संपादकीय- शेतकरी समर्थ झाल्यास देश समर्थ होईल!

देशाच्या सीमांवरती देशाच्या शत्रूंविरोधात युद्धासाठी सदैव सज्ज असणारा सैनिक हा देशासाठी महत्वाचा असतो आणि असलाच पाहिजे. कोणत्याही देशाचे सामर्थ्य सैनिकांच्या कामगिरीवर अवलंबून असते. अशा सैनिकांबाबत देशवासियांच्या भावना जोडलेल्या असतात. त्याचप्रमाणे देशातील तेवढाच महत्वाचा घटक म्हणजे देशातील शेतकरी. हाच मायबाप शेतकरी देशातील करोडो जनतेचे पोशींदे असतात. भारत सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समर्पणावर समर्थ झाला आहे. हे सर्व राजकीय पक्षांनी, राज्यकर्त्यांनी आणि देशातील जनतेने मान्य करायला पाहिजे. म्हणूनच सैनिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्य क्रमाने सोडविल्या पाहिजेत. पण तसे होत नाही हीच खेदाची बाब आहे. सत्तेवर कोणत्याही पक्षाचे सरकार असो; सैनिकांना आणि शेतकऱ्यांना योग्य न्याय मिळाला नाही; हे वास्तव दडविता येणार नाही. अग्निविरसारखी योजना आणून सत्ताधाऱ्यांनी सैनिकांचे केलेले खच्चीकरण मान्य होणारे नाही. तर देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्या नेहमीच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची दाहकता स्पष्ट करतो.

आज पुन्हा आपल्या मागण्या घेऊन शेतकरी दिल्लीला धडक देण्यास सज्ज झालेला असताना त्यांना रोखण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी केलेल्या उपाययोजनाचे चित्र भयावह आहे. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांबरोबर सर्व सुरक्षा दले, सीमेवरील सैनिक यांना उभे करण्यात आले आहे. ह्यातून जो संघर्ष उभा राहील तो देशाला परवडणारा नसेल. ह्याचे भान सत्ताधाऱ्यांनी ठेवलेच पाहिजे. शेतकऱ्यांविरोधी कायदे शेवटी सरकारला मागे घ्यावे लागले; ही शेतकऱ्यांची ताकद सरकार कशी काय विसरू शकते? गेल्या ७५ वर्षात अनेक पक्षांची सरकारे आली आणि गेली. मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा जो प्रकार झाला तो वेदनादायी होता. त्याची भरपाई करण्याची संधी मोदी सरकारने करून शेतकऱ्यांना न्याय दिलाच पाहिजे.

शेतकऱ्यांच्या सर्वच मागण्या मान्य करता येणार नाहीत. पण जी सरकारने आश्वासने दिली होती त्याची पूर्तता करणे; महत्वाचे ठरते. हा देश कष्टकऱ्यांचा आहे. त्यांच्या घामातून निर्माण होणारे श्रममूल्य देशाला समर्थ करते. म्हणूनच शेतकऱ्यांचा प्रश्न चिघळता कामा नये. राज्यकर्ते आपल्याला न्याय देतील; असे किमान शेतकऱ्यांना वाटले तरी पाहिजे. ही विश्वासाहर्ता सरकार निर्माण करू शकत नाही म्हणूनच पुन्हा देशात शेतकऱ्यांचे आंदोलन धडकी भरविणारे आहे आणि त्यांना अटकाव करण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजना हिंसेकडे घेऊन जाणाऱ्या आहेत.

शेतकरी जगालाच पाहिजे, नव्हेतर स्वाभिमानाने तो उभा राहिला पाहिजे. तरच देश खऱ्या अर्थाने समर्थ होणार आहे. शेतकऱ्यांचे खच्चीकरण करून देश समर्थ करण्याचा विचार देशाला परवडणारा नाही. कारण ह्यात तथ्य नाही. शेतकऱ्यांच्या वाजवी मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात; हीच अपेक्षा देशातील १४० कोटी जनतेची आहे.

You cannot copy content of this page