संपादकीय- तिसऱ्या महायुद्धाची भक्कम पायाभरणी!

जगाच्या राजकीय आणि लष्करी पटावरील हालचालींनी सध्या साऱ्या मानवजातीच्या भवितव्यावरच मोठे संकट आणले आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात सध्या सुरू असलेल्या संघर्षाने जगभर चिंता आणि अस्थिरता निर्माण केली आहे. ही लढाई केवळ दोन देशांमध्ये मर्यादित राहिली नाही, तर इतर राष्ट्रांनाही त्याच्या भोवऱ्यात खेचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच ही परिस्थिती तिसऱ्या महायुद्धाच्या भक्कम पायाभरणीकडे वाटचाल करत असल्याचे स्पष्ट संकेत देत आहे!

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील शत्रुत्व नवीन नाही; परंतु गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही देशांच्या लष्करी कारवायांमध्ये झालेली तीव्रता हे दर्शवते की, हा संघर्ष केवळ कुरघोड्यांपुरता मर्यादित राहणार नाही. इराणच्या अणु कार्यक्रमामुळे इस्त्रायलने वाढवलेली भीती आणि इस्त्रायलने गाझा व अन्य क्षेत्रांतील कृतीमुळे इराण समर्थित गटांचा प्रक्षोभ ह्या साऱ्यांचा शेवट अत्यंत विध्वंसक ठरू शकतो. हा संघर्ष आता फक्त मध्यपूर्वेपुरता मर्यादित राहिलेला नाही. अमेरिका, रशिया, चीन, तसेच युरोपियन राष्ट्रे यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष हस्तक्षेप सुरू झाला आहे. अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी आहे, तर रशिया आणि चीन हे इराणच्या बाजूने झुकल्याचे संकेत दिसत आहेत. सौदी अरेबिया, तुर्कस्तान, कतार, तसेच लेबनॉनमधील हिजबुल्ला सारख्या शक्तींनाही या संघर्षात खेचले जात आहे म्हणजेच ही एक प्रॉक्सी वॉर न राहता पूर्णतः आंतरराष्ट्रीय लढाईमध्ये रुपांतर होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

या युद्धाचा फटका केवळ रणभूमीपुरता मर्यादित राहणार नाही. तेल आणि गॅस पुरवठ्यावर होणारा परिणाम जगभरातील अर्थव्यवस्थांना हादरा देईल. जागतिक महागाई, बेरोजगारी, अन्नधान्य तुटवडा, स्थलांतर, आणि दहशतीचा वाढता धोका; हे सारे परिणाम सर्वसामान्य जनतेच्या दैनंदिन जीवनावर खोल परिणाम करतील. भारतातदेखील इंधन दरवाढ, आयात-निर्यातीवरचा परिणाम आणि पश्चिम आशियातील कामगारांवरचा धोका हे चिंतेचे विषय ठरू शकतात. सर्वात भीषण गोष्ट म्हणजे या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अणु युद्धाचा धोका वाढत चालला आहे. इराणच्या अणु क्षमतेबाबतच्या संशयामुळे इस्त्रायल आक्रमक झालेला आहे. याउलट इराणदेखील आपल्या अस्तित्वासाठी कठोर पावले उचलण्यास तयार असल्याचे सूचित करते. जर या युद्धात अण्वस्त्रांचा वापर झाला, तर तो संपूर्ण मानवजातीसाठी अभिशाप ठरू शकतो.

