासन देशातील १४० पैकी ८० कोटी जनतेला शिक्षण, आरोग्य योग्य पद्धतीने देऊ शकत नाही. ८० कोटी जनतेला सडलेले- किडलेले पाच किलो धान्य मोफत देण्याची व्यवस्था निर्माण करावी लागते; हे दुर्दैव आहे. शुद्ध पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी आजही जनता तडफडत आहे. त्यामुळे आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या तंत्रज्ञानात जरी आपण आघाडी घेतली तरी ८० कोटी जनतेच्या प्रश्नांपुढे ती प्रगती निष्प्रभ ठरत आहे.
राजकारणातील बकासुरांची निर्मिती हे प्रजासत्ताकाचे फळ नाही. संविधानाचा गैरवापर करून जी राक्षसी भ्रष्ट यंत्रणा सगळ्यात क्षेत्रात उभी राहिली आहे ती आजच्या लोकशाहीला गिळंकृत करीत आहे. `गावागावात ही लोकशाही जीवंत आहे’ हे म्हणणे धाडसाचे होईल! प्रजासत्ताकामध्ये प्रजेला मुखी, बहिरी, आंधळी ठेवण्यासाठीच राजकीय पक्षांचे राजकारण होत आहे; हे अपयश झाकून ठेवून देश सामर्थ्यशाली होत असल्याचे स्वप्न सत्यात उतरणार कसे?
अजूनही वेळ गेलेली नाही. संविधानकारांनी आम्हा भारतीयांसाठीची मार्गदर्शक तत्वे बहाल केली आहेत. त्या नीतिमान तत्त्वांच्या आधारेच भारत सामर्थ्यशाली होऊ शकतो. जे काही हाताच्या बोटावर मोजणे एवढे प्रामाणिक कार्यक्षम, आदर्श व्यक्तिमत्व देशासाठी समर्पित भावनेने कार्य करीत आहेत; ते प्रजासत्ताकाचे यश आहे! त्या यशाला आदर्श मानून भारताने वाटचाल केल्यास भारत जगात विश्वगुरू ठरेल!
प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो!
-नरेंद्र हडकर