प्रभानवल्ली येथे आजपासून ७ वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन

चित्रकार अक्षय मेस्त्री आणि संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांचे प्रदर्शन : १८ ते २० फेब्रुवारीपर्यंत आयोजन

तळेरे:- रत्नागिरी जिल्ह्यातील प्रभानवल्ली येथे ७ वे ग्रामीण मराठी साहित्य सन्मेलन १८ ते २० फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. ज्येष्ठ कवी व साहित्यिक अशोक लोटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या संमेलनात गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री यांच्या चित्रांचे आणि तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या संदेश पत्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.

राजापुर-लांजा तालुका नागरिक संघ मुंबई ने आयोजित केलेले हे सन्मेलन समिक्षक वि. शं. चौघुले साहित्यनगरी प्रभानवल्ली-खोरनिनको येथे होणार आहे. या सन्मेलनात विविध प्रदर्शने, चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यादरम्यान तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षरोत्सव संग्रहातील देश परदेशातील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध क्षेत्रातील व्यक्तींच्या हस्ताक्षरातील संदेश पत्रांचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिध्द उद्योजक सदनंद ब्रीद यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

यापूर्वी त्यांच्या संग्रहाचे प्रदर्शन मुंबई, कोल्हापूर, नाशिक, बेळगाव अशा विविध ठिकाणी झालेले असून शालेय मुले आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. तसेच, गवाणे येथील चित्रकार अक्षय मेस्त्री याच्या विविध चित्रांचे प्रदर्शन या संमेलनात होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन सुप्रसिध्द हृदयरोगतज्ञ डॉ. गजानन रत्नपारखी यांच्या हस्ते होणार आहे.

लॉक डाऊन काळात अक्षय मेस्त्री याने अत्यंत कमी वेळात, कमी खर्चात अत्यंत सुंदर चित्रांची मालिका केली होती. त्यातील काही निवडक चित्रांचे प्रदर्शन यावेळी मांडण्यात येणार आहेत. अक्षय याच्या चित्रांचे प्रदर्शन अनेक ठिकाणी झाले असून त्यालाही चांगला प्रतिसाद मिळतो. या संमेलनामध्ये साहित्यिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती सहभागी होतात. तसेच, असंख्य विद्यार्थ्यांचा सहभाग असतो.

You cannot copy content of this page