`दुचाकीवर डबलसीट नको’ हा चुकीचा नियम त्वरित बदला!
कोरोना काळात प्रशासनाने काढलेल्या काही सूचना कधीकधी कोरोनापेक्षा त्रासदायक, घातक आणि जीवघेण्या ठरतात. त्यातील एक निर्णय म्हणजे दुचाकीने डबलसीट प्रवास केल्यास नियमांचा भंग होणे. मुंबईसारख्या आर्थिक राजधानीच्या शहरात अशाप्रकारे अनुचित निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करणे अन्यायकारक आहेत.
दुचाकीवरून दोन व्यक्तींच्या प्रवासाने कोरोनाचा प्रसार होतो? हा जावई शोध लावणाऱ्याचा जाहीर सत्काराचा करायला हवा. केवढा मोठा त्याने शोध लावलाय…हा शोध ग्राह्य धरून वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस दुचाकीवर डबलसीट असल्यास कारवाई करतात. हे अनुचित, संतापजनक असून सर्वसामान्यांना छळण्याचा हा प्रकार आहे.
ट्रेन बंद, रिक्षा मिळत नाहीत, ओला- उबेर टॅक्सी सेवा अतिशय कमी प्रमाणात, बसची संख्या कमी असल्याने बस स्टॉपवर तुफान गर्दी असते; अशावेळी दुचाकीवरून परवडणारा प्रवास केल्यास हरकत असण्याचे कारण नाही. तरीही एसीमध्ये बसून आदेश काढल्याने सर्वसामान्य जनतेला कसे त्रासाला सामोरे जावे लागते; ह्याचे हे जीवंत उदाहरण! पोलीस रस्त्यावर अक्षरशः जणूकाही गँगस्टर पकडल्याच्या अविर्भावात दुचाकीस्वारांना वागणूक देत आहेत. तोंडाला मास्क नसल्यास, गाडीची कागदपत्रे अपूर्ण असल्यास, परवाना नसल्यास, हेल्मेट घातलं नसल्यास, वाहतूकीचे नियम न पाळल्यास कारवाई करावी. पण प्रवासाची साधनंच उपलब्ध नसताना दुचाकीवरून डबलसीट प्रवासास नियमबाह्य ठरवून सामान्यांना गुन्हेगार ठरविण्याची क्रूर पद्धत त्वरित बंद झाली पाहिजे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर तंबाखूजन्य वस्तूंवर बंदी आहे. पण ह्या वस्तू सरार्स उपलब्ध आहेत. ईपास काढून देणाऱ्यांची टोळी शक्कल लढवून ईपास काढून देतात. अवैध दारूधंदे, मटका जुगार पूर्णपणे बंद आहेत असंही म्हणता येणार नाही. अशा गोष्टींविरोधात कार्य करण्याऐवजी दुचाकीस्वारांना डबलसीट दिसताच बाजूला घेऊन त्यांच्यावर केसेस दाखल करणे, त्यांना नोटीस देणे, गाड्या जप्त करणे हे आजच्या काळात अयोग्य आहे. कारण डबलसीटने कोरोनाचा प्रसार होतो असं समजणाऱ्या शहाण्यांनी कोरोना झालेल्या रुग्णांची सखोल चौकशी करावी आणि ते डबलसीट बसले होते का? ह्याची पडताळणी करावी.
करोडो लोकांच्या शहरांमध्ये अनेक ठिकाणी शारीरिक दुरी ठेवणे शक्य नसते. शहरात अशी अनेक ठिकाणं आहेत. मुंबईतील दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये शारीरिक दुरी अशक्य आहे. असे असताना दुचाकी चालविणाऱ्यांना कठोर शिक्षा का? नोकरीला जाण्यासाठी, उद्योग-धंदे करण्यासाठी म्हणजेच आर्थिक चक्र सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्रवासाची साधने अतिशय महत्वाची असतात. आज प्रवास करायला लोकांना वाहने उपलब्ध नसताना दुचाकीवर अशी कारवाई करणे; योग्य ठरणार नाही. मनुष्य किती दिवस घरात कोंडून राहणार आहे? त्याला नोकरीला जायला नको का? त्याला उद्योग धंदा करायला नको का? अतिश्रीमंत असणारा किंवा खूप मोठा पगार असणारा, मोठा व्यावसायिक काही दुचाकी चालविणार नाही. सर्वसामान्य लोकांना ते परवडणारे वाहन आणि प्रवास आहे. म्हणूनच दुचाकीवर डबलसीटला बंदी असू नये. दुचाकी घेताना सगळे कर भरावे लागतात, जेव्हा वाहन मालक इंधन घेतो तेव्हा तो शासनाच्या तिजोरीत अप्रत्यक्षरीत्या खूप मोठा कर भरत असतो. करातून उत्पन्न वाढविण्यासाठी दारूची दुकाने उघडली जाऊ शकतात; जी दारू आरोग्यास घातक आहे.
म्हणूनच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी त्वरित आदेश देऊन दुचाकी वाहन धारकांना डबलसीट घेण्याची मुभा द्यावी! कारण अनेकांचं आर्थिक स्थैर्य त्यावर अवलंबून आहे. कोणी आपल्या कुटुंबातील सदस्याला डॉक्टरकडे नेत असतो. कोणी दुसऱ्याला मदतीसाठी जात असतो. खरी कारणं सांगूनही पोलीस नियमावर बोट ठेवतात आणि दुचाकी स्वाराला नाहक त्रास देतात. तेव्हा करोडो दुचाकीस्वार राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर-गृहमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करीत असतात. शासनकर्त्यांची चुकीची प्रतिमा जनतेसमोर जाते. आज प्रत्येकजण कोरोना महामारीपेक्षा ज्या उपाययोजना सुरु आहेत त्यामुळे त्रस्त झालेला आहे. म्हणूनच अनेक आदेशांपैकी दुचाकी डबलसीटचा निर्णय त्वरित सुधारावा!
-नरेंद्र हडकर