दिपावली येवो प्रत्येकाच्या जीवनी!

भारतीय संस्कृतीमध्ये दिपावली सणाचे अनन्य महत्त्व आहे. संपूर्ण जगामध्ये हिंदू संस्कृतीत साजरा होणारा हा सण आपणास अनेक गोष्टी सहजपणे देऊन जातो. अगदी वेदकालीन परंपरेतून सुरू झालेला हा उत्सव आम्हाला तेजपूर्ण उत्साह देत असतो म्हणूनच वारकरी संप्रदायामध्ये साधूसंतांनी सुद्धा दिवाळीला खूप महत्वाचे स्थान आपल्या अभंगात दिलेले आढळते.

साधू संत येती घरा। तोची दिवाळी दसरा॥

दसरा-दिवाळी तोची आम्हा सण। सखे संतजन भेटतील॥

तुका म्हणे त्यांच्या घरची उष्टावळी। मज ते दिवाळी दसरा सण॥

संत परंपरेने सुद्धा महत्त्व अधोरेखित केलेला हा सण आमच्या सर्वसामान्यांच्या जीवनात आनंद, उत्साह, आत्मविश्वास, प्रेम, सत्य, अहिंसा, सामर्थ्य, दूरदृष्टी, सेवाभाव, परमात्म्याची भक्ती, श्रद्धा, सबुरी, एकसंघ पदाची भावना, क्षमाशिलता असे अनेक उचित गुण आम्हाला प्रदान करत असतो.

दिवाळी म्हटले की `प्रकाश’ अत्यंत महत्त्वाचा! प्रकाश प्रगटला म्हणजे काय? अंधार नाहीसा झाला. हा अंधार म्हणजे काय? तर अज्ञात प्रदेश. जी गोष्ट आपणास माहीत नसणे म्हणजेच अज्ञान. त्यालाच आपण अंधार म्हणतो. अज्ञानरूपी राक्षसाचा नाश करण्यासाठी प्रकाशरुपी परमात्म्याचा प्रवेश आमच्या जीवनात येणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हे शिक्षण आम्हाला वेदांपासून अगदी आजच्या वारकरी संप्रदायपर्यंत सर्वांनी दिले. परंतु एकविसाव्या शतकाच्या 21व्या शतकात प्रवेश केलेला हा माधव मानव हा आज उचित गोष्टींपासून दुर दुर हो जात आहे आणि हीच खरी समस्या निर्माण झाली आहे

आज संपूर्ण जगामध्ये कळत-नकळतपणे तिसरे महायुद्ध सुरू झालेले आहे त्याचे दुष्परिणाम थेट आमच्या जीवनावर पडू लागले आहेत जसा जसा काळ लोटत जाईल त्या प्रमाणामध्ये तिसरे महायुद्ध अतिशय भयंकर अक्राळ-विक्राळ रूप धारण करेल. पृथ्वीवरील मानव त्याचे दुष्परिणाम सहन करू शकणार नाही. त्याची तयारी अगदी वैयक्तिक पातळीवर सुद्धा आपल्याला आजपासून करता आली पाहिजे; तेव्हाच खऱ्या अर्थाने दिवाळी आमच्या जीवनात आली असं म्हणता येईल.

वैयक्तिक पातळीवर आरोग्य, शिक्षण, आर्थिक सक्षमता, आत्मविश्वास आणि संघभावना आपणास जोपासणे गरजेचे आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण जगामध्ये प्रत्येकाची जीवनशैली बदलली आहे. आपण काय खातो-काय पितो? याचा साधासुधा विचार आपण करत नाही. फॅशन म्हणून अनेक अनुचित गोष्टींना आपण कवटाळून बसतो. त्यातून अनेक हानीकारक गोष्टी आपल्या शरीराला त्रासदायक ठरतात. सदृढ आरोग्य मिळविण्यासाठी एकीकडे प्रयत्न करताना दुसरीकडून आपण जे अन्न खातो ते आपल्या शरीरासाठी किती हितकारक आहे? याची काळजी आपणच घेतली पाहिजे. ज्या दिवशी आपण काळजी घेऊ; तोच खरा दिवाळीचा सण असेल.

अगदी जन्माला येण्याअगोदर पासून मानवाचे शिक्षण सुरू झालेले असते. पुढे प्राथमिक माध्यमिक महाविद्यालयीन शिक्षणाचे विविध स्तर गाठायचे असतात; परंतु भविष्याचा वेध घेऊन आणि त्या विद्यार्थ्यांची पात्रता पाहून शिक्षणाच्या वाटा हेतुपूर्वकपणे निवडल्या पाहिजेत. शिक्षणाबरोबर संस्कार हा सुद्धा खूप महत्त्वाचा भाग. संस्कार आम्हाला टिकवायचा असतो-घडवायचा असतो. शिक्षणातून मिळणारा संस्कार चिरकाल टिकतो. मात्र प्रत्येक क्षणाला शिकण्याची वृत्ती अंगी असावी लागते. तेव्हाच आमच्या जीवनात दिवाळी आलेली असते.

आधुनिक जीवनशैलीचे कथाकथित रूप आमच्या अंगवळणी पडले आहे आणि बेरोजगारीचे प्रमाण वाढत असल्याने आर्थिक विवेंचनेत भर पडली आहे. म्हणूनच आर्थिक सक्षमता ठिकून ठेवण्यासाठी प्रत्येकाने मेहनत कष्ट करून प्रामाणिकपणा जपला पाहिजे. आर्थिक सक्षमता राखून ठेवण्यासाठी आपापल्या परीने मार्गक्रमण केले पाहिजे; तरच दिपावली सुंदरपणे साजरी करता येईल.

स्वतःवरील विश्वास हाच आत्मविश्वास. आपल्या श्रद्धास्थानावर, आपल्या सद्गुरूंवर, आपल्या देवावर असणारा विश्वास म्हणजेच आत्मविश्वास. हाच आत्मविश्वास आम्हाला जीवनात समर्थपणे जगण्यास शिकवितो. त्यातूनच आमची संघभावना वाढीस लागते. ही संघभावना आपल्या कुटुंबाला, समाजाला समर्थ बनवेल. तेव्हाच समाजामध्ये खऱ्या अर्थाने दिपावली साजरी होईल.

पाक्षिक `स्टार वृत्त’च्या वाचकांच्या, हितचिंतकांच्या जीवनात सत्य, प्रेम, आनंद, यश, सुख, समाधान, समृद्धी, किर्ती येवो; हीच सदिच्छा!

You cannot copy content of this page