सद्गुरु श्रीसाईनाथांच्या चरणी समर्पित!

।। हरि ॐ।।

श्रीसाई कोण होते? परमात्मा होते. परमात्मा श्रीराम म्हणून आले, श्रीकृष्ण म्हणून आले आणि आपले अवतार कार्य पूर्णत्वास नेले. तोच शिरडीमध्ये श्रीसाई म्हणून अवतरला. परमेश्वराची भक्ती कशी करावी, याचा आदर्श मार्ग दाखविला. भारतीय संस्कृतीचा ज्या गोष्टींवर पाया रचला आहे त्या गोष्टींमधील सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे खरीखुरी निष्काम भक्ती. परमात्म्याची ही भक्ती सर्वसामान्यांनी करून जीवन खऱ्या अर्थाने परमेश्वरी नियमांच्या चौकटीत जगावे; जेणेकरून भक्ती मार्गावरून जाणारा भक्त आणि परमात्मा यांच्यामध्ये कोणताही फरक ठरू नये. भक्ती म्हणजेच शुद्ध प्रेम. या शुद्ध प्रेमाची ताकद किती असते याची प्रचिती आम्ही `आई’कडून घेऊ शकतो. मग ती पशू योनीतील आई असो वा मानवी योनीतील आई असो. आई आपल्या मुलांवर किती प्रेम करीत असते, हे आई झाल्याशिवाय कळणार नाही. पण आईच्या मातृत्वाची ताकद सर्वोच्चस्थानी असते. मग ती अखंड ब्रह्मांडाची आई विठू माऊली, श्रीराम, श्रीकृष्ण, श्रीसाई, श्रीअनिरुद्ध आपल्या बाळांवर किती प्रेम करीत असावी बरं! परमात्मा येतो कशासाठी? भक्तांच्या भक्तीभावाला भुलून. तो एकाच गोष्टीला भुलतो, ती म्हणजे भक्तांची खरीखुरी भक्ती. भक्तांच्या भक्तीमध्ये एवढी ताकद असल्यामुळे तो पुन्हा पुन्हा सगुण साकार रूपात येतो. तेव्हा तो खऱ्या भक्ताला ओळख करून देतो की, `मी कोण आाहे?’ परमात्मा सार्इंनी आपल्या भक्तांना परमात्म्याच्या श्रीराम रूपात, श्रीकृष्ण रूपात, विठ्ठलाच्या रूपात प्रत्यक्ष दर्शन दिले. अगदी नास्तिक माणसालाही तो क्षमा करून भक्ती मार्गावर आणण्यासाठी सदैव कार्यरत राहतो. आपल्या भक्तांनी भक्तीचा उचित, सुंदर, यशस्वी हितकारक मार्ग स्वीकारावा, यासाठी अनेक लिला करतो. तो सर्व काही करतो ते भक्तांसाठी. अगदी मानवी देह धारण करून आल्यावर सुद्धा कुठल्याही दैवी शक्तीचे प्रदर्शन न करता मानवाच्या ताकदीला पेलू शकेल असं कार्यच हाती घेतो आणि त्या परमेश्वरी कार्यमध्ये सर्वांना सामावून घेतो. मात्र मानवाला मिळालेल्या कर्मस्वातंत्र्यानुसार प्रत्येक मानवाने ठरवायचे असते की, आपण परमात्म्याच्या पवित्र कार्यात सहभागी व्हायचे किंवा सहभागी व्हायचे नाही वा परमात्म्याच्या पवित्र कार्यावर टीका करायची. परंतु आमच्या ऋषीमुनींनी साधू संतांनी हजारो वर्षाच्या तपश्चार्येतून एकच समान अनुमान काढले की, परमात्मा सर्वांवर खरेखुरे प्रेम करतो आणि जो त्याच्यावर खरेखुरे प्रेम करतो तोच त्याचे प्रेम स्वीकारून जीवनाचा कायापालट करू शकतो. अनेक जन्म सार्थकी लावू शकतो. पुढील जन्मांची दिशा निश्चित करू शकतो. म्हणूनच श्रीज्ञानेश्वर, संत नामदेव, संत तुकाराम, संत तुलशीदाससारख्या असंख्य महान संतांनी केलेल्या उपदेशानुसार दाखविलेल्या मार्गावरून जाणेच आमच्यासाठी श्रेयस्कर ठरते.

हा परमात्मा प्रत्येक कृती भक्ताच्या प्रेमापोटीच करीत असतो. श्रीसाईनाथांनी शिरडीमध्ये मानवी देहामध्ये अनेक भक्तांना आपल्याकडे ओढून आणले. अनेकांना कित्येक अनुभव आले, त्यांच्या प्रत्यक्ष लिला पाहता आल्या. श्रीसाईसच्चरित्र हा ग्रंथ परमात्म्याचे चरित्र दाखवितोच पण आमच्यासाठी अत्यंत महत्वाचे म्हणजे श्रीसाईनाथांच्या भक्तांनी सार्इंची खरीखुरी भक्ती कशी केली, श्रीसार्इंवर निर्मळ प्रेम कसं केलं; हे समजून सांगतो आणि आम्हाला त्या परमात्म्यावर कसं प्रेम करायला हवं, त्या परमात्म्यावर श्रद्धा आणि सबुरी कशी ठेवायला पाहिजे, हे सहजपणे सांगतो.

हेमाडपंत पूर्णपणे साईनाथनच्या चरणांशी शरण गेले. संपूर्ण जीवन त्यांनी त्यांच्या चरणी समर्पित केलं. त्यांच्या भक्तीची सर्वोच्च अवस्था आपण साईसच्चरित्राच्या ५२व्या अध्यायात शेवटच्या ओवीत पाहतो.

अगाध साईनाथांची करणीं। हेमाड नितान्त स्थापिला चरणीं।
तयाला निजसेवेसी लावुनी। सेवा ही करवूनी घेतली ।।८८।।
शेवटीं जो जगच्चालक। सद्गुरू प्रबुद्धिप्रेरक।
तयाच्या चरणीं अमितपूर्वक। लेखणी मस्तक अर्पितों ।।८९।।

श्रीसाईनाथांची करणी अगाध आहे. ह्या हेमाडपंताला आपल्या पायाशी कायमचा बसविला आणि त्याला आपल्या सेवेला लावून ही सेवा करून घेतली. शेवटी जगाचा चालक व बुद्धीचा प्रेरक जो सद्गुरू त्याच्या चरणी मी अमर्याद तऱ्हेने लेखणी व मस्तक अर्पण करतो.

हेमाडपतांनी स्वत:ला सद्गुरूंच्या चरणांवर समर्पित केले.

You cannot copy content of this page