जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी, दि.12 (जि.मा.का): जागतिक आपत्ती धोके निवारण दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय व आवारातील इतर कार्यालयासाठी आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 ते 6 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. हे प्रशिक्षण जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे.
संयक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी तसेच लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याच्या दुष्टीने 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिवस म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने या प्रशिक्षण कार्यक्रमात दैनंदिन जीवनात कार्यरत असताना सामना कराव्या लागणाऱ्या विविध आपत्तींच्या अनुषंगाने आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे. हे प्रशिक्षण जिल्हा नियोन समिती सभागृह (जुने), पहिला मजला जिल्हाधिकारी कार्यालय येथे होणार आहे.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी नागरिकांना आपत्ती प्रतिसादासाठी कटिबध्द होण्यासंदर्भात प्रतिज्ञा तयार केली असून ही प्रतिज्ञा उपस्थितांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीमती राजश्री सामंत यांनी दिली.