अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई आवश्यक!
संपूर्ण देशामध्ये आज संतापाची लाट उसळली आहे. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या वाहनातून श्रीनगरकडे जाणाऱ्या वाहनांना आत्मघातकी अतिरेक्यांनी लक्ष्य केले. गेल्या दशकातील हा सर्वात मोठा भीषण अतिरेकी हल्ला होता. यामध्ये आपले ४० जवान शहीद झाले. याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
पाकिस्तान पुरस्कृत जहाल अतिरेकी भारताला जसे लक्ष्य करतात. त्याचप्रमाणे आज संपूर्ण जगही दहशतवाद्यांच्या कारवायांनी बेजार झाला आहे. देशपातळीवर आणि जागतिक पातळीवर दहशतवादविरोधी कारवाई करण्यासाठी एकजुट महत्त्वाची असते; परंतु जागतिक राजकारणातील सत्ताधीश देश आपली भूमिका ठरविताना नेहमी स्वतःचा स्वार्थ निर्णय घेत असतात. त्यामुळे अतिरेक्यांचे फावते; एवढेच नाही तर अतिरेक्यांना आर्थिक मदत पुरविणे, त्यांना आश्रय देणे; असा उद्योग पाकिस्तानसारखा देश अनेक वर्ष करीत आहे त्याचे दुष्परिणाम शेजारी देश म्हणून भारतात पाहावयास मिळतात. खुद्द पाकिस्तानमध्येही अतिरेकी कारवाया होत असतात. तरीही पाकिस्तानचे सत्ताधारी सत्ता प्राप्त करून घेण्याचा व सत्ता टिकविण्याच्या स्वार्थासाठी नेहमीच अतिरेक्यांना पाठीशी घालत राहतात.
दहशतवाद्यांचा म्होरक्या ओसामा बिन लादेन पाकिस्तानात सापडला. अमेरिकेने पाकिस्तानात येऊन त्याला ठार मारला आणि समुद्राच्या तळाशी गाढला. अशी कारवाई झाली की अतिरेकी संघटना कमकुवत होतात आणि त्यांना पाठिंबा देणारा देशही नागडा होतो.
उरी आणि पठाणकोट येथे भारतीय लष्कराच्या तळांवर अतिरेक्यांनी हल्ले केले. त्यात आमचे जवान शहीद झाले. त्यास सडेतोड जबाब म्हणून पाकिस्तानच्या ताब्यातील सीमारेषेवरील भागात भारतीय सैन्य दलाने केलेला सर्जिकल स्ट्राइक अतिरेक्यांच्या आणि पाकिस्तानच्या उरात धडकी भरविणारा होता. अशाप्रकारे थेट आक्रमक कारवाई केली जाते तेव्हा त्यातून अतिरेक्यांनवरील आपला वचक सिद्ध होतो.
जेव्हा जैश-ए-मोहम्मदसारखी जहाल अतिरेकी संघटना अतिरेकी कारवाया करते तेव्हा कुठे आणि कसा अतिरेकी हल्ला करता? येईल ह्याचा खूप मोठा अभ्यास करतात. ते संधी शोधत असतात. ती संधी मिळू न देणं हे सैन्यदलाचं – सुरक्षा दलांचं काम असतं.
मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यातील पाकिस्तानचा अतिरेकी कसाबला फाशी झाली आणि पाकिस्तान अतिरेक्यांना कसं पोसतं? ते साऱ्या जगाने पाहिले. म्हणून आता अतिरेकी संघटना स्थानिकांना हाताशी धरून अतिरेकी कारवाया करीत आहेत. गुरुवारी झालेल्या आत्मघाती हल्ला जम्मूतील स्थानिक तरुणाने केला म्हणजेच स्थानिक तरुण अतिरेकी कारवाया करण्यासाठी का तयार होतात? ह्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याची तयारी भारताने ठेवली पाहिजे.
भारताची तिन्ही सैन्यदलं प्रगत आणि आधुनिक आहेत. त्यांच्याकडे अत्याधुनिक साधन आहेत. तरीही अतिरेकी कारवाया लष्करी तळावर होतात. गुरुवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या जवानांना लक्ष्य केलं गेलं. हे दल गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करतं. अडीच हजार जवान बारा-तेरा तासांचा प्रवास करून श्रीनगर येथे जात असताना हा आत्मघातकी हल्ला झाला. एकाच वेळी एवढ्या जवानांना तेसुद्धा बस मधून घेऊन जाणं; हे योग्य नव्हतं. परंतु केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे आवश्यक अत्याधुनिक साधनं नाहीत. अतिशय तुटपुंज्या पारंपारिक साधनांनी ते अत्याधुनिक शस्त्र असणाऱ्या अतिरेक्यांशी-नक्षलवाद्यांशी लढतात व त्यांना अपयश येतं. ह्याची जबाबदारी भारतीय सत्ताधाऱ्यांवर येते. भारतीय लष्कर आणि इतर सुरक्षा यंत्रणा यांचा समन्वय साधून कार्यरत राहणं महत्वाचं ठरतं.
हल्ल्याचा तीव्र निषेध व्हायलाच हवा. पाकिस्तानला धडा शिकवला गेला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या सुरक्षा यंत्रणांनाही अत्यावश्यक अत्याधुनिक साधनं पुरविण्यास आम्ही कमी पडता कामा नये.
आजपर्यंत झालेल्या अतिरेकी कारवायांच्या मुळाशी जाऊन उपाययोजना आवश्यक आहेत आणि अतिरेक्यांना नामशेष करण्यासाठी थेट लष्करी कारवाई व्हायलाच पाहिजे.