इराण आणि इस्त्रायल यांच्यातील वाढता संघर्ष हा जागतिक राजकारणाचा एक अत्यंत संवेदनशील आणि धोकादायक टप्पा आहे. या संघर्षात अमेरिका ही केवळ प्रेक्षक नाही, तर एक सक्रिय आणि निर्णायक शक्ती आहे. तिची भूमिका या युद्धाचे स्वरूप, कालावधी आणि संभाव्य परिणाम यांच्यावर थेट परिणाम करणारी आहे. द्वितीय महायुद्धानंतर आणि विशेषतः १९४८ मध्ये इस्त्रायलच्या स्थापनेपासून अमेरिका ही त्या देशाची प्रमुख पाठराखी राहिली आहे. लष्करी मदत, आर्थिक सहाय्य, आणि राजनैतिक संरक्षण अशा सर्व स्तरांवर अमेरिका इस्त्रायलच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळेच इराणसोबत संघर्ष वाढल्यास अमेरिका आपले समर्थन लष्करी स्वरूपातही देण्याची शक्यता आहे. १९८०च्या दशकातील इराण कॉन्ट्रा प्रकरणापासून ते सध्याच्या युक्रेन-गाझा दोन्ही आघाड्यांवर अमेरिकेच्या भूमिकेपर्यंत इतिहास पाहता, अमेरिका नेहमी आपली जिओ-पॉलिटिकल रणनीती आणि तेल व व्यापार स्वार्थ जोपासण्यासाठी मध्यपूर्वेतील परिस्थितीला हाताळत आली आहे.

इराणच्या अणु कार्यक्रमाबाबत अमेरिका वर्षानुवर्षे आक्रमक भूमिका घेत आहे. ट्रम्प प्रशासनाने “Joint Comprehensive Plan of Action” (JCPOA) मधून बाहेर पडून इराणवर कडक निर्बंध लावले. अमेरिकेला वाटते की अण्वस्त्र सुसज्ज इराण ही मध्यपूर्वसाठी आणि इस्रायलसाठी सर्वात मोठा धोका ठरू शकतो. सध्या अमेरिकेची लष्करी उपस्थिती फारसच्या आखातात (Persian Gulf) आणि भूमध्य सागरात वाढवण्यात आली आहे. युद्धनौका, ड्रोन यंत्रणा आणि संरक्षण यंत्रणा तैनात करण्यात आल्या आहेत. हे केवळ इस्त्रायलला समर्थन देण्यासाठीच नव्हे, तर इराणला व त्याच्या समर्थक गटांना जसे हिजबुल्ला किंवा हौथी बंडखोर ह्यांना दबावाखाली ठेवण्यासाठीही आहे.

अमेरिकेच्या भूमिकेमुळे हे युद्ध एका प्रॉक्सी वॉर च्या पुढे जाऊन सरळ आंतरराष्ट्रीय संघर्ष बनू शकते. त्यामुळे भारतासारख्या देशांनाही स्वतःच्या हितसंबंधांची काळजी घेत भूमिका ठरवावी लागते. अमेरिका एकीकडे भारताचा सामरिक भागीदार असला तरी भारताने नेहमीच मध्यपूर्वेतील संघर्षांबाबत संतुलित भूमिका घेतली आहे. अमेरिका आपल्या शस्त्रबळावर अवलंबून राहते आणि इराणला पूर्णतः शत्रू मानत राहिली, तर युद्धाची व्याप्ती वाढणे अपरिहार्य आहे. पण जर अमेरिका शांततामूलक संवादाला प्राधान्य देत युद्धाऐवजी संवादाचे पर्याय शोधली, तर हे संकट टाळणे अजूनही शक्य आहे.

ह्याचा सर्वांगिण विचार करता, आपण एका अत्यंत धोकादायक वळणावर उभे आहोत. तिसऱ्या महायुद्धाची पायाभरणी सुरू झाली आहे का? हा प्रश्न काल्पनिक राहिलेला नाही. आंतरराष्ट्रीय समुदायाने तातडीने शांततामूलक प्रयत्न केले नाहीत, तर हे युद्ध संपूर्ण जगाच्या स्थैर्याला हादरा देऊ शकते. आपण आज युद्धासाठी नाही, तर शांतीसाठी एकजूट होण्याची गरज आहे. कारण महायुद्धात कोणाचाच विजय होत नाही – फक्त मानवतेचा पराभव होतो!

One thought on “संपादकीय- तिसऱ्या महायुद्धाची भक्कम पायाभरणी!

Comments are closed.

error: Content is protected !!