महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस पुन्हा विराजमान!

उपमुख्यमंत्री पदावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची वर्णी!

मुंबई- काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या राजकारणाला अचानकपणे मोठी कलाटणी मिळाली असून आज सकाळी मुख्यमंत्री पदाची शपथ देवेंद्र फडणवीस यांनी घेतली; तर त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. आज राजभवनात हा शपथविधी पार पडला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली.

महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांना सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळे राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली. त्यानुसार महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट सुरू झाली होती.

मुख्यमंत्री पदावर शिवसेना ठाम राहिल्यामुळे भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती संपुष्टात आली. त्या दरम्यान काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना या तीन पक्षांनी एकत्र येऊन महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेसाठी वाटाघाटी सुरू केल्या. या वाटाघाटी अंतिम टप्प्यात येत असताना अचानकपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाला काल रात्री साडे अकराच्या दरम्यान पाठिंबा दिला. त्यानंतर झालेल्या घडामोडीमध्ये राज्यांमधील राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आली आणि सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राजभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ अनुक्रमे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ३० नोव्हेंबरला विधानसभेत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यामुळे पुढील सात दिवसात अतिशय धक्कादायक असणारा सत्तासंघर्ष महाराष्ट्राला पहावयास मिळणार आहे.

हा संपूर्ण घटनाक्रम महाराष्ट्राच्या सत्ताकारणात अतिशय आश्चर्यकारक असून त्याचे परिणाम पुढील काळात स्पष्टपणे उमटणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर एक मत झाले असताना अचानकपणे अजीत पवार यांनी धक्का देत सर्व समिकरणे बदलून टाकली आणि एका रात्रीमध्ये भारतीय जनता पक्षाने आपली सर्व ताकद वापरून महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. या सर्व घडामोडी महाराष्ट्रातील जनतेला आज सकाळी समजल्या. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते, याची प्रचिती सर्वांना झाली.

You cannot copy content of this page