`चेतक महोत्सव` जगातील मोठे आकर्षण ठरेल – मुख्यमंत्री

सारंगखेडा येथील चेतक महोत्सवाला मुख्यमंत्र्यांची भेट; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे उद्घाटन

नंदुरबार:- पर्यटन विभागाने चेतक महोत्सवाचे उत्तम ब्रँडिंग केल्याने हा महोत्सव येत्या काळात जगातील प्रमुख आणि मोठे आकर्षण ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा चेतक महोत्सवांतर्गत आयोजित अश्वस्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, पर्यटनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक महोत्सव समितीचे अध्यक्ष जयपालसिंह रावल, दोंडाईचा नगराध्यक्षा नयनकुवर रावल, विशेष पोलीस महानिरीक्षक छेरींग दोरजे, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभिमन्यू काळे, महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल, प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे आदी उपस्थित होते.

श्री. फडणवीस म्हणाले, हा महोत्सव घोड्यांचा ऐतिहासिक सोहळा आहे. मोठ्या प्रमाणात विदेशी पर्यटक महोत्सवाला भेट देण्यासाठी येत आहेत. चांगल्या प्रसिद्धीमुळे हा महोत्सव खऱ्या अर्थाने जागतिक झाला आहे. एक कोटी किंमतीपेक्षा अधिक किंमतीचे घोडे महोत्सवात येत आहेत. श्रीदत्ताच्या आशीर्वादाने महोत्सवाचा अधिक विस्तार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महोत्सवासाठी मुख्यमंत्री महोदयांचे सहकार्य असून शुभेच्छा देण्यासाठी ते सारंगखेडा येथे आले असल्याचे श्री.रावल यांनी सांगितले.

तत्पूर्वी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पर्यटनस्थळांच्या प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. अकोला येथून महोत्सवासाठी घोडेस्वारी करीत आलेल्या अकरा वर्षीय राजवीरसिंह नागरा या बालकाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अश्वस्पर्धेचे उद्घाटन

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते अश्व स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी त्यांनी अश्व खेळ आणि अश्वनृत्याची पाहणी केली. त्यांनी यातील साहसी खेळ प्रकाराबाबत कौतुकोद्गार काढले. त्यांनी बचत गट प्रदर्शनाची पाहणी केली. त्यांनी महोत्सवातील कला प्रदर्शनालादेखील यावेळी भेट दिली.

टेन्ट सिटीची पाहणी

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी तापी नदीच्या तीरावर पर्यटकांसाठी वसवलेल्या टेन्ट सिटीची पाहणी केली. या राहुट्यांमध्ये अत्याधुनिक सुविधा देण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर पर्यटकांसाठी सर्व सुविधा असलेले रेस्टॉरंट, स्पा, एसी आणि नॉन इसी टेंट, दोन दरबारी टेंट, कॅरम, चेस आणि बिलियर्डस् सारख्या खेळांचीदेखील सुविधा पुरविण्यात आली आहे. दरबारी टेन्टमधील सुविधा लक्षात घेता, आंतरराष्ट्रीय पर्यटक महोत्सवाकडे आकर्षित होतील, असे श्री.फडणवीस यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *