आध्यात्मिक भजनाचा खराखुरा `नंदादिप’ कोकणाला गवसला!

भजन म्हणजे परमात्म्याचे नामस्मरण, परमात्म्याचे गुणसंकिर्तन, परमात्म्याची प्रार्थना, परमात्म्यावर प्रेमभाव प्रकट करण्याचा मार्ग आणि तो काव्यात्मक, संगीतमय आहे. परमात्म्याच्या भक्तीमध्ये भजनाला महत्वाचे स्थान आहे. भगवंतांच्या स्तुतीपर काव्यरचना साग्रसंगीत म्हणून देवाला भजणे किंवा आळविणे म्हणजे भजन होय! भजन हे संगीत, शब्द आणि भावना यांचे मिश्रण असते. भजन योगसाधनेतील भक्तियोगाचा एक भाग आहे. भजनाला महाराष्ट्रात लोककला म्हणूनही पाहिले जाते. संतपरंपरेतील श्री संत ज्ञानेश्वर महाराजांपासून संत तुकाराम महाराजांपर्यंत आणि संत रामदास स्वामी पासून गाडगे महाराजांपर्यंत सर्व संतांनी अनेक भजने तयार केलीत. शब्द, अर्थ, विचार, संगीत – स्वर, ताल, लय, वाद्य, टाळ ह्या सर्वांच्या एकत्रीकरणातून मानवाला परमात्म्याच्या साधनेत एकाग्रतेनं मग्न होता येतं; ह्याला भजन म्हणतात. भजनाला संगीताच्या स्वरांची आणि नादमयतेची साथ असते.

अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक व सामाजिक प्रबोधन करणारी भजनाची परंपरा कोकणामध्ये आहे. संतपरंपरेतून खऱ्या अर्थाने भक्तीबरोबर सामाजिक क्रांतीही झाली आणि ते सगळं अभंगातून मांडलं गेलं! तेच अभंग भजनातून गायले गेले! भजनाचा खराखुरा अर्थ समजून घेतला तरच भजनाची मुळ आणि खरी परंपरा खऱ्या अर्थाने टिकून राहील!

भजनमहर्षी परशुराम पांचाळ बुवा, काशीराम परब बुवा, विलास पाटील, चिंतामणी पांचाळ अशा अनेक भजनी बुवांनी भजनाची परंपरा जपली. आजही संगीत विशारद श्री. राजाराम सुतार यांच्यासारखे बुवा भजनी परंपरेला न्याय देतात. अशा जेष्ठ, अनुभवी, चिकित्सक आणि सुसंस्कृत भजनी बुवांसमोर नतमस्तक होऊन काही चुकीच्या गोष्टींचा समाचार घ्यावाच लागेल आणि उचिताला उचितच म्हणावे लागेल.

गेल्या वीस-पंचवीस वर्षात कोकणामध्ये डबलबारी संगीत भजनाचा नवा अवतार ट्वेंटी-ट्वेंटी च्या माध्यमातून आला आणि त्यामध्ये बहुतांशी वेळा विकृती दिसते! अश्लील बोलणे, विचित्र हावभाव करणे, पांचट विनोद करणे, शिव्या देणे, निंदा-नालस्ती करणे असे घाणेरडे प्रकार भजनाच्या माध्यमातून पुढे येत आहेत! भजन परमात्म्याच्या नामस्मरणाचा – भक्तीचा भाग असायला पाहिजे मात्र भजनातून मनोरंजनाच्या नावाने काहीही बोलले जाते. खोटं अध्यात्म, चुकीच्या पौराणिक कथा, चुकीच्या आख्यायिका सांगून तमाशा मांडला जातोय. तो गलिच्छ असा आहे! हे अगदी स्पष्टपणे सांगावेसे वाटते!

