सामाजिक जाण असलेला नेता समाजाने गमावला!

शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद गावकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली!

आज अतिशय दुःखद बातमी आली. क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज बांधव आणि शिवसेनेचे उपविभागप्रमुख शरद सहदेव गावकर यांचे दुःखद निधन झाले. सामाजिक बांधिलकी स्वीकारून जेव्हा प्रामाणिकपणे कार्य केले जाते तेव्हा समाजात आदर्श उभा राहतो आणि तो आदर्श चिरंतर दिपस्तंभाप्रमाणे अनेकांना प्रेरणा देत राहतो. असे सामाजिक आणि राजकीय कार्य शरद गावकर यांनी केले. त्यांच्या अचानक जाण्याने स्थानिक नागरिकांचे तसेच क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाजाचेही खूप मोठे नुकसान झाले आहे.

आपण समाजाचे देणे लागतो आणि आपण समाजासाठी कार्य केले पाहिजे; अशी भूमिका स्वीकारून शरद गावकर यांनी कार्याला सुरुवात केली. त्यांच्याकडे नेतृत्व करण्याची कला उपजत असल्याने शिवसेना ह्या राजकीय पक्षाच्या माध्यमातून आपल्या विभागात कार्याचा डोंगर उभा केला. कुठल्याही प्रसिद्धीचा हव्यास न ठेवता ते नेहमीच कार्य करीत होते. पुरळ, कोठार वाडीतील (ता.देवगड जि सिंधुदुर्ग) शरद सहदेव गावकर यांना लोक प्रेमाने `दादा’ म्हणायचे. खरोखरच ते लोकांच्या अडीअडचणींना सहकार्य करणारे `दादा’ होते म्हणूनच ते लोकप्रिय होते. त्यांच्या गावातील कुलदेवी मंडळाला ते सातत्याने मदत करायचे.

१९८४ साली त्यांची शिवसेना गटप्रमुखपदी नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी खऱ्या अर्थाने आपल्या निःस्वार्थ कार्याची सुरवात केली. संघटनेच्या माध्यमातून महागाई, अन्याय, स्थानिक प्रश्नांच्या विरोधात मोर्चा, आंदोलनांचे प्रभावीपणे त्यांनी नेतृत्व केले. १९८९ साली भारतीय कामगारांचे नेतृत्व करण्याकरिता भारतीय कामगार सेनेत त्यांनी प्रवेश केला. हिंदुजा इस्पितळात १९९२ साली नोकरीला लागल्यावर ते युनिट अध्यक्ष बनले. त्या माध्यमातून त्यांनी अनेक सुशिक्षित तरुणांना रोजगार मिळवून दिला. हिंदुजा इस्पितळातील नियमावलीचा अभ्यास करून त्यातील सवलती गरजू रुग्णांना कशा मिळतील? ह्यासाठी त्यांनी यशस्वी प्रयत्न केले. अनेक रुग्ण मरणाच्या दारातून मागे फिरले; ते शरद गावकर यांच्या सहकार्यातून!

शिवसेनाप्रमुखांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी अनेक वेळा मोफत वैद्यकीय शिबिरं आयोजित केली. लाखो गरजू रुगांनीं त्याचा लाभ घेतला. रुग्ण सेवा करून त्यांनी केलेले कार्य नेहमीच आदर्शवत राहील. यशस्वी खेळाडू तयार होण्यासाठी मैदाने आवश्यक असतात, अशी मैदाने त्यांनी उभारली, जतन केली. हाच सामाजिक कार्याचा आदर्श जपत त्यांच्या पत्नी स्मिताताई नगरसेविका झाल्या. महिलांचे बचतगट तयार करून त्यांना रोजगाराच्या संधी त्यांनी उपलब्ध करून दिल्या. विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप, जेष्ट नागरिक कार्डचे वाटप, रक्तदान शिबिर, शरीर सौष्ठवं स्पर्धा असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. शौचालय, पायवाट, रस्ते, पाणी इत्यादी मूलभूत सुविधा गरजूंना त्यांनी मिळवून दिल्या. त्यासाठी त्यांनी केलेले परिश्रम कोणीही विसरू शकत नाही.

सर्वांशी आपुलकीने वागणे, प्रेमाने सुसंवाद साधणे, गरजूंना नेहमीच मदत करणे; असा सुस्वभाव शरद गावकर यांचा होता. त्यात त्यांनी आपल्या पत्नीच्या साहाय्याने बाजी मारली. मात्र आज त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या कर्तृत्वास अभिवादन! शरद गावकर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही समाजबांधव-भगिनी सहभागी आहोत. शरद गावकर यांच्या आत्माला चिरशांती मिळो, ही जगदंबा मातेकडे प्रार्थना!

-नरेंद्र हडकर

You cannot copy content of this page