शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी (जिमाका):- जिल्ह्यातील ओबीसी प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांना ओबीसी महामंडळामार्फत शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत राज्य व देशांतर्गत शैक्षणिक अभ्यासक्रमाकरीता रुपये १० लक्षपर्यंतच्या कर्जावर तसेच परदेशी शैक्षणिक अभ्यासक्रमांकरीता रुपये २० लक्षपर्यंतच्या कर्जावरील व्याज परतावा महामंडळामार्फत लाभार्थीस अदा करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील बारावीत ६० टक्क्याहून आधिक गुण असणाऱ्या आणि पदवी पदवीत्तर अभ्यासक्रमाकरीता पात्र असणाऱ्या लाभार्थींनी महामंडळाच्या या योजनेकरिता ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक प्रिती पटेल यांनी केले आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना

योजनेचा उद्देश:- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाकरीता बँकेमार्फत मंजूर केलेल्या रू. २०.०० लक्ष पर्यंत कर्ज रकमेवरील व्याज परतावा महामंडळाकडून वितरीत केला जाईल.

योजनेचे स्वरूप:- राज्यांतर्गत व देशांतर्गत अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. १०.०० लक्ष पर्यंत आणि परदेशी अभ्यासक्रमासाठी महत्तम कर्ज मर्यादा रू. २०.०० लक्ष पर्यंत आहे.

लाभार्थी पात्रतेच्या अटी व शर्ती:- अर्जदाराचे वय १७ ते ३० वर्षे असावे. इतर मागास प्रवर्गातील असणे तसेच तो महाराष्ट्राचा रहिवाशी असावा. कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादा ग्रामिण व शहरी भागाकरीता रू.८.०० लक्ष पर्यंत असावी. अर्जदार हा इयत्ता १२ वी ६० टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा तसेच पदवीच्या थेट व्दितीय वर्षात व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणारे विद्यार्थी ६० टक्के गुणांसह पदवीका (Diploma) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

कर्ज प्रस्तावासोबत सादर करावयाची कागदपत्रे:- अर्जदाराचा इतर मागास प्रवर्गातील जामीचा दाखला, तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, तहसिलदार यांचा महाराष्ट्र रहिवासी (वय अधिवास) दाखला, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे आधार कार्ड, ज्या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक कर्ज आवश्यक आहे त्या अभ्यासक्रमासाठीची पात्रता परिक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, अर्जदार व अर्जदाराचे पालक यांचे पासपोर्ट फोटो व आधारकार्ड व पॅनकार्ड, अर्जदाराचा जन्माचा व वयाचा पुरावा, शैक्षणिक शुल्क संबधित पत्र, शैक्षणिक शुल्कमाफी (Freeship), पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त संस्थेत प्रवेश घेतल्याचा पुरावा,आधार संलग्न बँक खाते पुरावा तसेच इतर आवश्यक कागदपत्रे पुरावे.

शैक्षणिक कर्ज योजनेतंर्गत येणारे अभ्यासक्रम

अ. राज्यांतर्गत येणारे अभ्यासक्रम:- आरोग्य विज्ञान – MBBS, BDS, BAMS, BHMS, B.Pharm, व संबधीत विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम. अभियांत्रिकी, B.E, B.Tech., B.Arch (सर्व शाखा ), तसेच संबंधित विषयांतील सर्व पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम इ. व्यावसायिक अभ्यासक्रम, LLB , हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन टेक्नोलॉजी, इंटेरिअर डिझाईन पदवी, बचलर ऑफ डिझाईन, फिल्म व टेलीव्हिजन अभ्यासक्रम, पायलट, सनदी लेखापाल, MBA,MCA SHIPPING विषयांतील पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम, कृषी अन्नप्रकीया व पशुविज्ञान, Animal & Fishery Sciences, B.Tech., BVSC, B.Sc.इ संबधित विषयांतील सर्व पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रम.

ब. देशांतर्गत अभ्यासक्रम:- केंद्रीय परिषद, कृषी विद्यापीठ परिषद,शासकीय अनुदानित व खाजगी मान्यताप्राप्त (NACC) अभ्यासक्रमासाठी प्रात्रता परीक्षा उत्तीर्ण झालेले व प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांकरीता आहे. यात आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी, व्यावसायिक व व्यवस्थापन, कृषी अन्नप्रक्रिया व पशुविज्ञान या
अभ्यासक्रमाचा समावेश आहे. क.परदेशी अभ्यासक्रम – आरोग्य विज्ञान, विज्ञान, कला, अभियांत्रिकी, व्यावसायिक अभ्यासक्रम यामध्ये समाविष्ट अभ्यासक्रम.

व्याज परतावा व परतफेडीचा कालावधी:- अर्जदाराने बँकेने मंजूर केलेल्या कर्जाची नियमीत परतफेड केलेल्या हप्त्यामधील नियमित असलेल्या व्याज रकमेचा परतावा (कमाल १२ टक्के पर्यंत) महामंडळ अदा करेल. शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू असे पर्यंत बँकेकडे नियमित भरणा केलेल्या व्याजाचा परतावा महामंडळ अदा करेल.

कार्यपद्धती:- योजना पुर्णपणे ऑनलाईन असून ज्या उमेदवारांना शैक्षणिक कर्ज योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. त्यांनी बँक कर्ज मंजूरी अगोदर महामंडळाच्या www.msobcfdc.org या संकेतस्थळावर अर्ज भरावयाचे आहेत.

अधिक माहितीसाठी जिल्हा कार्यालयाच्या पत्यावर अथवा महामंडळाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी, कार्यालयाचा पत्ता – शामराव पेजे कोकण इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या.,डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, सिंधुदूर्गनगरी, 02362 228119 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.

error: Content is protected !!