बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामन्यासाठी लोकल सुरु करा!!

राजकीय पक्षांचे कार्यक्रम जोरदारपणे सुरु आहेत, त्यांना कोरोना महामारीची अजिबात भीती नाही. गेल्या मार्च महिन्यापासून आजपर्यंत सर्व रोजगार बुडाले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. आता आत्महत्या करून जीव देण्याशिवाय सामान्य जनतेसमोर पर्याय नाही. आता बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामान्यांसाठी लोकल सुरु करा! अशी जनता टाहो फोडून सांगत असताना सरकार `कोरोनापासून बचाव करण्यासाठी सामान्यासांसाठी लोकल बंदी’ केल्याचे सांगत आहे; तर दुसरीकडे बसमधील गर्दी, बस थांब्यावरील गर्दी, रस्त्यावरील गर्दी लोकल बंद असल्याने वाढली आहे. लोकल सामान्यांसाठी बंद ठेवण्याचे शासनाचे लॉजिक काही समजत नाही. त्याबद्दल चेष्टा केली जाते आणि त्यात तथ्य नाही, असंही म्हणता येणार नाही.

लॉकडाऊनपूर्वी मुंबईत उपनगरी रेल्वेने ८० लाखांहून अधिक प्रवासी दररोज प्रवास करायचे; आज प्रवास करणाऱ्यांची संख्या ३५ लाख आहे. मग खाजगी आस्थापनांमध्ये काम करणारे ४५ लाख प्रवासी काय करीत असतील? त्यांच्या रोजगाराचे काय झाले असेल? ते आणि त्यांचे कुटुंबीय कसे जगत असतील? ह्याचा विचार सरकार नावाच्या यंत्रणेने करायला नको का? `कोरोना महामारी कायमस्वरूपी जाणार नाही, कोरोनाबरोबर यापुढे जगायचे आहे!’ असं सांगणारं सरकार सामान्यांचा कधी विचार करणार आहे? सामान्यांना आजपर्यँत कोणतेही पॅकेज सरकार का देऊ शकले नाही? पेट्रोल डिझेलचे दर दरदिवशी वाढत असल्याने महागाई प्रचंड वाढली आहे; त्याबाबत सरकार काहीच बोलायला तयार का नाही? दरमहिन्याला रेशनवर पाच-दहा किलो तांदूळ गहू देऊन चार-पाच सदस्य असणाऱ्या कुटुंबाने जगायचे कसे? कोरोना काळात दुसऱ्या जिल्हयात जाण्यासाठी लागणाऱ्या ईपासमध्ये घोटाळे सरकारला का रोखता आले नाहीत? लोकलमधून प्रवास करण्यासाठी पैसे घेऊन शासनाची खोटी ओळखपत्रे देणारी टोळी निर्माण झालीच कशी? कोरोना प्रतिबंधित लसीकरण किती दिवसात पूर्ण होईल? हे कोणीही सांगत नाही. किमान लसीकरण झालेल्या प्रवाशांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा का देण्यात येत नाही? लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मुंबईची जीवनवाहिनी थांबवून जीवन संपविण्याचा प्रयत्न का होतोय? असे अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात आहेत. ह्यासंदर्भात शासनावर जनतेचा प्रचंड रोष वाढत आहे.

रस्त्यावरची गर्दी पाहून कोरोना थोतांड असल्याची मानसिकता जनतेच्या मनात तयार होत आहे. हे थांबविण्यासाठी आता तरी बस्स झालं कोरोनाचं नाटक; सामन्यासाठी लोकल सुरु करा!! असं जनता स्पष्टपणे बोलू लागली असून त्यांच्यातील उद्रेक कधीही उफाळून येऊ शकतो.

कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याने सर्वांसाठी लोकल सुरु करता येणार नाही; अशी शासनाची भूमिका योग्य असली तरी दुसरीकडे सामान्य जनतेने काय करायचे? हा प्रश्न उरतोच! मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे; त्या आर्थिक राजधानीचं अवमूल्यन लोकल बंद ठेऊन होत आहे. त्यासाठी कोरोना प्रतिबंधित लसीकरण झालेल्यांना प्रवास करण्याची मुभा द्यायलाच पाहिजे; अन्यथा लसीकरण निरर्थक ठरेल. लसीकरणाचा आताचा वेग पाहता मुंबईचे लसीकरण पूढील चार-सहा महिन्यात पूर्ण होईल; ह्याची शाश्वती नाही. मग करायचे काय? हा जीवघेणा प्रश्न चाकरमान्यांसमोर आहे!

You cannot copy content of this page