मैत्रीचा समर्थ आधार असलेल्या `मायकल’ला वाढदिवसाच्या शुभेच्छा!

सदैव स्मरणात असणाऱ्या आमच्या एका मित्राचं नाव आहे; मायकल परेरा!

पराकोटीच्या जिवाभावाची मैत्री जपणारा, मैत्री फुलविणारा आमच्या ह्या लाडक्या दोस्ताचा आज वाढदिवस! त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! त्याला त्याच्या निरंतर जीवनात सुख, समाधान, आनंद, यश, सुकीर्ती, धन, ऐश्वर्य आणि सदृढ आरोग्यासह दिर्घायुष्य लाभो; ही ईश्वर चरणी प्रार्थना!

मायकलने इएसआयएसमध्ये ३५ वर्षे नोकरी केली. त्या काळात त्यांने अनेकांशी मैत्रीचे बंध जुळविले आणि ते आजतागायत जपले. आपल्या सहकाऱ्यांवर मनापासून प्रेम केले, अडचणीत असलेल्या मित्रांना नियमांच्या पलीकडे जाऊन जेवढे जमेल तेवढे सहकार्य केले. कोणाचेही काम अडत असेल तर त्यातून मार्ग काढण्याचे कसब त्यांनी दाखविले. वेगवेगळ्या क्षेत्रातील अनेक मित्रांच्या विश्वासाहर्तेमुळे त्यांनी आपल्या शब्दावर अडचणीत असलेल्या मित्रांची कामे केली. नेहमीच सहकार्याच्या भावनेतून वावरणारा आणि सहकार्याची भावना समोरच्याचे काम करून कृतीत प्रकट करणारा मायकल खरोखरच एक अफलातून आदर्श व्यक्तिमत्व!

ह्या व्यक्तिमत्वाने दुर्धर आजारावरसुद्धा मात केली. कुठल्याही संकटात मैत्रीची माया रामबाण औषधासारखी कार्य करते; ते मायकलने दाखवून दिले. असा मित्र आयुष्यात मिळणं भाग्याची गोष्ट असते. ते भाग्य आमच्यासारख्या मायकालच्या कित्येक मित्रांना लाभले. २१ सप्टेंबर २०११ रोजी मायकलच्या सर्व मित्रांनी मायकलचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्याबद्दल गेल्यावर्षी मायकलने सविस्तर लेख लिहून सुंदर वर्णन केले होते. शब्दांमधून आपल्या मित्रांबद्दलच्या व्यक्त केलेल्या भावना वाचल्यास आजही मन भरून येते.

प्रचंड वाचन करून मायकलेने ज्ञान प्राप्त केले. शासनाचे नियम-कायदे सर्वकाही मायकलच्या तोंडपाठ! त्यामुळे नियमांच्या अडचणीत सापडणाऱ्या सहकाऱ्यांना मायकल नेहमीच आधार ठरला. हा आधार नोकरीत असताना होता आणि आजही आहे. मैत्रीचा समर्थ आधार म्हणजेच मायकल असं माझं प्रांजळ मत! त्या मैत्रीच्या समर्थ आधाराला पाक्षिक `स्टार वृत्त’ परिवाराकडून वाढदिवसाच्या पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा!

-मोहन सावंत
सहसंपादक- पाक्षिक `स्टार वृत्त’

You cannot copy content of this page