सावित्रीबाई फुले यांनी दिलेल्या योगदानाने महिलांना समाजात सन्मानाची वागणूक! -ॲड निर्मला सामंत – प्रभावळकर
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त राज्य महिला आयोगात `सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक विचार आणि आजची स्त्री’ विषयी व्याख्यान
मुंबई:- “सावित्रीबाई फुले यांनी समाजासाठी केलेले योगदान आणि त्यांनी सहन केलेला संघर्ष याचे फलित म्हणून आज महिलेला समाजात सन्मानाची वागणूक मिळत आहे! सुमारे २०० वर्षांपूर्वी समाजातील सतीसारख्या अनिष्ट प्रथांचा महिलांवर झालेला परिणाम आणि त्या विरोधात सावित्रीबाईंनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी आहे! सुदृढ व समताधिष्ठित समाजनिर्मितीसाठी सावित्रीबाई फुले यांचे विचार जपणे अत्यंत आवश्यक आहेत!” असे प्रतिपादन ॲड निर्मला सामंत – प्रभावळकर यांनी केले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९५ व्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य महिला आयोग कार्यालयात महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा, मुंबईच्या माजी महापौर, जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, जेष्ठ विधिज्ञ ॲड निर्मला सामंत – प्रभावळकर यांचे `सावित्रीबाई फुले यांचे शिक्षणविषयक विचार आणि आजची स्त्री’ याविषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वांद्रे येथील कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत अभिवादन करुन झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून मुंबईच्या माजी महापौर, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा ॲड निर्मला सामंत प्रभावळकर, राज्य महिला आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे, राहत संस्थेचे सचिव विपीन त्रिभुवन यांच्या सह राज्य महिला आयोग, माविम, म्हाडा कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतेवेळी, आयोगाचे समुपदेशक तथा प्रकल्प अधिकारी लक्ष्मण मानकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित केले. यानंतर राहत संस्थेचे सचिव विपीन त्रिभुवन यांनी आपल्या मनोगतात महिलांच्या सक्षमीकरणासाठी सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही मार्गदर्शक असल्याचे सांगितले.
आयोगाच्या उपसचिव डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले या दांपत्याने समाजाला अनिष्ट प्रथांविरुद्ध लढण्यासाठी बळ दिले. शिक्षण क्षेत्रात आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी केलेले कार्य समाज कधीही विसरू शकणार नाही. आजही महिलांसमोर अनेक प्रश्न आहेत, मात्र त्या प्रश्नांविरुद्ध उभे राहण्याचे सामर्थ्य सावित्रीबाईंनी महिलांना दिल्याचे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन लक्ष्मण मानकर यांनी केले.











