पत्रकारांच्या स्थैर्यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी – मुख्यमंत्री
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ पुरस्कार समारंभ
मुंबई:- पत्रकारांच्या स्थैर्य आणि या चौथ्या स्तंभाचा अंकुश कायम रहावा यासाठी महाराष्ट्र शासन सदैव त्यांच्या पाठिशी ताकदीने उभे आहे. या चौथ्या स्तंभास स्थैर्य देण्यासाठी आम्ही विविध निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.
मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्यामार्फत आयोजित सह्याद्री अतिथीगृह येथे वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी कृ.पां. सामक जीवन गौरव पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे, लोकमत वृत्त समुहाचे समूह संपादक दिनकर रायकर, एबीपी माझाचे कार्यकारी संपादक राजीव खांडेकर, श्रीमती सविता रणदिवे, पत्रकार संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, कार्यवाह प्रमोद डोईफोडे आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, गेली चार वर्षे चौथ्यास्तंभाला स्थैर्य देण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. ज्येष्ठ पत्रकार सन्मान योजना लवकरच कार्यान्वित करण्यात येईल. पत्रकारांचा घराबाबतही म्हाडाच्या माध्यमातून योजना तयारी केली आहे. यामध्ये मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सदस्यांना पन्नास टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जागा निश्चित झाली आहे. येत्या एक महिन्यात त्याबाबतची कार्यवाही पूर्ण होईल. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत पत्रकारांना पूर्णपणे समाविष्ट केले आहे. त्यासाठी मंत्रिमंडळानेही मंजुरी दिली आहे. या योजनेत पत्रकारांच्या समावेशाबाबत व्यापक व्याख्या केल्याने, पत्रकारांच्या कुटुंबियांनाही आरोग्य सुविधा मिळतील. चौथ्या स्तंभाच्या पाठिशी राज्य सरकार ताकदीने उभे आहे.
जीवनगौरव पुरस्कारार्थी दिनू रणदिवे यांच्या गौरवार्थ मुख्यमंत्री म्हणाले, एका व्रतस्थ पत्रकाराचा सन्मान करण्याची संधी मला मिळाली हे मोठे भाग्य आहे. त्यांनी प्रत्येक लढ्यात सक्रिय भूमिका निभावली. पत्रकारितेच्या माध्यमातून जनमत तयार करण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकांपर्यंत पोहचण्याकरिता वृत्तपत्र सुरु केले. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही या वृत्तपत्रातून व्यंगचित्र काढली होती. आज त्यांची जयंती आहे आणि रणदिवे यांना पुरस्कार मिळतो आहे, हा एक चांगला योगायोग आहे. आदर्श पत्रकारांसाठी असणारे सर्व गुण त्यांच्यात आहेत.
युवा पत्रकारांचाही सन्मान करताना आपणास आनंद होतो, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी पुरस्कार विजेते पत्रकार प्राजक्ता पोळ, विश्वास वाघमोडे व महेश तिवारी यांनी पत्रकारितेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव केला. प्राजक्ता पोळ यांनी कमी कालावधीत चांगले कार्य केले. विश्वास वाघमोडे यांनी शोध पत्रकारिता केली तर महेश तिवारी हे निर्भिड व जनतेची बांधिलकी असलेले पत्रकार आहेत. शासनाच्या चुका होत असतील, तर ते दाखवून देणे हे पत्रकारितेचे कार्यच आहे. आम्हाला जरी खुलासे द्यावे लागले, तरी चालेल पण पत्रकारांनी पत्रकारितेचे हे व्रत जोपासावे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
संघाच्यावतीने दरवर्षी देण्यात येणारे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार इलेक्ट्रॉनिक माध्यम- न्यूज १८ लोकमतचे महेश तिवारी, वृत्तपत्र – इंडियन एक्स्प्रेसचे विश्र्वास वाघमोडे, संघाच्या सदस्यांकरिताचा पुरस्कार न्यूज १८ लोकमतच्या प्राजक्ता पोळ यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
साधा व हाडाचा पत्रकार दिनू रणदिवे
दिनकर रायकर यांनी दिनू रणदिवे यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, असे सांगून त्यांच्यासमवेत केलेल्या पत्रकारितेच्या आठवणींना उजाळा दिला. दिनू रणदिवे यांच्या १९७४ च्या रेल्वे संपाच्या आठवणी सांगितल्या. राजीव खांडेकर यांनी दिनू रणदिवे यांचा वारसा चालविणारे पत्रकार वाढीस लागो. यात समाजहित आहे. पूर्वीच्या पत्रकारितेत सोई सुविधा नव्हत्या पण समाधान होते. ग्लॅमर नव्हते पण प्रतिष्ठा होती. माध्यमांचा पसारा वाढला पण प्रभाव वाढला नाही. आज हे सर्व असले तरी काहीतरी हरविल्याची भावना आहे. अशा भावना व्यक्त केल्या.
सत्काराला उत्तर देताना दिनू रणदिवे यांनी आपल्या पत्रकारितेचा लेखा जोखा व अनुभव मांडले. पत्रकारिता क्षेत्रातील आपले गुरु पा. वां. गाडगीळ यांच्याप्रती आदर व्यक्त करुन त्यांचे तैलचित्र पत्रकार संघाला भेट दिले असल्याचे सांगितले.
संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे यांनी आपल्या प्रास्ताविकातून पत्रकार संघाचे कार्य स्पष्ट केले. या जीवनगौरव पुरस्काराबद्दल बोलताना त्यांनी दिनू रणदिवे यांना जीवन गौरव पुरस्कार दिल्याने पुरस्काराला उंची प्राप्त झाल्याचे सांगितले.
या कार्यक्रमास आमदार कपिल पाटील तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनायाचे संचालक (माहिती/वृत्त) सुरेश वांदिले तसेच पुरस्कार प्राप्त पत्रकारांचे कुटुंबीय व अन्य पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार मिलिंद लिमये यांनी केले तर आभार पत्रकार संघाचे उपाध्यक्ष दिलीप जाधव यांनी मानले.