पुणे मेट्रो प्रकल्पासाठी २ हजार कोटींचा सामंजस्य करार

एएफडी फ्रांस बँक आणि भारत सरकार यांच्यामध्ये सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या
लवकरच युरोपियन बँकेबरोबर ४ हजार कोटींचा करार

नवी दिल्ली:- पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एएफडी फ्रांस बँक आणि केंद्र सरकार यांच्यात २ हजार कोटींचा करार झाला. लवकरच युरोपियन इन्व्हेस‌्टमेंट बँकेसोबतही ४ हजार कोटींचा करार होणार असल्याची माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली.

येथील नॉर्थ ब्लॉक स्थित केंद्रीय आर्थिक विकास विभागाच्या कार्यालयात आज पुणे मेट्रोकरिता एएफडी फ्रांस बँक आणि भारत सरकार यांच्या २ हजार कोटींच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. फ्रांसचे भारतातील राजदूत अलेक्झेंडर झिजर, केंद्रीय मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाचे अतिरीक्त सचिव डॉ.सी.एस.मोहपात्रा यांनी करारावर स्वाक्षऱ्या केल्या. एएफडी फ्रांस बँकेच्या भारतातील उपसंचालक क्लेमेन व्हीडल डी ला ब्लँच, महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित आणि पुणे मेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमन्यम यावेळी उपस्थित होते.

२०१९ अखेर व्यावसायिक परिचलन तर २०२० मध्ये पहिली मार्गिका पूर्ण होणार

या कराराविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र सदनातआयोजित पत्रकार परिषदेत श्री.दीक्षित म्हणाले, आजच्या करारामुळे पुणे मेट्रोकरिता २ हजार कोटींचा निधी कर्ज रूपाने उपलब्ध झाला आहे. सद्य: मेट्रोचे २७ टक्के काम पूर्ण झाले असून या निधीच्या माध्यमातून कामाला गती येणार आहे. यावर्षाअखेर मेट्रोच्या व्यावसायिक परिचलनास सुरुवात करण्यासही याची मोठी मदत होणार आहे. तसेच वर्ष २०२१ मध्ये पुणे मेट्रोची १६ कि.मी.ची पहिली लाईन पूर्ण करणे व २०२१ पर्यंत मेट्राची दुसरी लाईन पूर्ण करण्याचे उद्दिष्टही गाठण्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. एएफडी फ्रांस बँकेकडून १.२ टक्के व्याजदराने हे कर्ज उपलब्ध झाले असून पुढील २० वर्षात कर्जफेड करायची असल्याचे श्री.दीक्षित यांनी सांगितले.

युरोपियन बॅंकेबरोर ४ हजार कोटींचा करार

युरोपियन इन‌्व्हेस्टमेंट बँकेकडून पुणे मेट्रोसाठी ४ हजार कोटींचे कर्ज लवकरच उपलब्ध होणार आहे. यासदंर्भात काही मंजुऱ्या मिळाल्यानंतर येत्या तीन आठवड्यात सामंजस्य करार करण्यात येईल, असे श्री.दीक्षित यांनी यावेळी सांगितले.

पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ११ हजार ४०० कोटींचा खर्च

पुणे मेट्रोकरिता एकूण ११ हजार ४०० कोटींचा खर्च येणार आहे. यासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, राज्य सरकार आणि केंद्र सरकार निधी उपलब्ध करीत असून एएफडी फ्रांस बॅंक आणि युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँक यांच्याकडून एकूण ६ हजार कोटींचे कर्ज घेण्यात येत असल्याचे श्री.दीक्षित यांनी सांगितले.

मेट्रो स्टेशनवर झळकणार पुण्याची गौरवशाली संस्कृती व इतिहास

पुणे शहाराला असणारा ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसाही मेट्रोच्या माध्यमातून दिसणार आहे. पुण्याची खास ओळख असलेल्या पुणेरी पगडीच्या आकारात ‘डेक्कन जिमखाना’ व ‘संभाजी पार्क मेट्रो स्टेशन’ तयार करण्यात येत आहेत. तसेच शहराला असणारा संगीताचा वैभवशाली इतिहासही विविध संगीत वाद्य व कलाकृतींच्या माध्यमातून दिसणार आहे. दापोडी, संत तुकाराम नगर आदी औद्योगिक भागातील मेट्रो स्टेशनवर शहराची औद्योगिक क्षेत्रातील प्रगती दर्शविण्यात येणार आहे.

स्वारगेट येथे मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब

पुणे शहरातील स्वारगेट परिसरात वाहनांची मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी असलेले राज्य रस्ते वाहतूक महामंडळाचे बस स्थानक, पुणे मनपा बस वाहतूक सेवेचे स्थानक व अन्य खाजगी वाहनांच्या गाड्याही असतात रस्त्याहून पादचाऱ्यांचीही गर्दी असते. याच भागात मेट्रो स्टेशन उभारण्यात येत आहे. येथील वाहतुकीची वर्दळ लक्षात घेता, पुणे मेट्रो प्रकल्पाच्यावतीने ‘मल्टीमॉडेल ट्रान्सपोर्ट हब’ उभारण्यात येणार आहे. या माध्यमातून पादचारी, रस्त्यावरील वाहतूक व मेट्रोची वर्दळ सुरळीत होणार असून प्रवासी व नागरिकांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. पुणे मनपा, महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळ आणि पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने १८ एकर जमीन उपलब्ध करून दिल्याचे श्री.दीक्षित यांनी सांगितले.

सिव्हील कोर्ट असणार मेट्रोचे मध्यवर्ती स्टेशन : ३० माळ्यांचे स्टेशन

शहराच्या शिवाजी नगर परिसरातील सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे पुणे मेट्रोचे मध्यवर्ती स्टेशन राहणार असून याठिकाणी मेट्रोच्या तीनही लाईन एकत्र येतील. हे ३० माळ्यांचे स्टेशन असणार आहे.

सर्व स्टेशनवर सौर ऊर्जा पॅनल

नागपूर मेट्रोतील यशस्वी प्रयोगानंतर आता महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने पुणे मेट्रो प्रकल्पातही सौर उर्जेच्या वापरावर पूर्ण भर दिला आहे. त्यानुसार प्रत्येक मेट्रो स्टेशन वर सौर ऊर्जा पॅनल बसविण्यात येणार आहेत. मेट्रो करिता लागणाऱ्या एकूण उर्जेपैकी ६५ टक्के वीज सौर उर्जेद्वारे निर्मित असणार केवळ प्रती युनीट दीड रूपयात ही वीज उपलब्ध होणार आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीची वास्तू रचना

पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेसाठी खास आंतरराष्ट्रीय दर्जाचे काम होत आहे. यासाठी फ्रांस आणि स्पेनचे वास्तू विशारद तसेच भारतातील नामांकित वास्तुविशारद हफीज कॉन्ट्रॅक्टर पुणे मेट्रोच्या वास्तूरचनेची जबाबदारी सांभाळत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *