सिंधुदुर्गवासियांनो गणेशोत्सव कुटुंबापुरताच मर्यादित ठेवा…
संपूर्ण जगात कोरोना महामारीचे खूप मोठे संकट उभे राहिले आहे.
आजपर्यंत जगभरात ७ लाख ७१ हजार ६३५ लोकांचा मृत्यू ह्या महामारीने झाला आहे. तर २ कोटी १७ लाख ५६ हजार ३५७ लोकांना संसर्ग झाला आहे.
भारतात आजपर्यंत २७ लाख ६७ हजार २७३ लोकांना संसर्ग झाला आहे. त्यातील २० लाख ३७ हजार ८७० लोक संसर्गातून मुक्त झाले असून अद्यापही ६ लाख ७६ हजार ५१४ कोरोना बाधित रुग्ण देशात आहेत. तर ५१ हजार ७९७ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
महाराष्ट्रात ६ लाख १५ हजार ४७७ लोकांना संसर्ग झाला असून त्यातील ४ लाख ३७ हजार ८७० लोक संसर्गातून मुक्त झाले असून अद्यापही १ लाख ५६ हजार ९२० कोरोना बाधित रुग्ण देशात आहेत. तर २० हजार ६८७ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
सिंधुदुर्गात ६८५ लोकांना संसर्ग झाला आहे. त्यातील ४५६ लोक संसर्गातून मुक्त झाले असून अद्यापही २१५ कोरोना बाधित रुग्ण जिल्ह्यात आहेत. तर १४ व्यक्तींचा मृत्यू कोरोनाने झाला आहे.
अनेक डॉक्टर, पोलीस, पत्रकार, नामांकित व्यक्ती, तसेच सर्व वयातील व्यक्तींचा कोरोनाच्या संसर्गाने मृत्यू झालेला आहे. त्याचप्रमाणे ८० टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग होऊन सुद्धा लक्षणे दिसत नाहीत. अशाप्रकारे कोरोनाच्या महामारीची व्याप्ती पाहिल्यास ह्या संकटातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे ह्या महामारीला रोखणारी प्रतिबंधक लस लवकरात लवकर यायला हवी. तोपर्यंत शासनाचे नियम पाळणे, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे आणि इतरांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून सतर्क राहणे महत्वाचे ठरते; म्हणून आपण जे काम करतोय किंवा ज्या पदावर आपण आहोत तिथूनच प्रत्येकाने ही बंधने पाळणे महत्वाची ठरतात.
२२ ऑगस्ट २०२० रोजी गणेशोत्सव आहे. कोकणामध्ये विशेषतः सिंधुदुर्गात घरगुती गणेशोत्सव मोठ्या उत्साहात श्रद्धेने साजरा होत असतो. सुमारे ७० हजार घरगुती तर सुमारे ४० ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होत असते. त्यावेळी एकत्रित येऊन आरती, भजन, फुगड्या, नाटक असे आध्यात्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. कोरोनाच्या महासंकटात दोन किंवा जास्त कुटुंबातील व्यक्तींनी एकत्र येणे प्रत्येकाने टाळलेच पाहिजे. अन्यथा खूप मोठा धोका निर्माण करण्यास आपण जबाबदार राहणार आहोत. सिंधुदुर्गच्या सन्मानिय जिल्हाधिकाऱ्यांनी यासंदर्भात स्पष्टपणे जाहीर सूचना केल्या आहेत. तरीही काहीजण ह्या नियमांची पायमल्ली करू शकतात; हे नाकारता येत नाही. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी, पोलीस यंत्रणेने आणि गावातील ग्रामपंचायतीने सतर्क राहिले पाहिजे. ज्या गावात किंवा गावातील ज्या वाडीत अशाप्रकारे अनेक व्यक्ती एकत्र येऊन आरत्या-भजने किंवा इतर कार्यक्रम करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे आदेश काढावेत.
कारण प्रत्येक घरात वृद्ध आहेत, लहान मुलं आहेत, गरोदर स्त्रिया आहेत, इतर आजार असणाऱ्या व्यक्ती आहेत. त्यांना जर संसर्ग झाला तर ते त्यांच्या जीवावर बेतू शकते. आपल्या जिल्ह्यात वैद्यकीय सुविधा किती आहेत, हे प्रत्येकाला माहीतच आहे. असे असताना गणेशोत्सव कुटुंबापुरता मर्यादित ठेवणे महत्वाचे आहे. त्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना आमच्यासाठी महत्वाच्या ठरतात.
आपल्या प्रत्येकाचा जीव महत्वाचा आहे. पुढच्या वर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करता येईल. पण गेलेला जीव पुन्हा येणार नाही. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा सिंधुदुर्गात कोरोनाचा संसर्ग वाढल्याशिवाय राहणार नाही आणि त्यात अनेकांचे जीव जाऊ शकतात. ह्या वर्षी घरगुती गणेशोत्सव कुटुंबापुरताच मर्यादित ठेवण्याचे बंधन पाळायला हवे. तरच आपण पुढच्या वर्षी `गणपती बाप्पा मोरया… मंगलमूर्ती मोरया…’ चा गजर आनंदात जोरदारपणे करू शकू! सुख देणाऱ्या आणि दुःखाचे हरण करणाऱ्या गणेशाचे पूजन बुद्धी शाबूत ठेऊन करूया! बुद्धीची देवता म्हणूनही गणेशाला आपण भजतो; त्या बुद्धीचा वापर करून कोरोनाचा संसर्ग होणार नाही ह्याची दक्षता घेऊ!
-नरेंद्र हडकर