सन्मानिय मोहन सावंत- मैत्री जपणारे आदर्श व्यक्तिमत्व…
हरि ॐ श्रीराम अंबज्ञ
प्रत्येकाच्या आयुष्यात जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर मित्रत्वाची साथ मिळत जाते. जीवन प्रवासात नवनवीन मित्र येतात, काही मित्र सदैव संपर्कात राहतात तर काही मित्रांचा संपर्क राहत नाही. तरीही आपला मित्र म्हणजे `जीव की प्राण’ असे मानणारे अनेकजण असतात आणि मित्रांच्या सुख-दुःखात ते सहभागी होतात. असेच एक मित्र मोहन सावंत; यांचा खूप मोठा मित्र परिवार! त्यांचा आज वाढदिवस! पाक्षिक `स्टार वृत्त’चे सहसंपादक सन्मानिय मोहन सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी मनःपूर्वक शुभेच्छा!
अगदी बालपणातील सवंगडी मित्र, शालेय जीवनातील मित्र, शासकीय नोकरी करीत असताना संबंधात आलेले अनेक खात्यातील मित्र, शेजारी-पाजारी राहणारे मित्र; असे शेकडो मित्र त्यांनी प्रेमाने जोडून ठेवले आहेत. डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकार, वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, राजकीय नेते-पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांशी त्यांनी मित्रत्वाची सलगी जपली आहे. अगदी आठवणीने आपल्या प्रत्येक मित्राची आपुलकीने चौकशी करून सदैव सहकार्याच्या भूमिकेत ते राहतात; ही त्यांची खासियत मला नेहमीच आवडते.
माझा खूप वर्षाचा संबंध नसला तरी त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या अनेक मित्रांची ओळख होते. अनेक मित्रांची खूपशा आठवणी ते नेहमीच भरभरून सांगत असतात. आपल्या मित्रांचे कौतुक करीत असतात. त्यांच्या मित्रपरिवारात विशेषतः सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आणि आध्यात्मिक नैतिकता जपणाऱ्या मित्रांची संख्या जास्त असल्याचे नेहमी जाणवते. ह्यावरून श्री. मोहन सावंत यांचा मैत्री जपणारा स्वभाव सहजपणे लक्षात येतो.
आयुष्यात खूप कष्ट मेहनत करून त्यांनी आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. आयुष्यात अनेकांना मदत केली-सहकार्य केले. पण त्याचा मोठेपणा ते घेत नाहीत. सामाजिक कार्यातही ते नेहमी जबाबदारी स्वीकारतात आणि नेतृत्वही करतात. त्याचा रुबाब ते कधी दाखवत नाहीत. सगळं काही आपल्या सदगुरुंच्या चरणी समर्पित करतात. सदगुरुंवर त्यांचा भारी भरोसा. सदगुरुंवरील श्रद्धा आणि सबुरीने त्यांनी आपले जीवन सफल संपन्न केले. त्यांच्याबद्दल खूप काही लिहायचे आहे. भविष्यात नक्कीच प्रयास करू. पण आज सन्मानिय मोहन सावंत यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा देताना थोडक्यात मी माझे मनोगत व्यक्त केले. मैत्री जपणाऱ्या मोहन सावंत यांच्यासारख्या आदर्श व्यक्तिमत्वाला सलाम!
त्यांना पुनः एकदा वाढदिवसाच्या मनःपूर्वक अनिरुद्ध शुभेच्छा! त्यांच्या भविष्यातील सामाजिक वाटचालीस परमात्मा यश देवो; तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सुख, आनंद, यश, समाधान, किर्ती, सदृढ आरोग्य आणि सद्गुरूंची कृपा निरंतर मिळो; ही आदिमातेचरणी प्रार्थना!
नाथसंविध्
-नरेंद्र हडकर