संपादकीय- निष्ठावंत कोहिनुर काळाच्या पडद्याआड!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, लोकसभेचे माजी अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री मनोहर जोशीसरांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. तेव्हाचे महाराष्ट्राचे राजकारण पाहता कोणालाही शिवसेनेचा पहिला मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणं सोपं नव्हतं! पण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर सर्वोच्च निष्ठा ठेऊन मनोहर जोशी सरांनी केलेली राजकीय वाटचाल दैदिप्यमान होती. मुख्यमंत्री पदावर असताना जावयाला भूखंडाचा लाभ मिळवून देण्याचा कथित आरोप त्यांच्यावर होताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जोशीसरांना चिठ्ठी पाठवत राजीनामा देण्यास सांगितले. हा आदेश तात्काळ अंमलात आणत काही तासात राजीनामा देणारे जोशीसर आजच्या दगाबाजीच्या राजकारणात नक्कीच निष्ठेचा तेजस्वी कोहिनुर ठरतो. असा हा निष्ठावंत कोहिनुर काळाच्या पडद्याआड गेलाय! त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांच्या राजकीय वाटचालीस नक्कीच सलाम करावा लागेल.

वयाच्या ८६ व्या वर्षी जोशीसरांची प्राणज्योत मावळली असली तरी त्यांनी राजकारणात बाळासाहेबांवर केलेले अतोनात प्रेम, बाळासाहेबांवर अर्थात शिवसेनेवर दाखविलेली निष्ठा आणि केलेली प्रचंड मेहनत वाखाण्याजोगी आहे. ते सर्व काही विस्मरणात जाणारं नाही. २ डिसेंबर १९३७ रोजी जन्माला आलेले मनोहर जोशीसरांचे लपण अतिशय गरिबीत गेले. त्यांना दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. पनवेलमध्ये महाजन नावाच्या शिक्षिकेने त्यांना सात घरांत नेऊन सात जेवणांची सोय केली. पाचवीच्या वर्गात असताना ते स्वतःच्या पायांवर उभे राहिले. काही दिवस भिक्षुकी केली. त्यानंतर मुंबईत आल्यावर महापालिकेत त्यांनी ॲक्टिंग असिस्स्टंट टेंपररी क्लार्कच्या पदावर नोकरी केली. पण नोकरीत त्यांचे मन रमले नाही. त्यांनी लहानमोठे व्यवसाय केले. पुढे कोहिनूर नावाने शिकवणीचे वर्ग सुरू केले. ह्याचदरम्यान शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट झाली आणि ते राजकारणात आले. मग मात्र त्यांनी मागे वळून पहिले नाही. नगरसेवक, मुंबईचे महापौर, विधानसभेत विरोधी पक्ष नेते असा प्रवास करीत युती सरकारच्या काळात १४ मार्च १९९५ ते ३१ जानेवारी १९९९ या काळात महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९९९ ते २००२ ह्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात ते मंत्री राहिले. तर २००२ ते २००४ ह्या काळात लोकसभेचे अध्यक्षही झाले. ही सर्व पदे बाळासाहेबांवरील निष्ठेने, प्रामाणिक कार्याने आणि अभ्यासू वृत्तीने मिळाली. त्यांनी अनेक शैक्षणिक संस्था उभारल्या. त्यामध्ये कोहिनुर क्लासेस, मनोहर जोशी कॉलेज ऑफ आर्ट्‌स, सायन्स ॲन्ड कॉमर्स (धारावी-मुंबई), कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, कोहिनूर हॉटेल मॅनेजमेन्ट ॲन्ड टूरिझम कॉलेज ह्या संस्था आहेत. त्यांनी `आयुष्य कसे जगावे?’ हे पुस्तकही लिहिले आहे.

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केल्यावर पहिल्या फळीतील शिवसैनिक म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली आणि शिवसेनेला मिळालेली सर्वोच्च पदेही त्यांना बाळासाहेबांनी दिली. पण बाळासाहेबांच्या निधनानंतर आधुनिक शिवसेनेत त्यांनी केलेली टिपण्णी पक्ष नेतृत्वाला आवडली नाही. त्यामुळे ऑक्टोबर २०१३ च्या शिवाजी पार्क इथे झालेल्या दसरा मेळाव्यात मनोहर जोशीसरांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. त्यामुळे त्यांनी हल्ली राजकारणात थोडेसा अलिप्तवाद स्वीकारला; तरी शेवटपर्यंत त्यांनी पक्षावरील निष्ठा डगमगू दिली नाही. शिवसेनेचे दोन गट तयार झाले तरी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मागेच उभे राहणे पसंत केले. राजकारणात निष्ठा ठेवून आणि बंडखोरी करून सर्वोच्च पदे मिळविता येतात. पण मनोहर जोशीसरांनी निष्ठेवर विश्वास व श्रद्धा ठेवली. अशा यशस्वी राजकारणी नेतृत्वाला सलाम!


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिलेली श्रद्धांजली…

 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहिलेली श्रद्धांजली…

You cannot copy content of this page