संपादकीय- गांधी विचारांचे `अमरत्व’!
भेकड हल्ल्याने गांधी विचार कधीच संपणार नाही!
उलट गांधी विचारांचे `अमरत्व’ अधिकाधिक समर्थ होईल!
महात्मा गांधींचा विचार गांधींची हत्या करूनही संपुष्टात आणता आले नाहीत. एवढेच नाही तर गेली ७०-८० वर्षे गांधींच्या प्रतिमेवर हल्ल्या करण्यात येतो; गांधी विचारांची पुन्हा पुन्हा हत्या केली जाते; पण गांधी विचारांचा प्रभाव आणि गांधी विचारांचा प्रसार कधी थांबला नाही आणि पुढे थांबणार नाही; हे सत्य आहे! मानवी देहाला गोळ्या मारून किंवा अन्य हत्याराने मारता येऊ शकते; पण गांधी विचारांना मारणार कसे? ह्या प्रश्नाचे उत्तर तथाकथित गांधी विचार विरोधकांना गेली सात-आठ दशकं सापडत नाही. हा त्यांचा पराभव त्यांनी मान्य करायला पाहिजे. मात्र हा पराभव ते मान्य करणार नाहीत. कारण ती मानवतावादी वैचारिकता जपण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. कोणत्याही हल्ल्याने गांधी विचार संपुष्टात येणार नाहीत; उलट गांधी विचारांचे अमरत्व अधिकाधिक सामर्थ्यशील होत जाईल!
महात्मा गांधींची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याचे विचार- याचा आदर्श किती जरी राष्ट्रहिताचा वाटत असला तरी असे वाटणाऱ्यांनी गांधी हत्येचं समर्थन करणे म्हणजेच मानवता धर्म न जपणे होय! गांधींच्या विचारांना विचारांच्या माध्यमातून विरोध करण्याची भूमिका घ्यायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; जे कालही होते, आजही आहे आणि उद्याही असेल. परंतु गांधी विचाराला विरोध करण्यासाठी गांधींना ठार करणे, गांधी विचारांचा प्रसार करणाऱ्यांवर हल्ला करणे ही नथुरामची खुनशी मानसिकता झाली आणि अशा खुनशी मानसिकतेला कोणत्याही राजकीय पक्षाच्या सरकारने थांबविणे महत्त्वाचे ठरतं.
महात्मा गांधींना जाहीररीत्या विरोध करणे; कोणत्याही पक्षाच्या सरकारला काळिमा फासणारे ठरेल. ते त्यांना परवडणारे नसते. म्हणूनच सत्ताधारी नेहमीची महात्मा गांधींची प्रतिमा, महात्मा गांधींचा विचार घेऊन कार्य करीत असल्याचा देखावा करतात. त्यात ते कमी पडत नाहीत. तर दुसरीकडे गांधींच्या विचारांचा प्रसार करणाऱ्या आणि ते गांधी विचार जीवनात आणणाऱ्या विद्वान व्यक्तींना मात्र लक्ष्य केले जाते. त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला जातो. हे भारताच्या प्रतिमेला काळिमा फासणारे कृत्य आहे. काहीजण महात्मा गांधींचा मारेकरी नथुरामची मनोभावे पूजा करण्यात मग्न झालेले आहेत. नथुरामच्या विचारांचा जाहीरपणे समर्थन करण्यात धन्यता मानत आहेत. असं करणाऱ्यांच्या वैचारिकतेवर प्रश्न चिन्ह उभा राहतो. पण गांधी विरोध करतो म्हणून त्यांच्यावरचा जीवघेणा हल्लाही लोकशाहीत समर्थनीय नाही. मग गांधी विचार मानणाऱ्यांवर होणारा हल्लाही समर्थनीय असूच शकत नाही. किमान ह्या सचोटीवर सरकारने दृढ राहिले पाहिजे.
महात्मा गांधी विचारांचे सामर्थ्य भारतानेच नव्हे तर संपूर्ण जगाने स्वीकारले आहे. त्या सामर्थ्याचा पाडाव करण्याची ताकद कोणातच नाही. भारत भूमीमध्ये गांधी विचार रुजता कामा नये, फुलता कामा नये, बहरता कामा नये; म्हणून अनेक गैर, हिंसक, अमानवी गोष्टी घडविण्यात आल्या आणि यापुढेही घडविण्यात येतील. तरीही गांधी विचार अधिकाधिक जनतेच्या मनात दृढ होऊन राहिला आहे. काही तथाकथित लोंकांना गांधी विचारांची भीती वाटते. त्या लोकांना नेहमीच वाटत आलं आहे की, महात्मा गांधींच्या विचारांमुळे त्यांना त्यांच्या राक्षसी धर्मांधता, जातीयता, हुकूमशाही अंमलात आणता येणार नाही. मग आपल्या छुप्या समर्थांकरवी गांधी विचारांचे विरोधक प्रकट होत असतात.
पुण्यातील हेरंब कुलकर्णी हाच गांधी विचार जपून अनेक वर्षे कार्य करीत आहेत. व्यक्त होत आहेत. ते मुख्याध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना सुसंस्कारित करीत आहेत. तर शाळेच्या बाजूला कायद्याविरोधी गुटका विक्री थांबविण्यासाठी घेतलेली भूमिका त्यांच्या जीवावर बेतणार होती. गुटखा विक्रेत्याने त्यांच्यावर हल्ला करण्याचा खुनशी खेळ खेळून समाज व्यवस्थेला, शासन व्यवस्थेला आव्हान दिले आहे. तर संकेत मुनोत हे उच्चशिक्षित युवक महात्मा गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन गांधी विचारांचा समर्थपणे प्रसार करीत असतात. त्यांच्यावरही गांधींच्या आदर्श विचारांचा प्रसार न करण्यासाठी धमकावले जाते. हा सुद्धा हल्लाच आहे. अशाप्रकारे महात्मा गांधींच्या विचारांना रोखणाऱ्या तथाकथित विचारसरणीच्या लोकांना रोखण्याचे सामर्थ्य सरकारने दाखविले पाहिजे. कारण गांधी विचारानेच भारतानेचच नव्हे तर विश्वाचे कल्याण होऊ शकते! तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर असलेल्या जगाला महात्मा गांधींचेच विचार तारू शकतात! ते विचार जपण्यातूनच भारत `विश्वगुरु’ होऊ शकतो! हे वास्तव आहे!!