२००५ ते २०१५ दरम्यान पावसामुळे मुंबईत १४ हजार कोटींचे नुकसान, तर ३ हजार लोक मृत्युमुखी

मुंबई:- २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षाच्या कालावधीत पावसामुळे मुंबई शहराचे तब्ब्ल १४ हजार कोटींचे नुकसान झाले आहे तर ३ हजार लोक मृत्युमुखी पडले आहेत. मागील दहा वर्षाची ही आकडेवारी मुंबईकरांसाठी धक्कादायक आहे. म्हणून दरवर्षी पावसाळ्यात प्रशासनाने चोख तयारी ठेवली पाहिजे; जेणेकरून जीवित आणि वित्त हानी कमीत कमी होऊ शकेल.

यूएसटीडीए आणि केपीएमजी यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २००५ ते २०१५ ह्या दहा वर्षात मुंबईत पावसामुळे जे नुकसान झाले ते अतिशय गंभीर असे आहे. भारताची आर्थिक राजधानी असलेली मुंबई नेहमीच दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असते. त्याचप्रमाणे पावसाच्या लहरीपणामुळे आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे मुंबईकरांना नेहमीच फटका बसतो. देशाला नेहमीच सर्वाधिक कर देणाऱ्या मुंबईचे पावसामुळे एवढे नुकसान होणे; देशासाठी नुकसानकारक आहे.

पावसाचे पाणी वाहून न गेल्यामुळे पूरपरिस्थिती निर्माण होते. रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक ठप्प होते. जुन्या इमारती, अनधिकृत इमारती कोसळतात, कुंपणाची संरक्षक भिंत पडते, रस्त्यांवर खड्डे पडल्यामुळे अपघात होतात; त्यामध्ये वरीलप्रमाणे जीवित व वित्त हानी होते. मुंबईत ७० लाख लोक झोपडपट्टीत तर २५ लाख लोक जुन्या इमारतींमध्ये राहतात. ह्या सर्वसामान्य लोकांनाच ह्याचा जास्त फटका बसत असतो.

दरम्यान केंद्रीय जल आयोगाच्या पाहणीनुसार गेल्या ६५ वर्षात देशभरात आलेल्या पुरामुळे ३.७८ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. पुरात सुमारे ८ कोटी घरे उद्ध्वस्त झाली. १९५३ ते २०१६ दरम्यान पूरात एक लाखाहून अधिक लोक मरण पावले.

You cannot copy content of this page