अनिवासी भारतीय युवकांचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटले

भारताच्या विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचे राज्यपालांचे अनिवासी भारतीय युवकांना आवाहन

मुंबई:- सन २०२० पर्यंत भारत जगातील सर्वात युवा देश म्हणून उदयास येत आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारताने विज्ञान, तंत्रज्ञान यांसह माहिती तंत्रज्ञानात मोठी प्रगती केली असून लोकांचे जीवनमान उंचावले आहे. भारताची वाटचाल प्रगत देशाकडे होत असताना अनिवासी भारतीय युवकांनी देखील भारताच्या विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केले.

विविध देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मुळच्या भारतीय वंशाच्या युवकांच्या एका ४५ सदस्यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल विद्यासागर राव यांची राज भवन येथे भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. गयाना, त्रिनिदाद, फिजी, दक्षिण आफ्रिका, सुरीनाम, मॉरीशस, श्रीलंका व पोर्तुगाल येथील अनिवासी भारतीय युवक यावेळी उपस्थित होते.

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने आयोजित ५३ व्या ‘जाणुया भारत’ (‘Know India Programme’) या कार्यक्रमाअंतर्गत वरील आठ देशातील युवकांनी राज्यपालांची भेट घेतली.

अनिवासी भारतीय युवकांच्या वतीने त्रिनिदाद देशाच्या निकोलस कन्हाय या युवकाने भारतातील राहणीमान, संस्कृती, खानपान, चालीरिती पाहून आमची मुळे या देशात असल्याची खात्री पटली अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्राने केलेल्या प्रगतीने आम्ही प्रभावित झाल्याचे त्याने सांगितले.

मूलतः भारतीय वंशाचे विविध देशात स्थिरावलेले १८ ते ३० वयोगटातील युवक भारताशी जोडले जावे तसेच येथील कला, ऐतिहासिक वारसा व संस्कृतीची त्यांना माहिती व्हावी, या हेतूने परराष्ट्र मंत्रालयाने ‘जाणुया भारत’ या कार्यक्रमाची आखणी केली आहे. देशात होत असलेल्या समकालीन बदलांची माहिती करून घेऊन या युवकांनी प्रेरणा घ्यावी व्हावी, हा देखील या कार्यक्रमाचा उद्देश आहे. यावर्षी हा कार्यक्रम महाराष्ट्र शासन तसेच दमण आणि दीव यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात भेटीवर शिष्टमंडळाने आयटी पार्क पुणे, भिलार पुस्तकांचे गाव, महाबळेश्वर येथे भेट दिली तसेच महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमातून येथील संस्कृती जाणून घेतली असे सांस्कृतिक कार्य संचालक स्वाती काळे यांनी सांगितले.

महाराष्ट्र तसेच दमण आणि दीव या ठिकाणी भेट देण्याशिवाय या युवकांना आग्रा, संसद संग्रहालय व ग्रंथालय, राष्ट्रपती भवन, लाल किल्ला, राजघाट स्मारक या ठिकाणी देखील नेले जाणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *