निष्पक्ष पत्रकारितेद्वारे राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यात योगदान देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकारिता पुरस्कार प्रदान

मुंबई:- राजकारण आणि पत्रकारिता यांचे नाते जुने आहे. पत्रकार हे नेहमी अनुभव घेऊन सडेतोड लिहित असतात. पत्रकारितेमध्ये निष्पक्षपणा आवश्यक आहे. निष्पक्ष पत्रकारितेच्या माध्यमातून राजकारणाची समीक्षा करत त्याला योग्य दिशा देण्याबरोबरच राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी तसेच राज्यासमोरील प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारितेने यापुढील काळातही योगदान द्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांनी केले.

दिनकर रायकर यांना कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघाचे पत्रकारिता पुरस्कार प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार आणि दै. लोकमतचे सल्लागार संपादक श्री. दिनकर रायकर यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कृ. पां. सामक जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

वृत्तपत्र प्रतिनिधींसाठीचा राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. तरुण भारत (बेळगाव) च्या रत्नागिरी प्रतिनिधी जान्हवी पाटील यांना तर इलेक्ट्रॉनिक माध्यम प्रतिनिधींसाठीचा पुरस्कार ‘एबीपी माझा’चे उस्मानाबाद प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला. श्री.कुलकर्णी यांच्या वतीने त्यांच्या मित्र परिवाराने हा पुरस्कार स्वीकारला. तसेच मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ सदस्यांकरिता देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दै. लोकसत्ताचे विशेष प्रतिनिधी संजय बापट यांना प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री. दिनकर रायकर यांच्यासह पुरस्कारप्राप्त सर्व पत्रकारांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, श्री. रायकर यांचे पत्रकारितेमधील योगदान फार मोठे आहे. पत्रकारिता क्षेत्रात गेल्या ५० वर्षांपासून काम करताना त्यांनी राजकारणासह समाजातील विविध घटकांचे अनेक पैलू अनुभवले. आजच्या पुरस्काराने त्यांच्या कार्याचा योग्य सन्मान झाला आहे. मीही लहानपणापासून घरातच पत्रकारिता अनुभवत आणि शिकत आलो आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर दैनिक सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी माझ्याकडे आली. त्या काळात पत्रकारिता जवळून अनुभवता आली. पत्रकार हा कोणत्याही परिस्थितीत निष्पक्षच असला पाहिजे. त्याच्यावर एखाद्या पक्षाचा शिक्का बसला की त्याची पत्रकारिता तेथेच संपते. निष्पक्षता जपत पत्रकारांनी पत्रकारिता करणे आवश्यक आहे. श्री. रायकर आणि पुरस्कारप्राप्त इतर पत्रकारांनी अशीच निष्पक्ष आणि आदर्श पत्रकारिता करुन पत्रकारितेचा गौरव वाढविला, असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार आदी प्रश्नांवरही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी विचार मांडले. ते म्हणाले, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा कर्जमुक्ती हा काही कायमस्वरुपी इलाज नाही. हा फक्त एक प्रथमोपचार आहे. पण असे विविध मार्ग अवलंबून आमचे सरकार शेतकऱ्यांना अडचणीतून निश्चित बाहेर काढेल. त्याचबरोबर महिलांवरील अत्याचार कोणत्याही परिस्थितीत सहन केले जाणार नाहीत. याबाबत प्रशासनाला आज पुन्हा सक्त सूचना दिल्या आहेत. या प्रकरणातील आरोपींवर जलद गतीने कारवाई केली जाईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.

ज्येष्ठ पत्रकार श्री. रायकर यांनी यावेळी आपल्या पत्रकारितेच्या कारकीर्दीतील विविध आठवणींना उजळा दिला. ते म्हणाले की, मंत्रालय आणि विधीमंडळ वार्ताहर संघात काम करण्याचा अनुभव अनोखा होता. विधिमंडळातील आमदारांची भाषणे, विविध भागातील मांडले जाणारे प्रश्न यातून खूप काही शिकायला मिळाले. यशवंतराव चव्हाणांपासून विविध सरकारांचे काम पाहता आले. राजकारणातील विविध रोमाचकारी घटनांचा साक्षीदार होता आले. आता पत्रकारिता पूर्णत: बदलली आहे. पण समाजातील प्रश्न मात्र कायम आहेत. या प्रश्नांच्या निराकरणासाठी यापुढील काळातही पत्रकारितेचे योगदान गरजेचे आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कारकीर्द निश्चितच चांगली चालेल. त्यांचा शांत स्वभाव, अहंभावपणा नसणे आणि सर्वांना सोबत घेऊन कामकाज करण्याच्या त्यांच्या पद्धतीमुळे राज्याचे निश्चितच हित साधले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माहिती आणि जनसंपर्क विभागाचे सचिव तथा महासंचालक डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनीही आपले विचार व्यक्त केले. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मिलिंद लिमये यांनी केले तर वार्ताहर संघाचे कार्यवाह अनिकेत जोशी यांनी आभार मानले. जीवनगौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन चंद्रशेखर कुलकर्णी यांनी केले.

सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे झालेल्या या कार्यक्रमास वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, उपाध्यक्ष दीपक भातुसे, कार्यवाह अनिकेत जोशी, कोषाध्यक्ष महेश पावसकर, सौ. रायकर यांच्यासह वार्ताहर संघाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *