सन्मा. स्मिता जाधव यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सन्मा. स्मिता जाधव यांचे जेष्ठ सहकारी, स्थापत्य अभियंता, `अभियंता मित्र’ मासिकाचे संपादक श्री. कमलकांत वडेलकर यांनी सन्मा. स्मिता जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त अतिशय सुंदर आणि समर्पक लेख लिहिला आहे. तो लेख वाचल्यानंतर सन्मा. स्मिता जाधव यांचे कर्तृत्व सहजपणे समजून येतं. 

मित्रवर्य ,
सप्रेम नमस्कार.
विनंती विशेष पत्रास कारण की,
आज तुमचा वाढदिवस आहे . शुभेच्छा आणि अभिनंदन!

तुमच्या परिवाराशी जुळलेल्या जुन्या परंतु कुटुंब वत्सल मित्रांचे आणि तुमच्या परिवाराला सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्यांची, तुमच्यातली कुशाग्र बुद्धिमत्ता ओळखून ज्यांनी तुम्हाला अभियांत्रिकी शिक्षणाची दिशा दिली त्या आई-, तसेच तुमच्या वर्ग मित्रांची आज तुम्हाला निश्चितपणे आठवण होणार. आजचा हा दिवस खरे तर त्यासाठीच असतो. सांस्कृतिक परिवर्तनाच्या परंपरेत हा दिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा होत असला तरी अंतर्मनात कुठेतरी या आठवणींचाच उत्सव चालू असतो.

तुमच्या अनुभवांचा आवाका मोठा आहे. तुम्ही कौटुंबिक व सामाजिक जीवन जगताना एकिकडे समवेदना आणि माणुसकी जपली तर दुसरीकडे अभियांत्रिकी काम करत असताना ग्राम विकासाच्या, रस्ते निर्मितीच्या, सेतू निर्मिती बांधणीच्या, जलसंधारणाच्या कामात शाश्वत विकासाची प्रयोगशीलता दाखवली. त्यामुळे तुम्हाला केवळ विकासकर्मी किंवा विकासवीर न म्हणता विचार वीर सुद्धा म्हणता येईल.

प्रकल्प निर्मितीच्या संदर्भात समाजमनात काहीशी संभ्रमावस्था निर्माण झालेली असताना, अतांत्रिक कामाचा बोजा आणि तांत्रिक ज्ञान नसलेल्या नागरिकांची नसती लुडबुड तसेच माहितीच्या अधिकाराचा अतिरेकी गैरवापर; ह्या सर्व परिस्थितीमुळे तुम्ही अनेकदा स्वेच्छा निवृतीचाही विचार केला असेल, पण तसे न करता महाराष्ट्राच्या विकासाची पालखी एथवर आणून सोडणाऱ्या विकासेतिहासातील चरित्र नायकांपैकी एक नायक झालात. आपल्या अभियांत्रिकी कौशल्याने मानवी जीवनाला मूलभूत सुविधा पुरविण्याचे महत्त्वाचे काम केले.

धर्म आणि जातीभेदाच्या पलीकडे जाऊन केवळ विकासाची आधुनिक मंदिरे उभी केलीत .अभियांत्रिकीची पूजा बांधलीत. तुमच्या प्रती तुमच्या कुटुंबाला, तुमच्या समाजाला ,इतकेच काय पण देशालाही कृतज्ञतेची भावना मनात बाळगावीच लागेल. एक सच्चा आणि निरपेक्ष मित्र म्हणून माझ्या मनात तर ती अखंड राहणारच आहे. श्रेयनामावलीत सतत पडद्यामागे राहणाऱ्या अभियंता वर्गाच्या कामाचे श्रेय समाजातल्या अन्यवर्गाने उपटण्याचे अघोरी पाप केले आहे. याही बद्दल कुरकुर न करता नेटाने तुम्ही तुमचे काम करीतच राहिलात, आजही करीत आहात.

अभियंते पर्यायवादी असतात आणि म्हणूनच भगीरथाचे वंशज ठरतात. अविवेकी वागून आपले नैतिक अधिष्ठान कधीच ढळू देत नाहीत. असतीलही काही पतीत स्थपती तसे, पण सर्वच स्थपतींना एकाच पंक्तीत बसवणे बरे नव्हे हेच खरे. तुम्हाला जगण्याचा नेमका उद्देश उमगल्याने तुम्ही आपल्या उभ्या आयुष्यात आलेल्या आकस्मिक संकटांना धीराने तोंड दिलेत, हा वारसा तुम्हाला आई-वडिलांकडून मिळाला असावा अर्थात त्यासाठी पतीची भक्कम साथ तुम्हाला मिळाली आहे; हे वेगळे सांगायला नकोच. तुम्ही त्यांचे आभारी आहात म्हणून सांगा.

तुमच्या संसार वेलीवर आलेल्या कळ्या आता पुरेशा फुललेल्या आहेत आणि त्याचा एक सुवासिक मांडव तयार झाला असणार, त्या चिमुकल्यांच्या डोक्यावर आणि त्यांच्या अपत्यांवर तुमच्या आशीर्वादाचा हात सदैव राहावा यासाठी मी वडीलकीच्या नात्याने, तुमच्या वाढदिवसाच्या निमित्ताने, तुम्ही शतायुषी व्हावे असा आशीर्वाद देतो!

मित्र स्मिताजी,
तुमच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त
तुम्हाला आरोग्य संपन्न आनंदी आणि समृद्ध तसेच उदंड आयुष्य मिळावे अशी प्रार्थना ही करतो.

आपला.
कमलकांत वडेलकर
अभियंता मित्र , पुणे.