शहीद जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत यांना भावपूर्ण आदरांजली
शहिद सुपुत्रांना महाराष्ट्राची मानवंदना
राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रुपयांचा धनादेश शहिदांच्या कुटुंबियांना सुपूर्द
मुंबई:- जम्मू- काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान नितीन राठोड आणि संजय राजपूत शहीद झाले. मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील असलेल्या या दोन्ही जवानांचे पार्थिव काल त्यांच्या मूळ गावी नेण्यासाठी औरंगाबाद येथे विमानाने आणण्यात आले. तेथे राज्य शासनाच्यावतीने पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दोन्ही शहिदांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. राज्याचे दोन्ही सुपुत्र देशासाठी शहीद झाले त्यांच्या बलिदानाला आज अवघ्या राज्याने साश्रु नयनांनी मानवंदना दिली.
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे शहीद जवान संजय राजपूत यांच्या पार्थिवास केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर आणि राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
लोणार तालुक्यातील गोवर्धननगर तांड्यावर राज्याचे माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी शहीद जवान नितीन राठोड यांच्या पार्थिवास शासकीय मानवंदनेसह आदरांजली अर्पण केली. यावेळी मंत्री निलंगेकर-पाटील यांनी राठोड कुटुंबियांचे सांत्वन करीत त्यांच्याकडे राज्य शासनाच्या मदतीचा ५० लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त करीत शहीद जवानांना आदरांजली अर्पण केली होती. शहीद झालेल्या राज्यातील जवानांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत करून कुटुंबियांचे पुनर्वसन करण्याची घोषणा काल मुख्यमंत्र्यांनी केली होती. त्यानुसार आज शहिदांच्या कुटुंबियांकडे ५० लाख रुपयांचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.
मलकापूर येथे शहीद संजय राजपूत यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा उमाताई तायडे, मध्यप्रदेशातील खंडवा येथील खासदार नंदकुमार चव्हाण, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार चैनसुख संचेती, आमदार आकाश फुंडकर, आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी केंद्रीय गृह राज्यमंत्री अहिर यांनी राज्य शासनाने जाहीर केलेल्या ५० लाख रूपये मदतीचा धनादेश शहीद जवान संजय राजपूत यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केला.