प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची जेष्ठ समाजसेवक, कृषी भूषण कै. वसंतराव गंगावणे पहिल्या स्मृती पुरस्कारासाठी निवड
कणकवली:- गोकुळ प्रकल्प प्रतिष्ठान रत्नागिरीचे अध्यक्ष, जेष्ठ समाजसेवक वसंतराव गंगावणे यांचे जूलै २०१९ या महिन्यात निधन झाले. वसंतराव गंगावणे यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील विल्ये गावात पहिले जलसंधारणाचे मॉडेल तयार करून महाराष्ट्राच्या जलसंधारण कार्यक्रमाला दिशा दिली होती. विशेषत: आठव्या पंचवार्षिक योजनेच्या ड्राप्टींग समितीचे सदस्य असताना या योजनेच्या मसुद्यात शासनाला जलसंधारणाला महत्त्व द्यायला लावले होते. शासनाने वसंतराव नाईक पंचायतराज पुरस्कार, कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. अशा जेष्ठ समाजसेवकाच्या नावे लांजा ता.रत्नागिरी या त्यांच्या कर्मभूमीतील नागरिकांनी वसंतराव गंगावणे गौरव समिती स्थापन करून त्यांच्या नावाने यावर्षीपासून ‘जेष्ठ समाजसेवक, कृषीभूषण वसंतराव गंगावणे स्मृती पुरस्कार’ सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांला देऊन त्याचा सन्मान करण्याचे ठरवले आहे.
या पहिल्या पुरस्कारारासाठी गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष, कणकवली महाविद्यालयाचे ग्रामीण विकास विभागाचे प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांची समितीने एकमताने निवड केली आहे.
डॉ.राजेंद्र मुंबरकर गोपुरी आश्रमाच्या माध्यामातून करत असलेल्या सामाजिक कार्याचा परिचय सर्वांना आहेच. त्याचबरोबर गेली सलग १८ वर्षे सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू प्रक्रिया उद्योगातून स्वयंरोजगार निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न करत आहेत. या प्रयोगाला भरघोस यशही मिळाले आहे. गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत असतात. तसेच जिल्ह्यातील फळप्रक्रिया उद्योजकांचा ‘सिंधुदुर्ग जिल्हा फळ प्रक्रिया संघ निर्माण करून’ या उद्योगातील उद्योजकांना एकत्र करण्यासाठी २००४ ते २०१० या काळात प्रयत्न केले.
प्रा.राजेंद्र मुंबरकर यांचा जिल्ह्यातील विविध परिवर्तनवादी सामाजिक चळवळीतील सहभागही ऊल्लेखनीय आहे.
शासनाच्या विविध विकास विषयाच्या समित्या त्याचबरोबर कणकवली नगर पंचायतीच्या स्वच्छता अभियानाचे ब्रॅंड अॅंबॅसिडर अशा विविध समित्यांवर सदस्य म्हणून कार्यरत आहेत.
युवकांच्यात वाचनाची आवड निर्माण व्हावी.त्यांच्या विचारात सजगता यावी आणि युवक एक वैचारिकदृष्ट्या सक्षम नागरिक बनावेत; यासाठी गेली सलग पाच वर्षे वाचन संस्कृती विकास उपक्रम राष्ट्रसेवादल आणि गोपुरी आश्रमाच्या माध्यमातून राबविण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून सक्षम विचारांचे आणि संस्कारी मनाचे युवक घडत आहेत.
या पुरस्काराविषयी प्रतिक्रिया देताना डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी पुरस्कार समितीने कोणताही प्रस्ताव न मागवता माझी या पुरस्कारासाठी निवड करून मी करीत असलेल्या प्रामाणिक समाजकार्याचाचे कौतुक केले. याबद्दल मला समाधान वाटले; अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरांतून डॉ. राजेंद्र मुंबरकर यांचे कौतुक होत आहे.