नागपुरात साकारणार अन्न व औषध प्रशासन विभागाची नवीन प्रयोगशाळा
भेसळयुक्त अन्नाचे नमुने आठ दिवसात तपासून देण्याच्या सूचना
नागपूर:- शुध्द व भेसळरहीत अन्न मिळणे हा सामान्यांचा अधिकार आहे.अन्न व औषध प्रशासनाच्या प्रस्तावित प्रयोगशाळेतून सामान्य नागरिकांना आठ दिवसांच्या आत अन्न नमुने तपासून द्यावेत. प्रसारमाध्यमातून गुन्हेगारांचे फोटो देखील प्रसिद्धीस द्यावे यामुळे अपप्रवृत्तीला जरब बसेल, अशी अपेक्षा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रयोगशाळा तसेच इमारतीचे भूमिपूजन आज करण्यात आले. यावेळी अन्न व नागरी पुरवठा व अन्न व औषध प्रशासन मंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री मदन येरावार,आमदार सुधाकर कोहळे, आमदार अनिल सोले, वैद्यकीय शिक्षण व औषधी विभागाचे सचिव संजय देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता उल्हास देबडवार, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, उपअभियंता ए.पी. देशमुख आदी उपस्थित होते.
अन्न व औषध प्रशासनाने जनतेला वेळेत व ऑनलाईन सेवा द्याव्यात. पारदर्शक व भष्ट्राचारमुक्त सेवेचे समाधान जनतेला व शासनाला या विभागाने द्यावे, असे सांगून श्री.गडकरी म्हणाले की, अनेक वर्षापासूनची या प्रयोगशाळेसाठी असलेली मागणी पुर्ण होत आहे. या सहा मजली इमारतीला प्रशस्त पार्कींग, ई कारसाठी पार्कींग, ग्रीन बिल्डींग, सौर ऊर्जेवर आधारित प्रकाश यंत्रणा तसेच कार्यालयाबाहेर सुंदर लॅण्डस्केप करण्याची सुचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला केली. पाश्चिमात्य देशात अन्न व औषधांना देण्यात येणारे उच्च मुल्य या विभागाने द्यावे तसेच मोठ्या उद्योजकांनी सुध्दा अन्नशुध्दीला प्राधान्य द्यावे. आठ दिवसात नमुने तपासणी व भेसळीचा गुन्हा सिध्द झाल्यावर गुन्हेगारांचे फोटो हे माध्यमांनी प्रसिद्ध करावे जेणेकरून गुन्हेगारांना सामाजिक जरब बसेल.
अन्न व औषध प्रशासन हा विभाग सामान्यांशी जुळलेला आहे. गेल्या वर्षभरात १५० कोटी रूपयांचा गुटखा विभागामार्फत जप्त करण्यात आल्याचे मंत्री गिरीष बापट यांनी सांगितले. भेसळमुक्त अन्नासाठी विभागामार्फत गतिने कारवाई करण्यात येते. जुन्या कायद्यातील त्रुटीवर अभ्यास करून अन्न भेसळ करणाऱ्यांना कडक शासन करणारा कायदा मंत्रिमंडळासमोर ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.अन्न व औषध प्रशासनामार्फत राज्यातील धार्मिक स्थळीसुध्दा मोठ्या स्वरूपात अन्न शिजविण्यात येते. तिथे विभागामार्फत धडक प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शुध्द अन्न सामान्यांना मिळावे म्हणून कायद्यासोबतच प्रबोधन सुध्दा गरजेचे आहे. दुधात होणारी भेसळ ही चिंताजनक असून भेसळ करणाऱ्यांना कडक शिक्षेचे प्रयोजन नवीन कायद्यात केले आहे. नवीन कायद्यात कमीतकमी तीन वर्षे एवढ्या शिक्षेची तरतूद केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
जनतेला सकस व शुध्द अन्न मिळण्यासाठी विभागामार्फत राज्यात अद्ययावत प्रयोगशाळा उभारण्यात आल्यात. राज्यातील ही तिसरी प्रयोगशाळा आहे.अन्न व औषध प्रशासनातर्फे सामान्य जनतेला चांगली सेवा देण्यासाठी या अद्ययावत प्रयोगशाळेची मदत होईल,असे सांगुन राज्यमंत्री मदन येरावार म्हणाले की, या प्रयोगशाळेत पाच हजार अन्नाचे तसेच दोन हजार औषधाचे नमुने तपासण्याची सुविधा असेल. येत्या दोन वर्षात ही सुसज्ज वास्तु नागरिकांच्या सेवेत रूजु होईल. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
यावेळी केंद्र शासनाच्या अन्न सुरक्षा व मानके विभागाच्या वतीने अन्न सुरक्षेवर काढलेल्या माहितीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव संजय देशमुख, संचालन रेणुका देशकर तर आभार सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी मानले. (‘महान्यूज’)