राज्यपालांच्या हस्ते अतुल परचुरे यांना गंधार गौरव पुरस्कार प्रदान; उषा नाडकर्णी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

संगीतकार ओंकार घैसास, दिग्दर्शक जयंत पवार, अनुश्री फडणीस, प्रकाश पारखी गंधार युवा गौरव पुरस्काराने सन्मानित

मुंबई:- लहान मुलांना संस्कार देण्याचे स्थायी कार्य कुटुंब, समाज व सांस्कृतिक संस्थांकडून होत असते. या संस्कारांच्या माध्यमातून समाज घडतो व समाजाच्या माध्यमातून राष्ट्र निर्माणाचे कार्य होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

बालदिनाचे औचित्य साधून बालरंगभूमीसाठी कार्य करणाऱ्या ‘गंधार’ कला संस्थेतर्फे लहान मुलांच्या ‘कट्टी बट्टी’ या कार्यक्रमाचे तसेच ‘गंधार गौरव’ पुरस्कार सोहळ्याचे राजभवन येथे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी राज्यपाल बोलत होते.

बालरंगभूमीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनेते अतुल परचुरे यांना यावेळी राज्यपालांच्या हस्ते गंधार गौरव पुरस्कार २०२१ प्रदान करण्यात आला, तर ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आमदार आशिष शेलार, आमदार संजय केळकर, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की व गंधारचे अध्यक्ष मंदार टिल्लू व्यासपीठावर उपस्थित होते.

संगीत, कला, नाट्य या गोष्टींचा ज्याला गंध नाही अश्या व्यक्तीला विना शेपटीचा पशु संबोधले जाते, या अर्थाच्या सुभाषिताचा उल्लेख करून संगीत व नाट्यात दुःख विसरायला लावण्याची ताकत आहे, असे राज्यपालांनी यावेळी बोलताना सांगितले.

‘कट्टी-बट्टी’ या कार्यक्रमात लहान मुलांनी सादर केलेल्या बालभारती पुस्तकातील बडबडगीतांना राज्यपालांनी कौतुकाची थाप दिली व बालनाट्य चमूला वीस हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

बालप्रेक्षक हा महत्त्वाचा प्रेक्षक आहे व त्यांच्या पुढे सादर करणे आव्हानात्मक काम असते. कोरोनाचे निर्बंध संपल्यावर आपण पुन्हा बालनाट्य घेऊन रसिकांपुढे येऊ, असे अतुल परचुरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते दिग्दर्शक जयंत पवार, निवेदिका अनुश्री फडणीस, संगीतकार ओंकार घैसास व प्रकाश पारखी यांना गंधार युवा गौरव पुरस्कार देण्यात आले.

गंधार ही संस्था गेल्या १५ वर्षांपासून कार्य करीत असून संस्थेने १०० च्या वर बालनाट्य सादर करून त्याचे हजारांपेक्षा अधिक प्रयोग केले असल्याचे संजय केळकर यांनी सांगितले.