संपादकीय- समाजसेवेचा अविस्मरणीय दीपोत्सव!

दिपवाली सण आहे- उत्सव आहे, परंपरा आहे, संस्कृती आहे, संस्कार आहे!
यामध्ये काय नाही? परमात्म्याची भक्ती आहे, पूजा आहे, सेवा आहे, आनंद आहे, उत्साह आहे, मौज आहे, मस्ती आहे!
पाहुण्यांची- मित्रमंडळींची येजा आहे, नातेसंबंध दृढ करणारे क्षण आहेत!
ऋणानुबंध जपणारे संस्कार आहेत. पणत्या, कंदील, तोरणं, विद्युत रोषणाई, फटाके, नवीन कपडे, दागदागिने असं सर्व काही आहे!
फराळ, मिठाई, सुकामेवा, चमचमीत खमंग चविष्ट पदार्थांची रेलचेल, भेटवस्तू, शुभेच्छा असं खूप काही!
अशा ह्या दीपावलीच्या सणांमध्ये अनेकजण तीर्थस्थानी जातात, कोणी पर्यटनाला जातात!
वसुबारस, धनत्रयोदशी, धनलक्ष्मी पूजन, यमदीप पूजन, धन्वंतरी जयंती, नरक चतुर्दशी, अभंगस्थान, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, दीपावली पाडवा, गोवर्धन पूजा, भाऊबीज एवढे सारे सण दिपावलीत एकवटले आहेत!
प्रत्येकजण आपापल्या आर्थिक कुवतीनुसार, आपापल्या सोयीनुसार, आपापल्या सुख-दुःखानुसार दीपावलीचा आनंद मात्र लुटत असतो, व्यक्त करीत असतो. हे आनंदी क्षण मात्र हृदयाच्या धमन्यांमध्ये स्थिर होतात.

हा दीपावलीचा सण समाजसेवेच्या माध्यमातून साजरा केला तर? “अरे फारच छान!” असे उदगार आपल्या तोंडून सहजपणे येतील. अनेक स्वयंसेवी संस्था, स्वयंसेवक दिपावलीत समाजसेवेचे उपक्रम यशस्वीरित्या पूर्ण करतात. त्यातून त्यांना मिळणारा आनंद सर्वोच्च असतो!

ह्या दीपावलीतील लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सकाळी उद्योजक व जेष्ठ समाजसेवक श्री. सुरेश अंकुश डामरे यांनी आपल्या कुटुंबासमवेत समाजसेवेचा एक छोटासा पण लक्षणिय उपक्रम यशस्वी केला! मुंबई अंधेरी येथील वर्सोवा- जुहू लिंक रोडवर फुटपाथवर गरीब कष्टकरी समाजातील मुलांची शाळा नियमितपणे भरते. येथे प्रत्येक मुलाला अभ्यासाबरोबर जीवनात यशस्वी होण्यासाठीचे सुसंस्कार दिले जातात. तज्ञांकडून व्यक्तिमत्व विकसित करण्याचे तंत्र शिकले जाते अर्थात बाळकडू पाजले जाते! आशाकिरण आणि प्रयास ह्या सेवाभावी विश्वस्त संस्थांमार्फत त्याचे उत्कृष्टरित्या नियोजन केले जाते. सन्मानिय श्री. अजित कालव नावाचे जेष्ठ समाजसेवक येथे आपली सेवा देतात. त्या ठिकाणी दीपावलीनिमित्त अर्थात लक्ष्मीपूजन दिवशी श्री. सुरेश अंकुश डामरे आपल्या कुटुंबियांसोबत तिथे जाऊन त्या विद्यार्थ्यांना भेटले. त्यांना मिठाई दिली, त्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले, त्या मुलांशी सुसंवाद साधला. त्यांनी सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. “खूप खूप शिका आणि समाजासाठी देशासाठी प्रामाणिकपणे काम करा! स्वतःच्या सर्वांगिण विकासाबरोबर समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करा!” असे आवाहन त्यांनी केले. त्यावेळी श्री. सुरेश अंकुश डामरे यांच्यासोबत त्यांची पत्नी सौ. रंजिता, मुलगा श्री. युवराज, मुलगी कु. स्वप्नाली, सून सौ. सौरभी, पुतण्या कु. ऋतिक होते.

डावीकडून कु. चैतन्य हडकर, सौ. रंजिता डामरे, श्री. सुरेश डामरे, सन्मा. श्री. अजित कालव, कु. स्वप्नाली डामरे, श्री. युवराज डामरे, सौ. सौरभी डामरे, कु. प्रथमेश हडकर

अनोख्या पद्धतीने ही दीपावली डामरे कुटुंबियांनी साजरी केली. भेटवस्तू देणाऱ्या आणि घेणाऱ्या दोघांनाही जो आनंद मिळाला तो सर्वोच्च होता. वस्तू घेतल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील भाव दीपावलीचा सण संपन्न झाल्याचं सांगत होता.

श्री. सुरेश अंकुश डामरे हे समाजातील दुर्लक्षित घटकांच्या सेवेसाठी नेहमीच निःस्वार्थी योगदान देत असतात. त्यांनी हा संस्कार आपल्या कुटुंबियांसोबत जपला; हे कौतुकास्पद आहे. ही सेवा करीत असताना त्यांच्या मनाची भावना खूप महत्त्वाची आहे. गेली वीस-पंचवीस वर्षे कोणतेही अपेक्षेशिवाय ते सेवा करतात.

सन्मानिय श्री. अजित कालव सेवानिवृत्त जीवन जगताना थांबले नाहीत तर अधिक जोमाने समाजसेवा करण्यासाठी दिवसरात्र मेहनत करीत असतात, त्यासाठी झटत असतात. कोणीही शिक्षणापासून व उचित संस्कारापासून वंचित राहता कामा नये. प्रत्येकाचा व्यक्तिमत्त्व विकास झाला पाहिजे. जो शिकेल तोच प्रगती करू शकेल. कष्टकरी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबर संस्कार मिळाले पाहिजेत, त्यांचे व्यक्तिमत्व विकसित झाले पाहिजे तरच देश समर्थ होईल! ही त्यांची भावना आहे आम्ही जाणून घेतली. त्यांच्याशी सुसंवाद साधल्यावर त्यांच्या कार्याचा आवाका लक्षात आला. त्यांचे कार्य आदर्शवत आहे. दिवाळीतील लक्ष्मीपूजनच्या दिवशी श्री. अजित कालव असो व श्री. सुरेश डामरे असो; यांच्यासारख्या आदर्शवत व्यक्तींचे समाज हितासाठी निःस्वार्थी वृत्तीने निरंतर चाललेले कार्य प्रत्यक्षात बघता आले. ते आमचे भाग्य! खऱ्या अर्थाने दीपावलीचा सण साजरा झाला; तो कधीही विस्मरणात जाणार नाही.

-नरेंद्र हडकर