न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून मुंबईतील मेट्रो प्रकल्पांसाठी १ हजार ५६२ कोटींचे कर्ज
मुंबई:- मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या विकासाठी चीनमधील न्यू डेव्हलपमेंट बँकेकडून १ हजार ५६२ कोटी रुपयांचे कर्ज देण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष तथा चीफ अॅापरेटींग अॅाफिसर झीआन हू यांनी आज येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिली. बँकेच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली.
या विकास कर्जाचा विनीयोग मुंबईतील मेट्रोच्या २ए, २ बी आणि मेट्रो ७ या प्रकल्पांसाठी करण्यात येणार आहे. यावेळी एमएमआरडीएच्यावतीने बँकेकडे मेट्रोच्या नियोजीत मेट्रो ८, १०, ११ तसेच १२ या प्रकल्पांसाठीच्या सुमारे अकरा हजार कोटी रुपयांच्या विकास कर्जाचा प्रस्तावही बँकेकडे देण्यात आला.
बँकेकडून मंजूर केलेल्या या विकास कर्जातून मेट्रोच्या २ए, २ बी आणि मेट्रो ७ या प्रकल्पांतील मेट्रोच्या कार्यान्वयनासाठीचा वीज पुरवठा, विद्युतीकरण, उदवाहन अशा विविध सुविधा विकसित केल्या जाणार आहेत.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी न्यू डेव्हलपमेंट बँकेचे हे सहकार्य मुंबईतील मेट्रो आणि महत्त्वाकांक्षी अशा प्रवाशी सुविधा क्षेत्राच्या विकासात महत्त्वपुर्ण ठरेल तसेच यामुळे मुंबई शहरातील मेट्रोच्या विविध विकास प्रकल्पांना अपेक्षीत गती मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला.
यावेळी एमएमआरडीएचे आयुक्त ए. राजीव, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तूभ धवसे तसेच न्यू डेव्हलपमेंट बँकेचे वरिष्ठाधिकारी आदी उपस्थित होते. (‘महान्यूज’)