स्वर्गीय विजय मुंबरकर- विजयी योद्ध्याला सलामी! (लेखांक-२)
सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करताना अनेक `ऑफर्स’ येत असतात. संस्थांमध्ये संस्थाहितासाठी भूमिका घेणाऱ्या क्रियाशील सभासदांनाही अनेक आमिषं दाखविली जातात. कशासाठी? सत्ताधारी संस्था चालकांच्या भ्रष्ट कारभाराला, चुकीच्या व्यवहारांना मूकसंमती देण्यासाठी अशा अनैतिक गोष्टी केल्या जातात. त्याला बळी न पडणारा खऱ्या अर्थाने विजयी असतो! हा विजय चिरंतर टिकणारा असतो! प्रामाणिकपणा व कार्यक्षमता हे दोन सदगुण समाज हितासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तीकडे असल्या की त्यांनी घेतलेली भूमिका खऱ्या अर्थाने शुद्ध व निर्मळ असते; जी परमेश्वरी तत्त्वांना अर्थात सत्याला समर्थन करते. म्हणून अशा व्यक्ती देह सोडल्यानंतरही विजयी ठरतात! असंच व्यक्तिमत्व सन्मा. विजय मुंबरकर साहेबांचे होते!
प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करत विजय मुंबरकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. महिंद्रा कंपनीत तांत्रिक विभागात त्यांनी नोकरी केली. सेवानिवृत्त होईपर्यंत कामगारांच्या प्रश्नावर अभ्यासपूर्ण मांडणी करून व्यवस्थापनाकडे ते दाद मागायचे आणि कामगार व कंपनी हिताच्या अनेक गोष्टी त्यांनी अंमलात आणण्यास कंपनी व्यवस्थापनास भाग पाडले. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी सामाजिक कार्याचा आवाका अनेक पटीने वाढविला. सहकार शिक्षण संस्थेत त्यांनी केलेले कार्य आणि संस्थेच्या हितासाठी घेतलेली भूमिका खरोखरच कौतुकास्पद होती. त्यांनी सदर संस्थेमध्ये अगदी सचिव पदावरही उत्कृष्ट कार्य केले. मिठमुंबरी गावातील विकास मंडळातही त्यांचे योगदान सर्वोच्च होते. सध्या ते ज्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये राहत त्या सोसायटीच्या बाजूने त्यांनी अभ्यासपूर्ण भूमिका घेत बिल्डरच्या विरोधात सहकार खात्यातून आणि न्यायालयातून आदेश मिळविले. त्यांनी आपल्या जीवनात नेहमीच सत्याला आणि संस्था हिताला प्राधान्य दिले. त्यांना अनेक `ऑफर्स’ आल्या; परंतु त्यांनी त्या नाकारल्या; अर्थात त्यांनी स्वस्वार्थावर विजय मिळविला! विजय मुंबरकरांचा हा `विजय’ त्यांच्या मृत्यूनंतरही मृत होणार नाही!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेतही त्यांनी समाज संस्थेच्या हितासाठी आणि संस्थेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी घेतलेली भूमिका ही कधीच मृत होऊ शकत नाही. जर त्यांनी चाटुगिरी केली असती, त्यांनी तथाकथित यंत्रणेत सामील होऊन स्वार्थ साधण्यासाठी तडजोड केली असती, पदाच्या स्वार्थासाठी संस्था विरोधी काम करणाऱ्यांच्या कळपात सामील झाले असते; तर ते क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेत खजिनदार, सचिव, अध्यक्ष झाले असते! अगदी मरेपर्यंत विश्वस्त झाले असते! पण ते क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या भल्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत भूमिका घेऊन लढत राहिले! त्यांनी कणखर भूमिका घेऊन समाज संस्थेसाठी का व कसे लढायचे? ह्याचा आदर्श निर्माण केला; जो काळाच्या ओघात लुप्त होणार नाही! हाच तो विजय!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या पतपेढीमध्ये अंदाधुंदी कारभार सुरू होता; त्या विरोधात त्यांनी पुढाकार घेऊन सहकार खात्याला निवडणुका घेण्यास भाग पाडले आणि एक हाती निवडणूक जिंकून दाखविली. एवढेच नाही तर पतपेढीमधून बोगस कर्ज प्रकरणाबाबतीत त्यांनी सहकार खात्यातून चौकशीचे आदेश आणलेत! पण क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या तात्कालीन नादान, बदमाश पदाधिकाऱ्यांनी त्यांना साथ दिली नाही! चौकशीकामी भरावयाचे शुल्क २६ हजार रुपये संस्थेने मुद्दामहून भरले नाहीत. त्यामुळे बोगस कर्ज प्रकरणांची चौकशी झाली नाही आणि बोगस कर्ज देणारे तुरुंगात गेले नाहीत! समाज संस्थेत पदांवर बसणारे समाजद्रोही कोणाला वाचवत होते? हे वेगळं सांगण्याची गरज नाही! तरीही विजय मुंबरकर साहेबांनी केलेली लढाई प्रामाणिक सदस्यांना नेहमीच प्रेरणादायी असेल!
गेल्या तीन-चार वर्षात विजय मुंबरकर साहेबांनी इतर सर्व सामाजिक संस्थांच्या पदांचा राजिनामा देऊन फक्त आणि फक्त क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भूमिका घेण्यासाठी वेळ मिळावा म्हणून क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन समितीचे अध्यक्ष पद स्वीकारले! त्यांनी एकच ध्येय समोर ठेवले होते ते म्हणजे क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेतील भ्रष्ट यंत्रणेला पराभूत करण्याचे! परंतु धर्मादाय कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारामुळे जरी त्यांना संपूर्ण यश आले नाही तरी आमच्या दृष्टीने त्यांनी केलेला लढा यशस्वी ठरला; विजयी ठरला! कारण त्यांनी अनैतिकतेशी तडजोड केली नाही, पवित्र तत्त्वांना तिरांजली दिली नाही; म्हणून ते विजयी होते! त्यांच्या आदर्शावर काम करायचे ध्येय क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज परिवर्तन समितीचे आहे! परिवर्तन समितीचे सर्व पदाधिकारी – सभासद विजय मुंबरकर यांच्यासारखेच योद्धे आहेत! विजय मुंबरकर जरी देह सोडून गेले तरी त्यांनी क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या हितासाठी घेतलेली आक्रमक भूमिका परिवर्तनाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी स्वीकारलेली आहे! हाच तो विजय!!
अशा विजय मुंबरकर साहेबांवर अनेक लेख लिहावे लागतील! ते प्रत्येक ठिकाणी योद्ध्यासारखे लढले म्हणून मृत्यूनंतर श्रद्धांजली न वाहता त्यांना आम्ही त्रिवार सलामी देत आहोत!!!
-नरेंद्र हडकर











