अजित परब यांचे पर्यावरणपूरक अभूतपूर्व संशोधन!
संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत! प्रदूषण-दुर्गंधीत घट होऊन जमिनीची सुपीकता वाढेल!
सगळा सुंदर स्वच्छ परिसर, कुठेही कचरा नाही, दुर्गंधी नाही, हवेच-पाण्याचं प्रदूषण नाही, चिखल नाही, मच्छर नाही. सार्वजनिक शौचालय मुताऱ्या दुर्गंधीमुक्त, डम्पिंग ग्राउंड दुर्गंधीमुक्त. ह्या मधून जे काही तयार होईल; ते पर्यावरण पूरक असेल! असं संशोधन झालं तर??? होय, असं संशोधन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील पर्यावरण प्रेमी असणाऱ्या अजित परब या आर्किटेक युवकाने केले आहे. फक्त संशोधन करून हा युवक थांबला नाही तर प्रत्यक्षात कृती करून जगाला दाखवून दिले आहे की वरील वर्णन खरोखरच शक्य आहे.
वेंगुर्ले येथे राहणारे आर्किटेक अजित परब यांनी आपल्या अभूतपूर्व आणि बहुमूल्य असे संशोधन संपूर्ण समाजासाठी बहाल केले आहे. आजच्या युगामध्ये कचरा, पाण्याचं आणि हवेचे प्रदूषण मानवी आरोग्याला घातक ठरत आहे. सांडपाणी वाहून नेणारी गटारे असतील, कचरा टाकण्याची ठिकाणं असतील, सखल भागातमध्ये चिखल साठलेला असेल, सार्वजनिक शौचालय असतील, कारखान्यातून येणारे दुर्गंधीयुक्त रसायनमिश्रित पाणी असेल; या सर्व गोष्टींमधून मानवाच्या आरोग्यावर दुष्परिणाम घडून येत असतात. त्यासाठी शासन आपल्या परीने करोडोंच्या पटीत खर्च करीत असते. स्वच्छता अभियान राबविण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था अनेक योजना आखत असतात- कार्य करीत असतात; परंतु अजित परब यांनी केलेले संशोधन आणि त्या संशोधनातून यशस्वी झालेले प्रयोग वरील सर्व समस्यांचे निवारण करतात.
कृषी क्षेत्र हे भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे. कृषी क्षेत्राचे आधुनिक कृषी म्हणून ओळखले जाणारे पद्मश्री श्री. सुभाष पाळेकर यांनी नापीक जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी अनोख्या पद्धतीने जीवामृत बनविण्याची कला सर्वांसमोर खुली गेली आणि त्या प्रयोगाचा वापर करून आज असंख्य शेतकरी आपल्या शेतामध्ये यशस्वीपणे रसायनमुक्त आरोग्यदायी पीकं घेत आहेत. बॅक्टेरिया युक्त असलेल्या त्याच जिवामृताच्या सहाय्याने अजित परब यांनी अनोखा असा पर्यावरणपुरक प्रयोग सिद्ध केला.
अजित परब यांनी विशिष्ट पद्धतीने बनविलेले जीवामृत दुर्गंधीयुक्त गटारात- नाल्यात, शौचालयाच्या टाक्यांमध्ये, प्रदूषित पाण्यात टाकले असता काही तासांमध्ये तेथील दुर्गंधी नाहीशी होते, विषारी रसायने नष्ट होतात. डम्पिंग ग्राउंडवरती जर हे जीवामृत टाकले तर त्या कचऱ्याचे रूपांतर सुपीक मातीमध्ये होते. त्यामुळे तेथील दुर्गंधी आणि मच्छर निर्माण होण्याची ठिकाणं नाहीशी होतात.
अजित परब यांनी सावंतवाडीतील कचरा डेपोवर हा प्रयोग यशस्वी केलाय. तसेच वेंगुर्ले येथील काही खाजगी व सार्वजनिक शौचालये, मुताऱ्या, मच्छीमार्केट तसेच खासगी वसाहत्यांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगातून सिद्ध केले आहे की, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी ह्या मार्गाने गेल्याशिवाय दुसरा एवढा सोपा आणि स्वस्त पर्याय नाही. सावंतवाडीतील कचरा डेपोवर प्रयोग यशस्वी झाल्यानंतर नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी अजित परब यांचे कौतुक करून संपूर्ण सावंतवाडी शहर प्रदूषणमुक्त करण्याची जबाबदारी सोपविण्याचा उचित निर्णय घेतला आहे.
आज सांडपाणी, दुर्गंधी, कचरा, प्रदूषण, नापीक जमीन इत्यादी कारणांनी मोठी गावं, छोटी-मोठी शहरं त्रस्त झाली आहेत. संपूर्ण जग त्यासाठी चिंताग्रस्त आहे. परंतु अजित परब यांनी केलेल्या यशस्वीपूर्ण संशोधनातून फक्त महाराष्ट्रालाच नव्हेतर भारताला फायदा होऊ शकतो. संपूर्ण देशात संशोधनाचा वापर झाल्यास प्रचंड आर्थिक बचत होऊन आरोग्यावरील दुष्परिणाम आणि प्रदूषण नाहीसे होणार!
अजित परब आणि आपल्या संशोधनाबद्दल सविस्तर माहिती पाठविली आहे, येथे क्लिक करून ती माहिती आपण वाचू शकतो.
अजित परब यांनी केलेल्या संशोधनाबद्दल अभिनंदन!
त्यांच्या संशोधनातून उद्याचा भारत प्रदूषणमुक्त, दुर्गंधी मुक्त आणि आरोग्यदायी पर्यावरणपूरक व्हावा ही सदिच्छा!
अजित परब यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!
-नरेंद्र हडकर
अजित परब यांच्या संशोधनाचे काही निवडक फोटो