महाराष्ट्रातील १८ हजार गावातील पाणीपुरवठा योजना पूर्णत्वास – मुख्यमंत्री
सातारा:- गेल्या चार वर्षात शासनाने राज्यातील १८ हजार गावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वास नेल्या असून हा आजपर्यंतचा उच्चांक आहे. पाटण तालुक्यातील आज भूमिपूजन केलेल्या ५४ पाणीपुरवठा योजनांचे कामही निर्धारित वेळेत पूर्ण करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तसेच दुर्गम डोंगरी भागातील सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी आज सांगितले.
दौलतनगर, ता. पाटण येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या ‘महाराष्ट्र दौलत’ शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, तारळी धरणातून ५० मीटर हेडवरील जमीन क्षेत्रास पाणी देण्याच्या योजनांचे ई – भूमिपूजन, ५४ नळपाणी पुरवठा योजनांचे ई-भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा राज्यमंत्री तथा साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, कृषी राज्यमंत्री तथा सह पालकमंत्री सदाभाऊ खोत, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत, आमदार सवश्री शंभूराज देसाई, अनिल बाबर, सुरेश हाळवणकर, सत्यजित पाटील, धनंजय ऊर्फ सुधीर गाडगीळ, उल्हास पाटील, डॉ. सुरेश खाडे, डॉ. सुजीत मिणचेकर, गौतम चाबुकस्वार, प्रकाश आबिटकर, नारायण पाटील, सुरेश गोरे, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी कैलास शिंदे उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीत लोकनेते बाळासाहेब देसाई यांचा मोठा वाटा आहे. त्यांचे कार्य सर्वांसाठीच प्रेरणादायी असून जनतेच्या कामाचा वसा जपल्यावर लोकांचे प्रेम आपोआप मिळते, हे या ठिकाणी आल्यावर समजते. लोकनेत्यांच्या उल्लेखाशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. त्यांचे नेतृत्व अत्यंत सक्षम होते, ते महाराष्ट्राचे खऱ्या अर्थाने पोलादी पुरूष होते.
लोकनेत्यांचे स्मारक नव्या पिढीला कायमच प्रेरणा देत राहील, असे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्या स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्याचे कामही लवकरच पूर्ण करण्यात येईल. त्यांनी घेतलेले निर्णय कायम स्मरणात राहील. पाटण तालुक्यातील जनतेने मला दिलेले मानपत्र हे मानपत्र नसून ते जनतेचे प्रेमपत्र आहे. ते मी आयुष्यभर हृदयात जपून ठेवेन, असे भावपूर्ण उद्गार श्री. फडणवीस यांनी यावेळी काढले.
पाटण तालुक्यातील तारळी धरणावरील उपसा सिंचन योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी असून या योजनेमुळे २ हजार ५०० एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेमुळे या लाभ क्षेत्रातील शेतकरी समृध्द होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सातारा जिल्ह्यातील बंद असलेले सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण होतील. तसेच जिल्ह्यातील काही भाग सिंचनाविना दुर्लक्षित होता. तेथे पाणी पोहोचवून तोही भाग सुजलाम् सुफलाम् करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या कार्याची आठवण या स्मारकाच्या निमित्ताने कायम राहील. बाळासाहेब देसाई यांनी पाटण तालुक्यातील जनतेला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, पाटण तालुका हा डोंगरी तालुका असल्याने उदरनिर्वाहासाठी या तालुक्यातील लोक मुंबईसारख्या मोठ्या शहरात गेले. त्यानंतर धरणांच्या निमित्ताने आणखी लोक विस्थापित झाले. या लोकांना आधार देण्याचे मोठे काम लोकनेत्यांनी केले. लोकनेते ही पदवी जनतेनेच बाळासाहेबांना दिली. ते सकारात्मक, दूरदर्शी नेतृत्व होते.
प्रास्ताविकात आमदार शंभूराज देसाई म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्यावतीने उभारण्यात आलेले लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे स्मारक, त्यांच्या कार्याचे यथोचित सन्मान आहे. अत्यंत कमी वेळेत या स्मारकाचे काम पूर्ण झाले आहे. यानिमित्त लोकनेत्यांचे कार्य नवीन पिढी समोर जाईल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी पाटण तालुक्यातील जनतेच्यावतीने शासनाचे आभार मानले.
यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई शताब्दी स्मारक समितीच्यावतीने आमदार शंभूराज देसाई यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.