संपादकीय- समर्पणाचं सामर्थ्य!

जेव्हा जेव्हा मनुष्य समर्पित भावनेने कार्य करतो, कोणतीही कृती करतो तेव्हा त्यामध्ये त्याचा स्वतःचा कोणताही स्वार्थ दडलेला नसतो. तर `माझ्या देशासाठी, माझ्या देशातील समाजासाठी, मानवाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी, विश्वाच्या कल्याणासाठी माझ्याकडून कार्य व्हावे’ हीच सदिच्छा त्या समर्पित मनुष्याकडे असते आणि हेच समर्पण जेव्हा देशासाठी असतं तेव्हा देशातील शास्त्रज्ञ-संशोधक आणि सैनिक विश्वात आपल्या देशाला सामर्थ्य प्राप्त करून देतात. काही तासांपूर्वी भारत अंतराळ संशोधन संस्थेच्या संशोधकांनी चांद्रयान-३ ही मोहीम यशस्वी करून देशाला अभूतपूर्व यश मिळवून दिले. त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. भारतीय संशोधकांनी जे देशासाठी समर्पण केले आहे, त्याचे ते सामर्थ्य आहे. म्हणूच त्या समर्पणाला सलाम! त्या समर्पणाला देशातील १४० कोटी जनतेचा सलाम!

भारताने विश्वाचे नेतृत्व करावे ही १४० कोटी जनतेची इच्छा आहे. त्यासाठी शास्त्रज्ञ समर्पण भावाने कार्य करीत असतात. हाच समर्पण भाव आमच्या सैनिकांच्या मनात – रोमारोमात असतो. म्हणून ते सदैव प्राणार्पसारखं समर्पण करण्यास सदैव सज्ज असतात. म्हणूनच भारतीय सैन्य दलाचे सामर्थ्य सुद्धा विश्वाला अचंबित करणारे असते. मग आम्हा १४० कोटी जनतेची जबाबदारी नेमकी काय असावी? ह्याची जाणीव ठेवावीच लागेल.

न्यायपालिका (Judiciary), कार्यकारी मंडळ/ अधिकारी वर्ग (Executive), प्रसारमाध्यमे (Media) आणि विधिमंडळ/ संसद/ विधानसभा (Legislature) हे लोकशाहीचे चार स्तंभ मानले जातात; त्यांनीही हा समर्पण भाव जपल्यास चांद्रयान- ३ मोहिमेप्रमाणे जगात भारताचे सामर्थ्य निश्चितच पहिल्या क्रमांकाचे ठरेल. हे चारही स्तंभ डळमळीत झाल्यास देशाची खूप मोठी हानी होते आणि देशाच्या सामर्थ्याचे यान भरकटते. ह्याचा अनुभव भारतीयांनी घेतला आहे आणि घेत आहे. विशेषतः विधिमंडळ/ संसद/ विधानसभा (Legislature) ह्या स्तंभाकडून खूप मोठी अपेक्षा आहे. कारण आजचे राजकारण अनैतिकच्या गटारात डुबत असल्याचे दिसते. त्याच्या दुष्परिमाण मग इतर तीन स्तंभांवर झालेला दिसतो. ह्या चारही क्षेत्रात संशोधकांसारखा तसेच सैनिकांसारखा समर्पण भाव आल्यास भारत आपसूकच सर्वच क्षेत्रात सर्वांगीण प्रगतीची पताका फडकवेल.

आजच्या ऐतिहासिक दिवसाच्या सर्वांना शुभेच्छा देताना भारताने भविष्यातील संकटांचा आणि संधींचा मागोवा घेऊन सक्षम व्हायला पाहिजे. येणारा काळ जगासाठी खडतर असेल. कोरोना महामारीच्या काळात ही खडतरता किती भीषण असेल? हे समजून आले. कुठल्या क्षेत्रात, कुठल्या प्रांतात देश मागे राहतोय? ह्याचा देशाच्या नेतृत्वानेच नव्हेतर देशातील सर्वच जनतेने आणि विशेषतः लोकशाहीच्या चारही स्तंभांनी दखल घेऊन समर्पण वृत्तीने कार्य केले पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने लोकशाहीतील समर्पणाचे सामर्थ्य भारताला सदैव सर्वोच्च स्थानी ठेवेल.

– नरेंद्र राजाराम हडकर