जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम!

कष्टकऱ्यांचा सच्चा मित्र हरपला!
जेष्ठ पत्रकार, संपादक, प्राचार्य मुकुंदराव कदम यांच्या कर्तृत्वाला सलाम!
माझे गुरुवर्य परमात्म्याच्या कुशीत विसावले!

अन्यायाविरुद्ध, भ्रष्ट यंत्रणेविरुद्ध लेखणीच्या माध्यमातून लढा उभारणारे, कष्टकऱ्यांचे प्रश्न सातत्याने मांडणारे, शिक्षण, शेती, राजकारण, समाजकारण अशा अनेक विषयात प्रज्ञावंत असणारे, कोकणाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयास करणारे, पत्रकारितेमध्ये सर्वोच्च आदर्श व्यक्तिमत्व असणारे प्राचार्य मुकुंदराव कदम आम्हाला सोडून गेले.

रविवार दि. २४ डिसेंबर २०१७ रोजी त्यांच्या आत्म्याने परमात्म्यात विलिन होण्यासाठी देह सोडला. आमच्यावर पुत्रवत प्रेम करणारा, पित्याप्रमाणे आधार देणारा गेल्याने आम्ही हादरलो, दु:खी झालो. सरांवर असा लेख लिहावा लागेल, असे स्वप्नातही कधी वाटले नव्हते. तरीही मोठ्या दु:खामध्ये संपादकीय लिहित आहे.

१९९५ मध्ये महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना सरांशी ओळख झाली. त्यांच्या मालकीच्या दैनिक `सिंधुदुर्ग समाचार’मध्ये काम करण्याची संधी मिळाली. व्यासंगी, उच्चविद्याविभूषित प्राचार्य असणाऱ्या कदम सरांनी संपादकीय कामकाज कसे करावे? त्याचा आदर्श निर्माण केला. पत्रकारितेची बाराखडी मी त्यांच्याकडून शिकलो. गेल्या पंचवीस वर्षात त्यांनी मलाच नव्हेतर अनेकांना प्रेम दिले. विचारांना दिशा दिली, आधार दिला, पाठींबा दिला. त्यांच्या जाण्याने समाजाचे खूप मोठे नुकसान झालंय. ते कधीही भरून येणार नाही. त्यांच्या पश्चात त्यांचे कुटुंबिय खूप दु:खी झाले आहेत. अचानक दु:खद प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी परमात्मा त्यांना सामर्थ्य देवो, ही परमात्म्या चरणी प्रार्थना!

प्राचार्य मुकुंदराव कदम यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सिंधुदुर्गात ‘सिंधुदुर्ग समाचार’ हे दैनिक सुरू केले. कोकणचा विशेषत: सिंधुदुर्गाचा सर्वांगिण विकास हेच त्यांचे ध्येय होते. त्या ध्येयासाठी त्यांनी केलेला त्याग आजच्या व्यावहारिक दुनियेमध्ये चुकीचा वाटेल, पण त्यांचं ध्येय कोकणच्या मातीशी इनाम राखणारं होतं. सरांनी कधीही स्वत:चं हित पाहिलं नाही, आपल्या कुटुंबियांचा फायदा बघितला नाही आणि पत्रकारितेच्या माध्यमातून विकासाचे स्वप्न पूर्ण करण्याचे धाडस केले. कोकणाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी स्वीकारलेला मार्ग निश्चितच खडतर होता; पण तोच मार्ग त्यांना पूर्ण समाधान देणारा होता म्हणूनच त्यांनी गेली पस्तीस वर्षे दै. `सिंधुदुर्ग समाचार’च्या माध्यमातून सर्वांगिण विकासाच्या संकल्पना मांडल्या. जिल्ह्याबाहेरील वर्तमानपत्रे जिल्हा विकासाला प्राधान्य देऊ शकत नाहीत; ही त्यांची भूमिका असायची. म्हणूनच कोकणातील शेतकऱ्यांचे प्रश्न, शैक्षणिक समस्या आणि प्रशासकीय कारभार ह्यावरती त्यांनी विशेष लक्ष दिले. प्रसंगी संयमी पण कठोर भूमिका मांडली. कोणाला आवडेल, बरे वाटेल म्हणून त्यांनी आपली भूमिका मांडली नाही; तर अभ्यासू चिकित्सक वृत्तीने त्यांनी विकासाची दिशा दिली. कोकणातील ग्रामीण भागाशी जोडलेले राहिल्याने त्यानी मांडलेले विकासाचे सिद्धांत आजही मार्गदर्शक ठरतील.

खेडेगावातील अनेक शेतकरी येऊन त्यांच्याकडे आपल्या व्यथा मांडायचे; त्यांनी त्यांच्याकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. शासकीय अधिकाऱ्यांकडे जाऊन ते ठामपणे जाब विचारायचे. लोकशाहीमध्ये जनता ही मालक असते; त्यांची शासकीय अधिकाऱ्यांनी अडवणूक करू नये, अशी त्यांची अपेक्षा असायची. कोणावर अन्याय झाल्यास ते पुढाकार घ्यायचे. अन्यायाविरुद्ध त्यांनी कधीही तडजोड केली नाही. शासनाच्या भ्रष्ट यंत्रणेने कोणाला त्रास दिल्यास ते त्या अधिकाऱ्यांची भंबेरी उडवित. त्यांच्या प्रत्येक कृतीतून-लिखाणातून सर्वसामान्यांची बाजू ठामपणे मांडली जायची.

