संपादकीय- मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनीच!
आपल्या मानवी शरीरात `आत्मा’ आहे; तोपर्यंत आपण जीवंत असतो. चैतन्यमयी आत्मा जाक्षणी शरीर सोडून जातो त्याक्षणी आपल्या देहाची हालचाल थांबते आणि त्या बॉडीवर अंत्यसंस्कार करावे लागतात!
हा ‘आत्मा’ त्या ‘आत्मारामा’शी अर्थात परमात्म्याशी संलग्नित आहे. परमात्म्याचा अंश म्हणजेच मानवाचा आत्मा! एवढं ज्ञान आपणास असतं. ह्या आ`त्मा’ शब्दामध्ये ‘मत’ हा शब्द आपणास स्पष्टपणे दिसतो. ज्याक्षणी आत्मा देहाला सोडून जातो त्याचक्षणाला त्या देहाची बॉडी होते व ती बॉडी `मत’ देण्यास व `मत’ व्यक्त करण्यास असमर्थ ठरते. म्हणूनच आत्म्यामध्ये `मत’ आहेच आणि मतामध्ये `आत्मा’ असतोच!
आपण जेव्हा आपलं मत मांडतो, जेव्हा निवडणुकीमध्ये मत देतो; तेव्हा ते मत आपल्या आत्म्याशी निगडित असतं. म्हणूनच मत मांडताना, मत देताना आपण आपल्या स्वस्वार्थापेक्षा देश व समाज हित जपले पाहिजे.
आमचे `मत’ त्या परमात्म्याशी, आम्ही ज्या देवाला मानतो त्या देवाशी जोडलेले असते. तोच माझा आत्मा असतो; हे जाणून घेतले पाहिजे. आजकाल निवडणुकीमध्ये मतं विकत घेतली जातात, तसेच मतांसाठी पैसे घेतले जातात. मतं विकत देण्याघेण्याची खूप मोठी दळभद्री व देश विघातक, देशद्रोही, समाजद्रोही आणि परमात्मा विरोधी यंत्रणा उभी राहिली आहे. मतं विकत घेण्यासाठी गावागावात, गल्लीगल्लीत राजकीय पक्षांनी माणसं तयार केली आहेत. हेच राजकीय कार्यकर्ते ह्या नावाने समाजात वावरत असतात. मत विकणारा मतदार ते मत विकत घेणारा उमेदवार किंवा राजकीय पक्ष ह्या यंत्रणेमध्ये जे जे कोणी सहभागी असतात त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवली पाहिजे की, आपण त्या परमात्म्याचा अंश असणाऱ्या अनेक आत्म्याशी सौदा करीत असतो. हे पाप सगळ्या पापांपेक्षा खूप मोठे आणि कधीही न संपुष्टात येणारे आहे! यामध्ये जे सामील असतात- होतात ते आपल्या स्वतःच्या आयुष्यात व आपल्या कुटुंबियांच्या आयुष्यात, पुढील पिढ्यांच्या आयुष्यात न संपुष्टात येणारे पाप आणून ठेवत असतात. त्याचा भयंकर मानसिक, आर्थिक, सामाजिक त्रास त्यांना होणार असतो. त्यांच्या जीवनात सुख- शांती नष्ट होते. सुखाचं जगणं आणि सुखाचं मरण दोन्ही येत नाही. कारण परमात्म्याचा अंश असणाऱ्या आत्म्याला विकण्याचे व विकत घेण्याचे भयंकर पाप घडलेले असते!
आम्हाला मत देण्याचा अधिकार संविधानाने दिला. हे संविधान लागू होण्यापूर्वी स्वातंत्र्याच्या लढाईत लाखो -करोडो व्यक्तींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांची कुटुंब, त्यांचे संसार उध्वस्त झाले. त्यांचे आई-वडील, त्यांची मुलं यांनी जे सोसलं ते भयंकर होते. त्याची कल्पनाही आम्ही करू शकत नाही. देशाच्या संरक्षणासाठी आजपर्यंत अनेक सैनिकांनी प्राणांची आहुती दिली आणि आहुती देण्यास सज्ज असतात. त्यांच्या कुटुंबाला काय दुःख होत असेल याचा आपण विचार केला पाहिजे. ह्या सगळ्यांचे देशासाठीचे समर्पण कधीच विसरता येणारं नसतं. त्या समर्पणशी जर आम्ही कृतघ्न झालो तर… त्या सर्वांचे दुःख, त्यांच्या वेदना शाप म्हणून मतांचा बाजार मांडणाऱ्यांवर होतोच. हे सदैव लक्षात ठेवले पाहिजे. म्हणून आपले मत कोणालाही विकू नका व दुसऱ्याचे मत विकत घेण्याच्या यंत्रणेत सामील होऊ नका! अन्यथा ती देशाची गद्दारी ठरेल, ती आत्माशी, परमात्म्याची गद्दारी ठरेल- कृतघ्नता ठरेल!
घरात देवाचे फोटो लावून, देवाची भक्ती करून, मंदिरामध्ये देवाचे दर्शन करून, पूजा- पाठ- नामस्मरण- भजन- कीर्तन- उपवास करून, तिर्थस्थानी जाऊन त्या परमात्म्याची कृपा मिळू शकते. पण ती कृपा मतांच्या बाजार मांडणाऱ्यांच्या जीवनात कधीच प्रवेश होऊ शकत नाही. कितीती देवाची भक्ती केली तरी ती फलदायी होऊ शकत नाही. म्हणूनच मतांच्या बाजारापासून दूर राहिले पाहिजे. आपले मत विकू नका आणि कोणाची मत विकत घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील होऊ नका! हा शहाणपणा जपता आला पाहिजे! मतांचा बाजार मांडणारे पापाचे धनी होणारच आणि त्यातून त्यांची सुटका कदापिही होऊ शकत नाही! हा सृष्टी चालविणाऱ्याचा नियम समजून घेतलाच पाहिजे!
– नरेंद्र हडकर