संपादकीय- ज्ञानाची दीपावली साजरी करू !

प्रकाशाचा उत्सव सण म्हणजेच दीपावली!
त्या प्रकाशाच्या प्रतिकाची पूजा म्हणजे दीपावलीचा सण!

अनेक पणत्यांचा प्रकाश आम्हाला आनंदित करतो, उत्साह देतो. आता विद्युत दिवे आले, विद्युत तोरणं आली आली. पण हा `प्रकाश’ कशाचा आहे? तर ज्ञानाचा! ज्ञानाचा प्रकाश पडल्यावर अज्ञानाचा अंध:कार दूर होतो. एक वेळ रात्रीचा अंधार एका पणतीच्या दिव्याने दूर करता येईल. पण अज्ञानाचा अंध:कार मात्र माणसाचं माणूसपण हिरावून घेतो. माणूस जनावराच्या पातळीवर जाऊन पोहोचतो. माणूस श्रद्धेच्या नाही तर अंधश्रद्धेच्या जोखडात अडकून पडतो. खरीखुरी भक्ती, सेवेचे व्रत तो स्वीकारू शकत नाही. सुसंस्कृतपणा दूर जातो. त्याच्या विरुद्ध फक्त आणि फक्त स्वार्थ जीवनात येतो. स्वतःचा, स्वतःच्या कुटुंबाच्या भल्याचा स्वार्थ जरूर असावा; पण तो स्वार्थ जपताना इतरांचे नुकसान होणार असेल तर तो राक्षसी स्वार्थ ठरतो. हा राक्षसी स्वार्थ साधण्याची स्पर्धा आज सर्व क्षेत्रात आहे. त्यामध्ये बळी जातो तो गरीब कष्टकरी व्यक्तींचा! जो समाजाचा – देशाचा खरा प्राण आहे!

राक्षसी स्वार्थामुळे व्यक्ती हैवान होते. ज्या समाजात राहतो त्या समाजाचे, ज्या माणसांमध्ये राहतो त्या माणसांचे कोणतेही नुकसान झाले तरी चालेल; पण माझा आर्थिक फायदा झाला की बस्स! त्यापलीकडे अशा लोकांना काहीच दिसत नाही. ठराविक लोकांच्या राक्षसी स्वार्थामुळे आज जिकडे तिकडे बजबजपुरी माजली आहे. हातात सत्ता असलेली व्यक्ती जर राक्षसी स्वार्थी असेल तर ती सत्ता लोकांचं कल्याण करणारी नसते. ती सामान्यांचा जीव घेणारी असते. सामान्यांवर अन्याय करणारी असते. हे थांबविण्यासाठीच ज्ञानाच्या प्रकाशाची दीपावली महत्वाची ठरते.

अज्ञानामुळेच राक्षसी स्वार्थ येतो. जीवनाचे सत्य नेमकं काय आहे? ह्या अज्ञानातून जी बकासुराची कुवृत्ती येते ती राक्षसी स्वार्थ साधणाऱ्यांनाही नरकात घेऊन जात असते; तसेच त्यांच्या आजूबाजूच्या संबंधित लोकांनाही संकटात टाकणारी असते. म्हणूनच प्रत्येकाने आपले अज्ञान दूर केले पाहिजे. जे राक्षसी स्वार्थामुळे अंध झाले आहेत त्यांच्यापासून संरक्षित होण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी लागते. संबंध बिघडतील म्हणून जर मुकेपणा घेतला, डोळ्यावर पट्टी बांधून घेतली तर राक्षसी स्वार्थ साधणारे आपला कधी घात करतील; हे आपल्यालाही कळणार नाही आणि कळतं तेव्हा वेळ निघून गेलेली असते. ती वेळ निघून जाऊ नये म्हणूनच ज्ञानाच्या प्रकाशाची आवश्यकता असते. हा ज्ञानाचा प्रकाश प्रत्येकाला प्राप्त व्हावा असे आपल्या साधू संतांना, ऋषीमुनींना वाटते. परमात्म्याला वाटते. त्यासाठी प्रत्येकाला मेहनत करावी लागेल. दुसऱ्याचे डोके आपल्या धडावर असून चालत नाही. आपल्या धडावर आपलेच डोके असावे लागते. हाच सुसंस्कार जपण्यासाठी दीपावलीचा सण साजरा करायला पाहिजे. तरच तो खऱ्या अर्थाने साजरा केला गेला असे म्हणता येईल. दिवाळीत फटाके वाजवू, फराळ खाऊ, मौजमजा करू! हरकत नाही. पण त्याचबरोबर जर ज्ञानाची मनोभावे पूजा करू शकलो तर ती आमची खरी दीपावली ठरेल.