राजकारण असो वा समाजकारण, शिक्षण असो वा शेती; प्रत्येक विषयात त्यांचा अभ्यास दांडगा होता. त्यातून त्यांनी कोकणासाठी नेमकं उपयुक्त काय? हे मांडले. शेतकरी नेते शरद जोशी यांच्या शेतीविषयक लेखांचे ते अभ्यास करायचे. शेतकरी कसा भरडला जातो आणि शासनाची व शेतकऱ्यांची कोणती भूमिका शेती विकासाला चालना देऊ शकेल? ह्यांचे मार्गदर्शन त्यांनी नेहमीच केले.

अनेक विद्यार्थी, पत्रकार त्यांनी घडविले. `शिक्षणाशिवाय पर्याय नाही. त्यासाठी प्रत्येकाने उच्चशिक्षण घेतलंच पाहिजे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणातूनच प्रगती साधली पाहिजे. त्यासाठी खूप मेहनत त्यांनी घ्यावी;’ असं त्यांचं मत होतं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गरीब कष्टकरी पालकांची अनेक मुले उच्चशिक्षित झाली. त्यातील काहीजण शासनात अधिकारी आहेत; तर काही प्राध्यापक-प्राचार्य म्हणून कार्यरत आहेत.

त्यांनी अनेक पत्रकार घडविले. वार्ताहर म्हणून काम करणारी व्यक्ती जेव्हा त्यांच्या सानिध्यात यायची, त्यांचे मार्गदर्शन घ्यायची व त्यांनी सांगितलेल्या मार्गावरून जायची तेव्हा आदर्श पत्रकार म्हणून ती व्यक्ती समाजासमोर यायची. `लोकांच्या हिताचे काय? सर्वांगिण विकासासाठी कोणती भूमिका महत्वाची? ते स्पष्टपणे लिहिण्याचे सामथ्र्य ठेवा. कधीही खोटं लिहू नका व तुमच्या मनाला जे पटतं ते मांडा. कोणाशीतरी संबध बिघडतील म्हणून, कोणी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून लिखाण करू नका!’ हीच त्यांची शिकवण होती.

पत्रकारांनी खूप वाचले पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी फिरून थेट लोकांशी बोलून अनुभव वाढविला पाहिजे; हे पत्रकारितेचे बीज त्यांनी रोवले म्हणून आम्हाला त्यांचा नेहमीच आदर वाटायचा. खूप खूप बोलायचे. आपल्याकडील ज्ञान साध्यासोप्या शब्दात द्यायचा प्रयत्न करायचे. एखादी शंका विचारल्यानंतर शिक्षकांच्या भूमिकेत शिरून समजावून सांगायचे. पत्रकारापेक्षा आपल्यातील खराखुरा शिक्षक त्यांनी जपला. कधीकधी त्यांच्यातील कडक शिस्तीचा शिक्षक प्रकट व्हायचा. असे पत्रकारितेमधील गुरुवर्य प्राचार्य मुकुंदराव कदम एका एका तासात चार चार अग्रलेख लिहून देत. समोर बसलेल्या माणसांशी बोलत असताना त्यांची लेखणी सुरूच असायची. त्यांना कधीही अडथळा वाटायचा नाही. तरीही त्यांचा प्रत्येक लेख, अग्रलेख समाजाला दिशादर्शक असायचा.
महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारातून निर्माण झालेल्या शैक्षणिक क्रांतीचे ते समर्थक होते. बहुजन समाजाचे नेतृत्व करण्याचे त्यांच्याकडे सामथ्र्य होते. पण भ्रष्ट व्यवस्थेमध्ये त्यांना तडजोड करणे जमले नाही म्हणून त्यांच्यासारखा कर्तृत्ववान माणूस विधानभवनात, संसदेत दिसला नाही आणि देश एका विचारवंताला मुकला.

मी त्यांच्याशी अनेक विषयांवर बोलायचो. त्यांच्याकडून खूप काही जाणून-समजावून घ्यायचो. डिसेंबरला मुंबईत भेटून वर्तमानपत्राच्या वाटचालीबाबत बोलण्याचे ठरले होते. पण ते अर्धवट राहिले. सप्टेंबरमध्ये कणकवलीला झालेल्या भेटीत त्यांनी मला मा. श्री. शरद पवार यांचे आत्मचरित्र वाचायला सांगितले होते.

मुकुंदराव कदम सर नेहमी पाक्षिक ‘स्टार वृत्त’ला आपलं मानायचे. त्या माध्यमातून परमपूज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंच्या प्रवचनांचे शब्दांकन आवडीने वाचायचे! मला नेहमी प्रश्न पडायचा, सरांना अध्यात्माची गोडी कशी? त्यांनी ‘तत्वज्ञान’ विषय घेऊन एमए केलं होतं. तत्वज्ञान आणि अध्यात्मावरही त्यांचा दांडगा अभ्यास होता. पाक्षिक `स्टार वृत्त’मधून त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. पत्रकारितेचे शिक्षण मी त्यांच्याकडून घेतले; अशा माझ्या गुरुवर्यांनी मला जो मार्ग दाखविला तो थेट सद्गुरुंपर्यंत पोहचविणारा होता, हे मी निश्चितपणे सांगू शकतो. त्यांच्याचमुळे आध्यात्मिक पत्रकारितेचा नवा अविष्कार पा. `स्टार वृत्त’च्या माध्यामातून पाहावयास मिळाला. गुरुवर्यांनी माझ्यावर केलेले प्रेम शब्दात मांडता येणार नाही. अशा गुरुवर्यांची आठवण मला सदैव होत राहील. हे गुरुवर्य निश्चितपणे परमात्म्याच्या कुशीत विसावले; असेच त्यांचे कार्य होते, विचार होते. असे गुरुवर्य प्राचार्य मुकुंदराव कदम यांना साष्टांग दंडवत!

।। नाथसंविध् ।।

-नरेंद्र राजाराम हडकर

You cannot copy content of this page