आदिवासी विकास विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीवर भर – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई:- प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या ‘पीएम-जनमन’ आणि ‘धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियान’ या दोन योजनांची राज्यात अंमलबजावणी होत असून याद्वारे शेवटच्या व्यक्तीवर लक्ष केंद्रित केले जात आहे. एकही गाव, एकही व्यक्ती या योजनेपासून वंचित राहणार नाही, त्यांना लाभ देण्याचा संकल्प केला असल्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी विधान परिषदेत सांगितले.

विधानपरिषदेच्या नियम २६० अन्वये मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले की, पीएम जनमन योजना विशेषतः कातकरी, माडिया व कोलाम या आदिम जमातींसाठी असून आरोग्य, शिक्षण, रस्ते, घरकुल आदी १३ योजनांचा समावेश असलेली ही योजना नऊ विभागांच्या माध्यमातून राबवली जात आहे. येत्या काळात योजनांची अंमलबजावणी अधिक गतिमान होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

धरती आबा जनजाती ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ४२ जमातींसाठी २५ योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार असून, त्याचा प्रारंभ १६ जून रोजी पालघर जिल्ह्यातून करण्यात आला आहे. हे अभियान १७ विभागांच्या समन्वयातून राबवले जात असून, शेवटच्या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

राज्यात ३० प्रकल्प कार्यालये कार्यरत असून, त्यापैकी ११ ठिकाणी आयएएस अधिकारी प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. याशिवाय अमरावती, नागपूर, नाशिक आणि ठाणे येथे चार एटीसी कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत.

मंत्री डॉ. वुईके यांनी सांगितले की, येणाऱ्या काळात प्रकल्प अधिकाऱ्यांची किमान दोन वर्षे सेवा निश्चित केली जाणार आहे. अशा प्रकारे प्रकल्प अधिकाऱ्यांची नियमितता वाढल्यास, योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी होईल.

मंत्री डॉ. वुईके यांनी जाहीर केले की, १० वर्षे सेवा केलेल्या ६,६४ तासिका तत्त्वावरील शिक्षकांना आम्ही कोर्टाच्या आदेशानुसार नियमित केले असून, उर्वरितही लवकरच रुजू होतील. त्यांनी पुढे सांगितले की, शैक्षणिक गुणवत्तेवर तडजोड न करता, पात्रताधारक शिक्षकांचीच नियुक्ती केली जाईल.

पेसा कायद्यानुसार भरती प्रक्रियेबाबत न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्याने, सध्यातरी शिक्षण खंडित होऊ नये म्हणून १,७९१ पात्रताधारक शिक्षकांची तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे, असेही मंत्री डॉ.वुईके यांनी सांगितले.

error: Content is protected !!