कोरोना प्रतिबंधासाठी विभागीय आयुक्तांनी घेतली आढावा बैठक

सिंधुदुर्गनगरी, दि. 21 (जि.मा.का.) – दुर्दैवाने कोरोनाची तिसरी लाट आलीच तर,तिच्या प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करावे. कोणताही अपघात होणार नाही, याची दक्षताही या निमित्ताने घ्यावी, असे निर्देश विभागीय आयुक्त विलास पाटील यांनी दिले.

कोकण विभागीय आयुक्त पदाचा पदभार घेतल्यानंतर आयुक्त श्री. पाटील आज प्रथमच जिल्हा दौऱ्यावर आले होते. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत केले. या बैठकीला पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सहायक जिल्हाधिकारी संजीता महोपात्रा, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, निवासी उपजिल्हाधिकारी शुंभागी साठे, जिल्‍हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संगणकीय सादरीकरण करुन कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. रुग्णांची संख्या, रुग्ण बरे होण्याच्या दर, मृत्यू दर, खाटांची उपलब्धता आणि नियोजन, ऑक्सिजनची उपलब्धता आणि प्रगती पथावरील प्रकल्प याचा समावेश होता. त्याचबरोबर तौक्ते चक्रीवादळ अनुदान वितरण याबाबतही त्यांनी माहिती दिली. सद्यस्थितीत जिल्ह्यात दक्ष असणाऱ्या आपत्ती व्यवस्थापन पथकाबाबतही माहिती दिली.

विभागीय आयुक्त श्री. पाटील समाधान व्यक्त करुन म्हणाले, टीमवर्क म्हणून तुम्ही सगळे आजवर कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी काम करत आहात. येथून पुढे याच पध्दतीने चांगले काम करा. विशेषत: तपासणी वाढवणे, खाटांचे नियोजन, प्रगती पथावर असणारे प्राणवायूचे प्रकल्प यावर भर द्यावा. कोणताही अपघात होणार नाही याची दक्षता घेवून सूक्ष्म नियोजन करावे. तौक्ते चक्रीवादळ बाबत अनुदान प्राधान्याने वितरण करावे. सद्याच्या पावसाळ्यात दरड कोसळणे, झाड पडणे, रस्ता खचणे अशा आपत्तींसाठी यंत्र सामुग्री, मनुष्यबळ अधिक सतर्क ठेवावे. त्याचबरोबर तिलारी प्रकल्पातून पाणी विसर्गाबाबतही पाटबंधारे विभागांने समन्वयाने काम करावे. प्रत्येक अधिकाऱ्यांनी आजवर आलेल्या अनुभवाचा वापर आपत्ती निवारणासाठी संघटीतपणे करावा, असेही ते म्हणाले.

बैठकीला प्रांताधिकारी सुशांत खांडेकर, वैशाली राजमाने, वंदना खरमाळे, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले, डॉ. संदेश कांबळे, जिल्हा प्रशासन अधिकारी वैभव साबळे आदी उपस्थित होते.