आधारकार्डमधील बदल करणाऱ्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल!

आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रॉब्लेम समजून घेण्याची गरज!

कणकवली:- आधार सेवा केंद्रावरील आधारकार्डमधील बदल करणाऱ्या शासनाच्या सॉफ्टवेअरमधील दोषाने गावाच्या नावात बदल होत असल्याने आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींना ठराविक ग्राहकांकडून त्रास दिला जातोय. यासंदर्भात संबंधित प्रशासनाने उपाययोजना आखाव्यात अशी मागणी आधारसेवा केंद्र संचालक करीत आहेत.

यासंदर्भात सविस्तर वृत्त असे की, नवीन आधारकार्ड काढताना, आधारकार्डवरील माहितीत काही बदल करायचा असल्यास आपण आधार सेवा केंद्रावर जातो. तेथे केंद्रशासनाने दिलेल्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातूनच आधारकार्डवर बदल केले जातात. मात्र सध्याच्या सॉफ्टवेअरमध्ये ग्राहकाचा पिन कोड देताच त्या गावाचा संपूर्ण पत्ता तिथे सॉफ्टवेअरच्याच माध्यमातून भरला जातो. उदा. ४१६६०२ हा पिन कोड टाकताच कणकवली ऐवजी कणकवळी हा चुकीचा शब्द येतो. मग आधारकार्ड ग्राहक कणकवळी ऐवजी कणकवली असा उल्लेख पाहिजे; असा आग्रह धरतो. मात्र सॉफ्टवेअरमध्ये कोणताही बदल करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याने चुकीची दुरुस्ती करता येत नाही. मग काहीजण आधार सेवा केंद्रावरील ऑपरेटरशी हुज्जत घालतात. त्यामुळे वादंग निर्माण होतात.

`कलमठ’चा उल्लेख कल्मथ
`चाफेड’चा उल्लेख चाफेद
`बिडवाडी’चा उल्लेख बिदवाडी
`बोर्डवे’चा उल्लेख र्बोदवे
`आशिये‘चा उल्लेख अशीये
`सातरल’चा उल्लेख सतरल
`मुणगे’चा उल्लेख मुंगी
`असलदे’चा उल्लेख असलाडे

अशारितीने जिल्ह्यातील अनेक गावांच्या नावांमध्ये बदल झाला असून यासंदर्भात जिल्ह्याधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे, अशी मागणी जिल्हावासीय करीत आहेत. वरीलप्रकारे गावाच्या नावात बदल झाल्यास संबंधित ऑपरेटर जबाबदार नसतो. आधारसेवा केंद्रावर कार्य करणाऱ्या व्यक्ती ह्या जिल्ह्यातीलच असून त्या आपणास सेवा देत असतात; ह्याचे भान ठेवणे गरजेचे आहे. जर ऑपरेटरवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास आणि ही समस्या समजून न घेतल्यास वाद वाढू शकतात. आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींचा प्रॉब्लेम समजून घेण्याची गरज असून राजकीय पुढाऱ्यांनी संबंधित यंत्रणेकडे त्याचा पाठपुरावा करावा; अशी मागणी आधारसेवा केंद्रावर सेवा देणाऱ्या व्यक्तींनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली आहे.