३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली
शेतकऱ्यांचे पीक विमा, पीक रोग नुकसानीचे सर्व पैसे देणार
नागपूर:- शासन शेतकऱ्यांची पीक विमा रक्कम तसेच बोंडअळी, तुडतुडा रोग नुकसान भरपाई आदीबाबतचे सर्व पैसे देणार आहे. यातील नुकसान भरपाईबाबत ४४ लाख शेतकऱ्यांपैकी ३८ लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट रक्कम जमा झाली आहे. सरासरी १२ हजार प्रति हेक्टर प्रमाणे ही रक्कम देण्यात आली आहे. उर्वरितांच्याबाबत कार्यवाही सुरु असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.
बियाणे कंपनीच्या संदर्भात सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कालावधी लागतो. यात १४ लाख शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत. त्यातील ८ लाख ८ हजार अर्जांवर कॉसी ज्युडीशियल प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी कायद्यानुसार केवळ ७० लोकांना प्राधिकृत केले होते. त्यात बदल करुन १७०० लोकांना नियुक्त केले. त्यांच्यामार्फत क्षेत्रभेटी (फिल्ड व्हिजीट) करण्यात आल्या. तसेच यातील १ लाख ५५ हजार अर्ज निकाली काढले. त्यांना ९६ कोटी ३० लाख रुपयांची मदत दिली असून साधारणत: ८ ते १५ हजार रुपये प्रती हेक्टर अशी सरासरी नुकसान भरपाई मिळाली आहे. उर्वरित अर्जांबाबात एक महिन्यात प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण मदत निधी (एनडीआरएफ)ची वाट न पाहता राज्य आपत्ती निवारण निधी (एसडीआरएफ) निधीतून १ हजार ९ कोटी रुपयांची मदत दिली आहे. यात १३ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरी वाटप केले आहेत. तसेच संबधित जिल्हाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार अजूनही मदत दिली जात आहे. एनडीआरएफचा तिसरा हप्ता १५ दिवसांत देण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.