संस्कारी माणसांनी युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे! -धाकू तानवडे

गोपुरी आश्रमात ‘आजादी आंदोलन अभियान’ निमित्ताने राष्ट्र सेवा दल- शाखा कणकवलीच्यावतीने आयोजित सहविचार सभा संपन्न

कणकवली:- “समाजातील संस्कारी मंडळींनी भविष्यातील युवाई घडवण्यासाठी पुढे यायला हवे. आज युवकांची चांगल्या संस्कारांच्या दृष्टीने सक्षम मानसिकता तयार करण्यासाठी या मंडळींची आवश्यकता आहे. राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून हे काम स्वातंत्र्य पूर्व आणि स्वतंत्र्योतर काळात सुरू होते. आजही ते सुरू आहे. ह्या माध्यमातून सक्षम युवाई घडवण्याचा प्रयत्न होत आहे. अशा स्वरूपाच्या प्रयत्नांची आज अत्यंत आवश्यकता आहे!” असे प्रतिपादन विद्यामंदिर प्रशालेचे माजी शिक्षक व आयडियल इंग्लिश मिडीयम स्कूलचे मुख्य कार्यकारी अधिकारी धाकू तानवडे यांनी केले. गोपुरी आश्रमात स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त ९, ऑगस्ट पासून संपूर्ण देशभर ‘आजादी आंदोलन अभियान’ सुरू होत आहे, त्यानिमित्त राष्ट्र सेवा दल- शाखा कणकवली च्या वतीने आयोजित सहविचार सभेत ते बोलत होते.

तानवडे पुढे म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीने आपले वैयक्तिक जीवन सक्षमपणे जगताना आपण समाजासाठी काय केले? याचे चिंतन करायला हवे. मला आज ते चिंतन करण्याची आवश्यकता वाटू लागली आहे. मी आर्थिक दृष्ट्या सक्षम असताना माणसिक दृष्टीने सक्षम आहे का? याचेही चिंतन करण्याची आज गरज निर्माण झाली आहे.

यावेळी बोलताना सामाजिक कार्यकर्ते बाळू मेस्त्री म्हणाले की, राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून भविष्यातील पिढी मानसिक, वैचारिक दृष्टिकोनातून सक्षम बनविण्याचा प्रयत्न करुया!

कणकवली कॉलेजचे राष्ट्रीय छात्र सेना विभागाचे प्रमुख लेफ्टनंट प्रा. डॉ. बाळू राठोड म्हणाले की प्रत्येक युवकांत नेशन फर्टसची संकल्पना रूजवण्याचा प्रयत्न करूया!

यावेळी विनायक सापळे, महानंद चव्हान आणि प्रा. मारोती चव्हाण या मान्यवरांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या सभेत प्रा. डॉ. सोमनाथ कदम यांनी उपस्थितांना राष्ट्रीय एकता प्रतिज्ञा दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गोपुरी आश्रमाचे अद्यक्ष डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले. ह्या सहविचार सभेला गोपुरी आश्रमाचे सचिव मंगेश नेवगे, परेश परूळेकर, गोपुरीचे बाळकृष्ण सावंत, सदाशिव राणे, कणकवलीतील सादीक कुडाळकर, किरण कदम, कणकवली महाविद्यालयाचे काही प्राध्यापक आणि इतर मान्यवर आवर्जून उपस्थित होते. शेवटी प्रा.गणेश टेकळे यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page