हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा जाणता छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा!

आजच्या दिवशी जिजाऊ मातेच्या उदरी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि खऱ्या अर्थाने रयतेला जाणता राजा मिळाला. रयतेला फुलासारखा जपणारे, परकीय आक्रमणापासून रयतेचे रक्षण करणारे, स्वतः पालकत्वाची जबाबदारी स्वीकारून रयतेसाठी तलवार हाती घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज हे जगाच्या इतिहासात सर्वोच्च स्थानावर आहेत. आजही छत्रपती शिवाजी महाराज आमच्या मनात-आमच्या हृदयात आहेत, आमच्या देहात स्थिर झाले आहेत. आदिमाता जगदंबेवर पूर्ण श्रद्धा व दृढविश्वास असलेल्या महाराजांनी ‘स्वराज्य’ स्थापन केले ते रयतेचं!

रयतेला मानाचे स्थान मिळवून दिले. कधीही धर्म, जात, आर्थिक कुवत, शिक्षण न पाहता स्वराज्यासाठी महाराजांनी कार्य केले. स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावलं आणि जे मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व पणाला लावून लढले त्यांच्या योगदानाला उचित सन्मान दिला.

आजच्या राजकीय-सामाजिक परिस्थितीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचा कारभार अधिक उजळून दिसतो. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर…? शिवाजी महाराजांचे स्वराज्य असते तर…? जाणत्या राजाचे ”स्वराज्य” नाही म्हणूनच आज लोकशाहीमधील रयत नाडली जात आहे. आज रयत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे वर्णन ऐकून समाधान मानू शकते; पण प्रत्यक्षात रयतेचा राजा म्हणून घेण्यास कोणताही ‘राजा’ पात्र ठरत नाही; ही शोकांतिका आहे!

लोकशाहीमध्ये रयत ठरवते आपला राजा (सरकार) कोण असावा? पण ह्याच रयतेच्या बुद्धीवर आभासी कल्याणाची गोधडी अंथरली जाते. त्याला खरं काय ते न सांगता ‘खोटं’ खरं म्हणूनच सांगून फसविलं जातं. सत्ता मिळविण्याच्या आणि टिकविण्याच्या लालसेने रयतेला जमेत धरलं जातं. जनतेला आज काडीची किंमत नाही म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचे `स्वराज्य’ आजही आम्हाला हवं हवंसं वाटतं!

रयतेच्या गुराढोरांनाही त्रास होऊ नये, शेतकऱ्यांच्या शेतीला-वृक्षांना संरक्षण मिळावं म्हणून महाराजांनी कार्य केलं. पण आज रयतेच्या जीवाशी रक्तरंजित खेळ खेळला जातो म्हणूनच आम्हाला आमचा जाणता राजा हवाय; कोणताही स्वार्थ मनात न ठेवता प्रामाणिकपणे आम्हा रयतेचं संरक्षण करणारा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *