संपादकीय… क्षा. म. समाज संस्थेच्या अध्यक्षांनी स्वीकारलेल्या सैतानी परंपरेचा नाश व्हायलाच पाहिजे!
सत्तेचा माज, खुर्चीचा अहंकार आणि स्वार्थापोटी घातलेला परंपरेचा बुरखा मानवाला सैतान बनवितो! तो सैतान फक्त आणि फक्त आपला व आपल्या सैतानी यंत्रणेत सामील होणाऱ्या लोकांचा आर्थिक फायदा पाहत असतो! अशी व्यक्ती जेव्हा संस्थेच्या प्रमुखपदी असते तेव्हा ती संस्थेचं भलं करूच शकत नाही. संस्थेच्या हितासाठी – भल्यासाठी जे सभासद प्रश्न विचारतील, संस्थेच्या चुकीच्या आणि गैर कारभाराविषयी प्रश्न उपस्थित करतील, लोकशाही मार्गाने जे लढा देतील; त्यांना अपमानित करणे, त्यांची निंदानालस्ती करणे, त्यांची बदनामी करणे, त्यांना विरोधक-संस्थाद्रोही म्हणणे; असले गलिच्छ धंदे ह्या व्यक्ती करतात. संस्थेत निर्माण होणाऱ्या काळया पैशाचा अमाप वापर करून शासकीय यंत्रणांना मॅनेज करायचे आणि आपल्या संस्थेला लयास नेणाऱ्या गैरकारभाराला लपवून ठेवायचे पाप ही माणसं करीत असतात. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की, नियती कोणालाही सोडत नाही! त्याच्या काठीचा आवाज होत नाही; पण दुष्परिणाम भोगावेच लागतात!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज ही संस्था मीठ गावडे समाजाची आहे व ती महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियमाच्या तरतुदींनुसार आणि भारताच्या संविधानाला अनुसरून अर्थात राज्य व केंद्र शासनाच्या कायद्याला अनुसरून चालविणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे क्षा. म. समाज ही संस्था बुरसट विचारांच्या परंपरेतून, हुकूमशाही प्रस्थापित करणाऱ्या परंपरेतून सुरु ठेवण्याचा मानस आजचे अध्यक्ष बोलून दाखवितात तेव्हा तळ पायाची कळ मस्तकात जाते. संस्थेतील भ्रष्ट कारभाराबाबत आणि स्वतःच्या घशात घालण्यासाठी संस्थेत दरवर्षी सुमारे ३० ते ४० लाख रुपये (काळी रक्कम) ब्लॅक मनी तयार केला जातो; त्याबाबत प्रश्न विचारले तर “त्याची उत्तरे सर्वांसमोर देणार नाही, वार्षिक सर्वसाधारण सभेत देणार नाही! कारण ती आमच्या संस्थेची ८८ वर्षाची परंपरा आहे!” असं सांगणं; हे अध्यक्षांना शोभत नाही. गेल्या बारा वर्षाच्या काळात सात वर्षे अध्यक्ष पद भूषविणारे `पाद’ संस्थेचे कामकाज परंपरेनुसार चालविण्याचा अट्टाहास धरतात; तो संस्थेच्या प्रगतीसाठी घातक आहे, संस्था द्रोही आहे, संस्था विरोधी आहे! म्हणून हा लेखन प्रपंच!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्था आमच्यासाठी मातृतुल्य आहे, ऋषी तुल्य आहे, परमात्मा तुल्य आहे. त्यामुळे ह्या संस्थेत जे चुकीचे घडते त्याचा लेखाजोगा मांडण्यासाठी मी `समाज माझा, मी समाजाचा!’ ह्या ब्लॉगवर अनेक लेख लिहिले. त्या लेखातून संस्थेचा कारभार सुधारावा म्हणून विनंती केली, प्रार्थना केली! पण सगळं व्यर्थ गेलं! म्हणून आता पाक्षिक `स्टार वृत्त’च्या संपादकीय लेखातून समाचार घेणार आहोत.
आम्ही सर्व एकमेकांचे नातेवाईक आहोत; पण चुकीला चूक म्हणण्याचे धाडस आम्ही दाखवू शकलो नाही तर ज्यांनी संस्था उभारण्यासाठी जीवन समर्पित केले त्यांचे शाप लागल्याशिवाय राहणार नाहीत! जो संस्थेत चुकीचे काम करतोय त्याच्या पुढील कित्येक पिढ्यांना ते शाप भोगावेच लागणार आहेत; शिवाय त्या व्यक्ती वर्तमान जीवनातही सुखाने जीवन जगू शकणार नाहीत. कारण डॉ. शिरोडकर साहेबांनी, एच. डी. गावकर साहेबांनी, समाजमाता विजयाताईंनी संस्थेसाठी रक्ताचे पाणी केले; आपलं अख्ख जीवन समर्पित केलं! अशा संस्थेत स्वतःच्या आर्थिक व पदाच्या स्वार्थापोटी भ्रष्ट कारभार करीत असतील तर त्यांचा `निकाल’ लागणार आहे! अशांचा कठोर शब्दात समाचार आम्ही नक्कीच घेत राहू!
क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेत नेमकं काय घडतं ते आपण पाहू!
निवडून आलेल्या कार्यकारणी सदस्यांना आर्थिक हिशोब मासिक सभेत तोंडी वाचून दाखविला जातो; मात्र त्याची लेखी प्रत अनेकदा मागणी करूनही त्यांना दिली जात नाही! हीच ह्यांची अघोरी परंपरा! ह्या जमाखर्चावर कार्यकारणी सदस्यांना प्रश्न विचारायचा अधिकार नसतो. योग्य प्रश्न असूनही त्याकडे दुर्लक्ष केला जातो. जो कोणी मासिक सभेत प्रश्न विचारेल त्याला बडतर्फ करण्याची धमकी दिली जाते; एवढेच नाही तर काही सदस्यांना बडतर्फ केले आहे; तर लायक असूनही चार-पाच सदस्यांना कोणतीच पदे दिली जात नाहीत! हीच ती घाणेरडी परंपरा!
सभेत कार्यकारणी सदस्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत, ह्याचा अर्थ संस्थेत भ्रष्टाचार होतो. जे चाटुगिरी करतात त्यांना पदे दिली जातात आणि जे संस्थेच्या हिताची भूमिका घेतात त्यांना यंत्रणेतून डावलले जाते! हीच ती संस्था द्रोही परंपरा!
संस्थेच्या हितासाठी अनेक प्रश्न उपस्थित करणारे आणि संस्थेच्या इतिहासातील सलग शंभर दिवस अहिंसा मार्गाने आंदोलन करणारे कार्यकारणी सदस्य संदीप धोपटे यांना बडतर्फ करण्यात आले! मात्र त्यांना बडतर्फ का केले? हे मागणी करूनही भ्रष्ट यंत्रणेने लेखी कळविले नाही. भारतीय संविधानाने दिलेले अधिकार नाकारण्याची परंपरा संस्थेमध्ये `ब्लॅकमनी’ तयार करते. ही परंपरा जपण्याचा कुटील डाव खेळाला जातो.
ह्या परंपरा क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज संस्थेच्या नाहीत! आणि अशा परंपरांचा बुरखा घेऊन जो कोणी मनमानी करीत असेल तर त्याचा बुरखा आम्ही टराटरा फाडायला समर्थ आहोत! (क्रमशः)
– नरेंद्र हडकर