जाहिरातबाजी न करता दारूच्या दुकानासमोर दारू खरेदी करण्याकरिता मोठी रांग लागते; पण पौष्टिक आहार म्हणून दुधाला महत्त्व असूनही दूध विक्रेत्याला गिऱ्हाईकं मिळण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात! त्याचप्रमाणे अश्लील बतावणी भजनातून केली जाते. अशी बतावणी म्हटले की आंबटशौकिनांची खूप मोठी गर्दी जमते! त्यामुळे अशा बुवांना चेव येतो व ते वाट्टेल ते बरळतात! हे कुठेतरी थांबणे गरजेचे आहे! भजनाचा खरा अर्थच माहित नसलेले भजनी बुवा आणि आंबटशौकिन श्रोतेवर्ग ह्या दोघांपासून भजनाला बदनाम करण्याचा हा प्रकार कधीतरी थांबायला पाहिजे! हे परखडपणे मांडणे आवश्यक आहे.

असलदे गावचे प्रथम सरपंच व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते स्वर्गीय अंकुश डामरे यांच्या प्रथय स्मृती दिनानिमित्त ९ मे २०२५ रोजी श्री. प्रकाश पारकर बुवा आणि श्री. नंदादिप वंजारे बुवा यांची डबलबारी संपन्न झाली. ते भजन प्रत्यक्ष उपस्थित राहून श्रवणाची संधी मिळाली. त्यावेळी श्री. नंदादिप वंजारे बुवा यांनी केलेले भजन, त्यांनी सांगितलेले अध्यात्म ऐकून भजनाचा खराखुरा अर्थ ज्याला समजला आणि जो भजनाच्या माध्यमातून सिद्ध करतो असा भजनी बुवा आहे; हे कौतुकाने मांडावेसे वाटले म्हणून हा लेखन प्रपंच!

श्री. नंदादिप वंजारे बुवा यांनी भजनाचा आध्यात्मिक साधासुधा अर्थ समजावून सांगितला. भजनाची परंपरा सांगितली. आधुनिक विज्ञान आणि आध्यात्म ह्याची सांगड घालून उत्तम दर्जेदार गायकी करून भजन केले. कर्माचा सिद्धांत मांडणारे शास्त्रज्ञ मर्फी आणि प्रसिद्ध गुजराती लेखक व व्याख्याते हिराभाई ठक्कर यांच्या ‘कर्माचा सिद्धांत’ या पुस्तकाचा संदर्भ देत कर्माचा सिद्धांत स्पष्ट केला. ज्ञानेश्वरीचे माहात्म्य सांगितले. त्यांनी वर्तमानात भजनाच्या माध्यमातून सुरु असलेल्या गैरप्रकाराबाबतही रोखठोकपणे आपले मत मांडले. हे सारे आम्हाला कौतुकास्पद वाटले. श्री. नंदादिप वंजारे बुवा स्वतः नामवंत किर्तनकार आहेत. बाबा महाराज सातारकर आणि राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांच्याकडे त्यांनी किर्तनाचे धडे गिरविले. हे सर्व ज्ञान ते भजनाच्या माध्यमातून व्यक्त करीत असतात. एवढेच नाहीतर `आनंद युवा संघ’च्या माध्यमातून त्यांना भजनात साथ देणारी तरुण मंडळी उच्चविद्याविभूषित आणि पुर्णतः निर्व्यसनी आहेत. श्री. नंदादिप वंजारे बुवा भजन केल्यानंतर यजमानाला ज्ञानेश्वरी ग्रंथ भेट म्हणून देतात.

श्री. नंदादिप वंजारे बुवा यांच्या रूपाने आध्यात्मिक भजनाचा `नंदादिप’ कोकणाला गवसला आहे. तो निरंतर तेवत ठेवण्यासाठी सुसंस्कारित, सुशिक्षित श्रोत्यांनी वंजारे बुवांना साथ दिली पाहिजे. त्यांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना भजनात यश मिळो; ही भगवंतांच्या चरणी प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

हेही वाचा!

आध्यात्मिक आणि सामाजिक सेवेची बांधिलकी जोपासणारा आनंद युवा संघ!

श्री. नंदादिप वंजारे बुवा- गजर

error: Content is protected !!