संपादकीय… बाळांसाठी देवदूताचं कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांना साष्टांग दंडवत!

आपल्या कार्यामध्ये निःस्वार्थी वृत्तीने आणि समर्पित भावनेने जेव्हा एखादी व्यक्ती कार्य करते तेव्हा त्या कार्यातून त्याचे देवत्व सिद्ध होते. अशी व्यक्ती कुठल्याही क्षेत्रात असो; ती सर्वसामान्य जनतेसाठी खराखुरा आधार बनते. त्या व्यक्तीच्या कार्यातून अनेकांना जो लाभ होतो तो शब्दांकित करणं कठीण होऊन जाते. तरीही बालरोग तज्ञ डॉ. इरा शाह यांच्याबद्दल अनेक दिवसांपासून चार शब्द लिहावेत असे वाटायचे. आज मात्र राहावलं नाही आणि डॉ. इरा शाह यांच्यावर लेख लिहिण्याचा प्रयत्न करतोय.

उच्च विद्याविभूषित असलेल्या बालरोगतज्ञ म्हणून कार्य करणाऱ्या डॉ. इरा शाह यांची ओळख झाली ती २०१० च्या दरम्यान! त्यावेळी अवघ्या तीन वर्षाचा माझा मुलगा चैतन्य आजारी होता. अनेक डॉक्टर झाले. शेवटी मुंबईतील वाडिया रुग्णालय गाठले. तिथे डॉ. इरा शाह यांनी उपचार केले आणि माझा मुलगा त्यातून शंभर टक्के बरा झाला. जर डॉ. इरा शाह यांचे उपचार मिळाले नसते तर माझ्या मुलाच्या जीवावर बेतू शकले असते. तेव्हापासून आमच्यासाठी डॉ. इरा शाह म्हणजे देवदूतच ठरल्या. हा एकच प्रसंग नाही. त्यानंतर माझा दुसरा मुलगा प्रथमेश हा सुद्धा दोन वर्षाचा असताना आजारी पडला. त्याला बघताच त्यांनी पुढील २४ तासात त्याच्या अनेक तपासण्या करून घेतल्या आणि योग्य ते उपचार केले. तोही तीन महिन्यात तंदुरुस्त झाला. मी डॉ. इरा शाह यांच्याकडे गंभीर आजार असणाऱ्या अनेक लहान मुलांना पाठविले. प्रत्येकाला त्यांनी दिलेला सल्ला आणि केलेले उपचार एवढे अचूक होते की, ती मुलं पूर्णपणे रोगमुक्त- आजारमुक्त झाली.

आदिमातेवर नितांत श्रद्धा असणाऱ्या डॉ. इरा शाह सदैव आपल्या क्षेत्रात संशोधन करीत असतात. त्यांची अनेक संशोधनं जगाने स्वीकारली आहेत. त्या बाळांच्या आजारांवर व्याख्यानं देत असतात. त्यामुळे त्या भारतातच नव्हेतर जगप्रसिद्ध आहेत. येणाऱ्या बाल रुग्णाचे आईवडील किती श्रीमंत आहेत-त्यांचा स्टेटस काय आहे? हे न पाहता येणारे बाल रुग्ण `माझं बाळ’ आहे ह्या मातृत्वच्या भावनेने त्या उपचार करीत असतात. बाल रुग्णाच्या आईवडिलांशी संवाद साधत असतात. आजकाल असे सेवाभावी, प्रामाणिक, निःस्वार्थी, प्रचंड अनुभवी, आपुलकीने वागणारे डॉक्टर आपल्याला सापडणे म्हणजे परमभाग्य असते; असे मी तरी मानतो. जर कधी डॉक्टरचा एक जरी निर्णय चुकला तरी तो आर्थिक अडचणीत आणणारा ठरू शकतो; रुग्णाच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो. `कट प्रॅक्टिस’च्या जमान्यात डॉ. इरा शाह वैद्यकीय क्षेत्रात जे समर्पित भावनेने योगदान देत आहेत त्याची दखल जगाने घेतली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. त्यांनी प्रोफेसर म्हणून आपल्यासारखेच अनेक ज्ञानवंत- गुणवंत बालरोग तज्ञ घडविले आहेत.

आजारपणात त्यांच्याकडे जाताना माझे दोन्ही मुलगे जसं काही ते आपल्या आईलाच भेटायला जातात; अशा अविर्भावात जातात. ही ममता डॉ. इरा शाह यांच्याकडे आहे. त्यांच्या क्लिनिकमध्ये येणारे देशभरातून बालरुग्ण ह्याच भावनेने त्यांच्याकडे वावरताना दिसतात. त्यांच्याकडे जाणाऱ्या प्रत्येक आईबापाला माहित असते की, माझ्या बाळाला कोणताही आजार झाला तरी डॉ. इरा शाह बरा करणारच! हा आत्मविश्वास देण्याचे सामर्थ्य डॉ. इरा शाह यांच्याकडे आहे. नेहमी हसरा चेहरा ठेऊन आपुलकीने संवाद साधणाऱ्या डॉ. इरा शहा मला तर नेहमीच देवदूत वाटतात. त्या नेहमीच आनंदी असतात. मनुष्य म्हटल्यावर कधीतरी दुःख असेल, आळस असेल; परंतु डॉ. इरा शाह यांच्याकडे सदैव आनंद आणि क्रियाशीलता ओसंडून वाहत असते. अशा देवदूत डॉक्टरला मनापासून साष्टांग दंडवत घातला तरी मन भरून येणार नाही.

कोणताही आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजारच होऊ नये; ह्यासाठी डॉ. इरा शाह आईवडीलांना मार्गदर्शन करीत असतात. समजा त्याबाबतीत आईवडिलांचा थोडासा जरी दुर्लक्ष झाला तरी ते आईवडिलांना ओरडतात. त्यांना समज देतात. असे ओरडणारे डॉक्टर आपल्याला आवडत नाहीत. पण सच्चे डॉक्टरच असे वागत असतात. हेही लक्षात ठेवायला पाहिजे. कारण ते रुग्णावरील निःस्वार्थी प्रेमापोटी ओरडत असतात. हाच सदगुण डॉ. इरा शाह यांच्याकडे आहे; तो मला आवडतो. आजपर्यंत त्यांनी देशातील – जगभरातील लाखो मुलांना जीवदान दिले आहे, त्यांना आजारातून मुक्त केले आहे. अशा मातृकादेवीचं स्वरूप असणाऱ्या डॉ. इरा शहा यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक दंडवत!

-नरेंद्र हडकर

(कृपया डॉ. इरा शहा यांची प्रोफाइल पाहण्यासाठी इथे क्लिक करा!)
https://www.pediatriconcall.com/pediatric-journal/editorial/ira

https://www.pediatriconcall.com/

(गुगलवर सर्च करून डॉ. इरा शाह यांची सविस्तर माहिती आपण मिळवू शकता!)

You cannot copy content of this page